• 08 Jun, 2023 01:33

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

El Nino : खरीप पेरणीसाठी बियाणांची उपलब्धता तपासावी, एल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्यांना केंद्राच्या सूचना

El Nino : खरीप पेरणीसाठी बियाणांची उपलब्धता तपासावी, एल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्यांना केंद्राच्या सूचना

El Nino : एल निनोच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना केंद्र सरकारनं राज्यांना दिल्या आहेत. आधीच विविध राज्यांमध्ये अवकाळी पावसामुळे पीकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यात आता एल निनोचं संकट कोसळण्याच्या पार्श्वभूमीवर सरकारनं सावधानतेचा इशारा दिलाय.

मे महिना सुरू असून आगामी जूनमध्ये मॉन्सूनचं (Monsoon) आगमन होणार आहे. मात्र या मॉन्सूनवर एल निनोचा प्रभाव जाणवणार आहे. एल निनोची (El Nino) स्थिती निर्माण होऊन नैऋत्य मोसमी हंगामात भारतात सामान्य पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला होता. खरीप पेरणीच्या हंगामाचं नियोजन करण्यासाठी कृषी-खरीप अभियान 2023 या विषयावर राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. खरीप मोहिमेचं यावेळी उद्घाटन करण्यात आलं. कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा. तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देऊन त्याचा उपयोग उत्पन्न वाढवण्यासाठी केला जावा, कृषी क्षेत्रातल्या कच्च्या मालाच्या (Raw materials) खर्चात कपात करण्यासाठी योजना आखण्याचं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी राज्यांना केलं. कृषी क्षेत्रात नफ्याची हमी ही काळाची गरज आहे. तंत्रज्ञानाचा (Technology) वापर अधिक करून शेतीच्या विकासासाठी प्रयत्न करावा, असं ते म्हणाले.

काय म्हणाले मंत्री?

आजचा तरूण शेतीपासून दूर जात आहे. कारण शेतीत फायदा कमी आणि नुकसान अधिक होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कृषी हा राज्यांचा विषय आहे. राज्य सरकारांनी केंद्रीय कार्यक्रम आणि मिळणाऱ्या निधीचा प्रभावी वापर करावा. वाढत्या लोकसंखेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वाढणारी मागणी लक्षात घेता पीकांची उत्पादकता आणि उत्पादन वाढवण्याची गरज केंद्रीय मंत्र्यांनी व्यक्त केली. आम्हाला केवळ देशांतर्गत बाजारपेठेची मागणी पूर्ण करायची नाही, तर कृषी मालाच्या पुरवठ्यासाठी परदेशातल्या अपेक्षाही पूर्ण कराव्या लागतील, असं ते म्हणाले.

सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन

सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. राज्यांनी द्रव खतांना अग्रक्रम दिला पाहिजे. या नॅनो युरियाची मागणी वाढत आहे. मात्र त्यासोबत पारंपरिक युरियाचा वापर अजूनही कमी झाला नाही. याविषयी कृषीमंत्र्यांनी चिंताही व्यक्त केलीय. केंद्रीय कृषी सचिव मनोज आहुजादेखील यावेळी उपस्थित होते. ते म्हणाले, की हवामान खात्यानं सामान्य मान्सूनचा अंदाज वर्तवलाय. मान्सूनच्या काळात एल निनोची स्थिती असणार आहे. पावसाचं प्रमाण कमी नोंदवलं जाण्याची दाट शक्यता आहे. अशावेळी राज्यस्तरावर पूर्ण तयारी हवी, अशी गरज त्यांनी व्यक्त केली.

पाण्याच्या तापमानवाढीशी संबंधित

दक्षिण अमेरिकेजवळच्या प्रशांत महासागरातील पृष्ठभागाच्या पाण्याच्या तापमानवाढीशी संबंधित असं हे एल निनो आहे. याच्या प्रभावामुळे सामान्यतः मान्सूनचे वारे कमकुवत होतात आणि भारतातलं हवामान कोरडं होतं. त्यामुळे कमी पाऊस होईल, असं गृहीत धरून बियाणांच्या बाबतीत अडचण येणार नाही, याची व्यवस्था राज्यांनी करायची आहे. तसंच यासंदर्भात या महिन्यातच निर्णय घ्यावा, असं त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्रात प्रभाव

महाराष्ट्र राज्याचा विचार केल्यास, एल निनोचा प्रभाव राज्यातल्या विविध जिल्ह्यांवर पडणार आहे. अनेक जिल्ह्यांत आधीच पाण्याची टंचाई आहे. त्यात एल निनोमुळे कमी पाऊस होणार असल्यानं टंचाईत भरच पडणार आहे. दुष्काळाचाही सामना करावा लागू शकतो. त्या पार्श्वभूमीवर पाणी तसंच बियाणांचं नियोजन विविध जिल्ह्यांत नियोजन केलं जातंय.