केंद्र सरकारने देशातील लोकांसाठी गेल्या 8-9 वर्षात अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. या योजना पेन्शन, कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी, बँकिंग, विमा इ. क्षेत्राशी निगडित आहे. या योजनांमध्ये प्रधामंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY), जनधन योजना (PMJDY), मुद्रा योजना (PMMY), अटल पेन्शन योजना (APY) आणि वय वंदन योजनेचा (PMVVY) समावेश करण्यात आला आहे. त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY)
केंद्र सरकारने 2014 साली प्रधानमंत्री जन धन योजना सुरू केली. या योजने अंतर्गत देशातील प्रत्येक कुटुंबासाठी बँक खाते उघडण्याच्या उद्देशाने सरकारने ही योजना राबवली होती. या योजनेचा शुभारंभ झाल्यानंतर कोट्यावधी लोकांनी या अंतर्गत बँकांमध्ये झिरो बॅलन्स खाती उघडली. हे खाते उघडल्यावर सरकार विमा संरक्षण, क्रेडिट कार्डची सुरक्षा (credit card security) आणि सरकारी योजनांचे पैसे या खात्यात ट्रान्सफर करते.
प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY)
देशातील लघु उद्योगांना म्हणजेच एमएसएमई क्षेत्राला (MSME) प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये लोकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. ज्याची परतफेड व्यवसाय यशस्वी झाल्यानंतर EMI स्वरूपात करावी लागते. या योजनेच्या माध्यमातून तरुण स्वत:चा व्यवसाय सुरू करून इतरांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतात.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेव्दारे दिल्या जाणाऱ्या कर्जाची रक्कम ही तीन श्रेणींमध्ये विभागण्यात आली आहे. यामध्ये 'बाल', 'किशोर' आणि 'तरुण' यांचा समावेश करण्यात आला आहे. या तिन्ही श्रेणींमध्ये कर्जाची रक्कम ही वेगवेगळी दिली जाते. बाल अंतर्गत 50,000 रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यात येते, तर किशोर अंतर्गत 50,000 ते 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज आणि तरुण श्रेणी अंतर्गत 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यात येते.
प्रधानमंत्री वय वंदन योजना (PMVVY)
भारत सरकारने देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी 4 मे 2017 रोजी प्रधानमंत्री वय वंदना योजना सुरू केली आहे. ही एक पेन्शन योजना आहे. या योजनेंतर्गत 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक जे मासिक पेन्शनचा पर्याय निवडतात त्यांना 10 वर्षांसाठी 8% व्याज मिळेल, जर त्यांनी वार्षिक पेन्शनचा पर्याय निवडला, तर त्यांना 10 वर्षांसाठी 8.3% व्याज मिळेल. प्रधानमंत्री वय वंदन योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या गुंतवणुकीवर सर्वोत्तम व्याजदर उपलब्ध करून दिला जात आहे.
अटल पेन्शन योजना (APY)
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने 2015 मध्ये केंद्र सरकारने अटल पेन्शन योजना सुरू केली. वृद्धापकाळात लोकांना कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली होती. ही योजना प्रामुख्याने असंघटित क्षेत्रातील कामगार वर्गाला डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आली आहे. यामध्ये गुंतवणूक करणारी व्यक्ती वयाच्या 60 वर्षापर्यंत या पेन्शन फंडात गुंतवणूक करू शकते. मॅच्युरिटीनंतर गुंतवणूकदाराला या योजनेतून दरमहा ठराविक मासिक पेन्शन देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY)
2015 साली केंद्र सरकारने प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुरू केली. यामध्ये सहभागी होणाऱ्या लोकांना अपघाती मृत्यू किंवा अपंगत्वावर किमान प्रीमियमवर विमा संरक्षण दिले जाते. या योजने अंतर्गत अपघाती मृत्यू आणि कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 2 लाख रुपयांचे संरक्षण दिले जात आहे. तसेच आंशिक अपंगत्व आल्यास 1 लाख रुपयांचे संरक्षण दिले जाते.
Source: hindi.news18.com