सुटीचा हंगाम सुरु झाल्यापासून मागील दोन महिने विमान तिकिटांचे दर गगनाला भिडले आहेत. त्यातच गो फर्स्ट ही विमान कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने इतर कंपन्यांनी भाडेवाढ केली आहे. यामुळे प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. विमान कंपन्यांना दरवाढीबाबत लगाम लावावा अशी मागणी जोर धरत आहे. मात्र केंद्र सरकारने विमान तिकिटांचे दर 33% कमी झाल्याचा दावा केला आहे.
विमान भाडेवाढीवरुन चौफेर टीका होऊ लागल्याने सरकारने या प्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे. नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी नुकताच विमान कंपन्यांच्या प्रमुखांशी चर्चा केली होती. विमान भाडे नियंत्रणात ठेवण्याबाबत शिंदे यांनी कंपन्यांच्या प्रमुखांना सूचना केल्या आहेत. त्यानुसार 1 दिवस आधी बुकिंग करणाऱ्या तिकिटांचे भाडे जवळपास 33% ने कमी झाल्याचा दावा सरकारने केला आहे.
नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार गो फर्स्टच्या दिवाळखोरीनंतर इतर विमान कंपन्यांनी भरमसाठ भाडेवाढ केली आहे.गेल्या महिनाभरापासून गो फर्स्ट एअरलाईन्सची विमान सेवा ठप्प आहे. त्यामुळे इतर विमान कंपन्यांनी संधीचा फायदा उचलला आहे.
सरकारने 10 प्रमुख मार्गांवरील विमान तिकिट दरांचा आढावा घेतला. त्यानुसार काही रुटवर तिकिट दर कमी झाले असल्याचे दिसून आले आहे. सध्या लेह-लडाखमध्ये पर्यटनाचा हंगाम सुरु झाला आहे. त्यामुळे दिल्ली-लेह रुटवरील विमान भाडे प्रचंड वाढले आहे. सरकारने केलेल्या सर्वेक्षणानुसार एक दिवस आधी दिल्ली-लेहसाठी तिकिटाचा दर 14133 रुपये इतका खाली आला आहे. गेल्या आठवड्यात तो 21050 रुपये इतका होता..याशिवाय दिल्ली-पुणे या मार्गावरील विमान भाडे 32% ने कमी झाले आहे. दिल्ली-लेहचा तिकिट दर 28% आणि दिल्ली अहमदाबाद तिकिट दर 28% ने कमी झाला आहे.
मुंबई-दिल्ली या सर्वात बिझी आणि सर्वाधिक मागणी असलेल्या रुटवर विमान तिकिटाचा दर विक्रमी पातळीवर गेला होता.त्यात मात्र आणखी वाढ झाली आहे.या मार्गावर प्रवासाच्या एक दिवस आधी तिकिट बुक करायचे असल्यास प्रवास भाड्यात किमान 29% वाढ झाली आहे.
नुकताच एअरपोर्ट्स कौन्सिल इंटरनॅशनल (ACI) ने आशिया-प्रशांत आणि मध्य पूर्वेतील 10 एव्हिएशन मार्केट्सचा आढावा घेतला. त्यातील 36000 रुटवर सरकारी किती विमान भाडे आहे याचा अभ्यास करण्यात आला. त्यानुसार आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी भारतात सर्वाधिक भाडे असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
भारतातील आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाचे भाडे 41% ने वाढले आहे. यूएईमध्ये आंतरराष्ट्रीय विमान भाडे 34%, सिंगापूरमध्ये 30% आणि ऑस्ट्रेलियामध्ये विमान भाडे 23% वाढले असल्याचे एअरपोर्ट्स कौन्सिल इंटरनॅशनलने म्हटले होते.
साधारण किती दिवस आधी फ्लाईट्स बुकिंग करता येते
- शेवटच्या क्षणी विमान प्रवास करायचा असेल तर प्रवाशांना तिकिटासाठी दुप्पट पैसे मोजावे लागतात. त्यामुळे बहुतांश प्रवासी अॅडव्हान्स बुकिंगला प्राधान्य देतात.
- रेल्वे प्रमाणेच विमान प्रवासासाठी देखील अॅडव्हान्स बुकिंग करता येते.
- इंटरनॅशनल फ्लाईट्ससाठी प्रवाशांना सर्वसाधारणपणे 11 महिने आधीच तिकिट बुक करता येऊ शकते.
- देशांतर्गत प्रवासासाठी देखील 2 महिन्यांपासून 10 महिने आधी तिकिट बुक करता येते.
- महिनाभर आधीच तिकिट बुक केल्यास तिकिट दरात किमान 25% बचत होते.
- अॅडव्हान्स बुकिंग आणि प्रवासामधील कालावधी जितका मोठा तितके तिकिटाचा दर कमी असतो. त्यामुळे प्रवाशाची बचत होते.
- मात्र अॅडव्हान्स बुकिंग करताना शक्यतो प्रवासाचा बेत रद्द करावा लागणार नाही याचाही विचार करायला हवा. अन्यथा कॅन्सलेशन चार्जेसचा भूर्दंड सोसावा लागतो.
- जाणकारांच्या अनुभवानुसार डोमेस्टीक प्रवासासाठी 21 ते 25 दिवस आधी तिकीट बुक करणे योग्य आहे. इंटरनॅशनल फ्लाईट्ससाठी 45-60 दिवस आधी अॅडव्हान्स बुकिंग करणे सर्वोत्तम आहे.