मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म म्हणून लोकप्रिय असलेल्या ट्विटरने वापरकर्त्यांवर अनेक बंधने लादली आहेत. पेड सबस्क्रिप्शन घेऊन खाते व्हेरीफाय करून घेण्यासाठी युजर्सला सांगण्यात आले आहे. तसेच काल TweetDeck सर्विस देखील आता विनामुल्य नसेल असे कंपनीकडून जाहीर करण्यात आले होते. तसेच व्हेरीफाईड खात्यांना आणि नॉन-व्हेरीफाईड खात्यांना मोजकेच ट्विट वाचता येतील असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. यावर सामान्य युजर्सने जोरदार नाराजी व्यक्त केल्यानंतर कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे.
कंपनीने आपल्या बिझनेस ब्लॉगवर म्हटले आहे की, "आमच्या यूजर बेसची सत्यता तपासण्यासाठी, आम्हाला आमच्या प्लॅटफॉर्मवरून स्पॅम आणि बॉट्स काढून टाकण्यासाठी या उपायोजना कराव्या लागत आहे”.याचाच भाग म्हणून सर्व युजर्सला मोफत सेवा देण्यापेक्षा पैसे देऊन जे युजर्स प्लॅटफॉर्मवर येतील त्यांनाच सेवा देण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. जेणेकरून प्लॅटफॉर्मला हानी पोहोचवणारे बॉट्स आणि स्पॅम दूर करणे सोपे होणार आहे.
ट्विटरच्या नव्या पॉलिसीनुसार कंपनीने ट्विटर युजर्ससाठी काही मर्यादा निश्चित केल्या आहेत. या नव्या पॉलिसीअंतर्गत व्हेरीफाईड खाते असलेल्या युजर्सला एका दिवसात 6000 ट्विटर पोस्ट बघता आणि वाचता येणार आहे. याशिवाय जे नॉन- व्हेरीफाईड खाते असलेल्या युजर्सला एका दिवसात फक्त 600 ट्विटर पोस्ट वाचता आणि पाहता येणार आहेत. या लिमिट नंतर त्यांना ट्विटर पोस्ट दिसणे बंद होणार आहे.
याशिवाय ट्विटरची ही पॉलिसी लागू झाल्यानंतर जे ट्विटर खाते नव्याने बनतील त्यांना केवळ 300 ट्विटर पोस्ट पाहता आणि बघता येणार आहेत. त्यामुळे नव्या युजर्सला तुलनेने कमी सेवा दिल्या जाणार आहेत. या सर्व नियमांचा युजर्सने मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवला आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मॉडेल्सचा वापर करणार
गेल्या काही वर्षांपासून ट्विटरवर वेगवगेळ्या देशांत कारवाई करण्याचे प्रकार घडले आहेत. निवडणुकीत, एखाद्या राजकीय किंवा सामाजिक विषयांतील मुद्द्यावर मतपरिवर्तन करण्याचे काम ट्विटर करते असा आरोप अनेकदा ट्विटरवर होत असतो. हे सर्व प्रकार टाळण्यासाठी ट्विटरने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.
कंपनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मॉडेल्स तयार करून आणि प्लॅटफॉर्मवरील युजर्स आणि त्यांचे लिखाण यावर विविध प्रकारे हाताळणी करणार आहे. तसेच वादाचे मुद्दे टाळण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
ट्विटरचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांनी गेल्या आठवड्यात सांगितले की डेटा स्क्रॅपिंग आणि सिस्टम मॅनिपुलेशन टाळण्यासाठी एका दिवसात युजर्स किती पोस्ट कोण वाचू शकतात यावर त्यांनी तात्पुरती मर्यादा घातली आहे.