आपल्या मुलांना पैशांचे व्यवस्थापन शिकवणे ही एक कला आहे. ती त्यांना अवगत करणे तसे सोपे आहे. फक्त काही सवयी अंगवळणी पडण्यासाठी त्या बालवयातच लावणे गरजेचे आहे. तसेच या सवयी आजच्या दिवसात खूपच गरजेच्या आहेत. प्ले स्कूल पासून मुले आर्थिक साक्षरतेसाठी ग्रहणक्षम असतात. त्यांची स्वतःची पिगी बँक घरात असते. पैशाचे व्यवस्थापन करणे योग्य वयात किंवा लवकर सुरुवात केल्याने त्यांना नंतरच्या आयुष्यात आर्थिकदृष्ट्या योग्य निर्णय घेण्यास नक्कीच मदत होईल. तर अशाच काही चांगल्या सवयी आणि मुलांना आर्थिक साक्षर करणाऱ्या गोष्टी आज आपण पाहणार आहोत.
Table of contents [Show]
बचत आणि खर्च (Savings and Spending)
एक पालक म्हणून तुम्ही तुमच्या मुलांच्या मनात हळूहळू बजेटिंगची संकल्पना रुजवू शकता. त्यांच्यांशी जमा-खर्च काय आहे या बाबत संभाषण करा. जर तुम्ही मुलांना पॉकेट मनी देत असाल तर मुलांना ते किती खर्च करतात , ते कुठे खर्च करायचे आहेत आणि किती बचत करता याचा मागोवा ठेवायला सांगा. अशा सवयी लवकर लावणे नंतरच्या आयुष्यात फायदेशीर ठरेल. एकदा का ते कमावायला लागले की ते त्यांच्या उत्पन्नाचे व्यवस्थापन अधिक चांगल्या प्रकारे करू शकतील. बचतीचे फायदे , खर्चाचे वर्गीकरण तसेच खर्चाचे निरीक्षण करायला आपल्या पाल्यास जरूर शिकवा.
मुलांमध्ये संयम विकसित करा (Develop Patience in Children)
मुलांचे सर्वच हट्ट पूर्ण करणे गरजेचे नाही कारण यातून त्यांना कळते की, आपल्याला सहज गोष्टी मिळतात यात काही कष्ट लागत नाही. यामागील मेहनतीची त्यांना कल्पना नसते. यासाठी पैशांबाबत डोळस दृष्टीकोन पालकांचा आवश्यक आहे. त्यांनी काही गोष्टीची मागणी केल्यास त्यांना धीर धरायला सांगा आणि त्यांना त्याची गरज का आहे? याबद्दल त्यांच्याशी बोला. थोडे दिवस थांबा किंवा त्यांना प्रतीक्षा करण्यास प्रोत्साहित करा.
देण्याची भावना जोपासा (Cultivate a sense of giving)
मुलाच्या मनांत देण्याची भावना रुजवा. शेअरिंग तर शाळेतही शिकवला जाणारा विषय आहे. पण या सवयीतून मुलांच्या काय एकूण सर्वांच्याच खर्चावर मर्यादा येते आणि ते बचतीकडे वळतात.
खर्चावर नियंत्रण ठेवा!
मुले काय खरेदी करतात आणि किती खर्च करतात यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पालकांची आहे. जर पालक या अवघड परीक्षेत अपयशी ठरले, तर मुले मोठी झाल्यावर खर्च करण्यासाठी कितीही पैसे असले तरी त्यांना ते पुरणार नाहीत. मुलांना बेजबाबदारपणे पैसे खर्च करण्यास परवानगी देण्याऐवजी त्यांना चांगल्या वागणुकीची आणि पैसे बचत करण्याच्या सवयी लावा. वायफळ गोष्टींवर होणारा खर्च मुलांच्या शिक्षणासाठी वापरा.
कृती आणि शिस्त पाळा (Take action and discipline)
पैसा हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. हे लक्षात घेऊन आपल्या मुलांना पैशांबद्दल शिकवता येईल अशा अनेक गोष्टी किंवा प्रसंग आपल्यापुढे येतात. ज्यातून पालक मुलांना चांगली शिस्त लावू शकतात. चांगल्या गोष्टी कृतीतून शिकवू शकतात. उदाहरणार्थ, मुलांना बँकेत घेऊन जाणे, पैसे मोजायला लावणे, सुट्टे पैशांची बचत (हल्ली बँकेतही लहान मुलासाठी पिगी बँक योजना आहे), शाळेची फी भरताना मुलांना आवर्जुन घेऊन जाणे, असा अनेक उदाहरणातून मुले नक्कीच शिकतील आणि पैशाच्या बाबतीत शिस्तबद्ध होतील.
पालकांना हे कधीही विसरून चालणार नाही की, पालकांची कृती, विचार आणि शिस्त ही मुलांद्वारे प्रकट होत असते. त्यामुळे मुलांना पैशांबाबत चांगल्या सवयी लावणे ही पालकांची जबाबदारी नसून ते त्यांचे कर्तव्यसुद्धा आहे.