केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आली आहे. येत्या जुलै महिन्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मोठी वाढ केली जाऊ शकते. केंद्र सरकार याबाबत लवकरच घोषणा करू शकते असे जाणकारांचे म्हणणे आहे.
2016 साली केंद्र सरकारने सातवा वेतन आयोग लागू केला होता. सातव्या वेतन आयोगानंतर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ पाहायला मिळाली होती. आता जुलै महिन्यापासून पगारात आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुढील महिन्यापासून केंद्र सरकार कर्मचाऱ्यांचे फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची तयारीत आहे.
फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय? (Fitment Factor)
‘फिटमेंट फॅक्टर’ ही संकल्पना प्रामुख्याने 7 व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या (CPC) अंमलबजावणीशी संबंधित होती. सातवा वेतन आयोग लागू करताना कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात किती वाढ व्हायला हवी यासाठी एक फॉर्म्युला तयार करण्यात आला होता.
फिटमेंट फॅक्टर हा एक आकडा असून तो केंद्र सरकारच्या वेतन आयोगाच्या शिफारशींचे पालन करून कर्मचार्यांचे पगार आणि भत्ते सुधारण्यासाठी वापरला जातो. कर्मचाऱ्यांच्या सुधारित वेतनाची गणना करण्यासाठी कर्मचार्याच्या विद्यमान मूळ वेतनाशी या फिटमेंट फॅक्टरचा गुणाकार केला जातो.
फिटमेंट फॅक्टरसाठी असलेले निकष खालीलप्रमाणे
मूळ वेतन (Basic Pay): फिटमेंट फॅक्टर कर्मचार्यांच्या सध्याच्या मूळ वेतनावर आधारित असतो. कर्मचाऱ्यांचे सुधारित वेतन निश्चित करताना ठरवलेल्या फिटमेंट फॅक्टरने मूळ वेतनाच्या रकमेने गुणाकार केला जातो. त्यामुळे जितके मूळ वेतन अधिक तितके सुधारित वेतन अधिक असा साधासोपा फॉर्म्युला आहे.
महागाई भत्ता (DA): फिटमेंट फॅक्टरमध्ये DA च्या टक्केवारीचा देखील विचार केला जातो आणि मूळ वेतनात ते समाविष्ट केले जाते. डीए हा सरकारी कर्मचार्यांना दिला जाणारा महागाई भत्ता आहे. महागाई दरानुसार हा भत्ता ठरवला जातो.
आधीचा वेतन आयोग (Previous Pay Commission): फिटमेंट फॅक्टरमध्ये आधीच्या वेतन आयोगाच्या शिफारशींचा देखील विचार केला जाती. आधीच्या कमिशनने सुचवलेल्या किमान आणि कमाल वेतनश्रेणीमधील गुणोत्तराचा देखील विचार फिटमेंट फॅक्टर ठरवताना केला जातो.
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू करायची किंवा नाही याचा निर्णय केंद्र सरकार घेत असते. सरकारची आर्थिक स्थिती कशी आहे, देशातील महागाईचा दर, जीडीपी दर किती आहे, या सगळ्यांचा विचार सरकारला करावा लागतो, त्यानंतरच वेतन सुधारणेचा निर्णय घेतला जातो.
फिटमेंट फॅक्टर वाढल्यानंतर पगार किती वाढेल?
सातवा वेतन आयोग लागू झाला तेव्हा कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 6 हजार रुपये निश्चित करण्यात आले होते, मात्र काही काळानंतर किमान वेतन 18 हजार रुपये करण्यात आले होते. यावेळी फिटमेंट फॅक्टर मूळ पगाराच्या 2.57 पट निश्चित करण्यात आला होता.
फिटमेंट फॅक्टर 2.57 वरून 3 पट केला जावा अशी मागणी सातत्याने कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. फिटमेंट फॅक्टर तीन झाल्यास कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 26,000 रुपये होईल.18 हजार किमान पगारासह फिटमेंट फॅक्टरचा गुणाकार केल्यास, कर्मचाऱ्यांच्या पगारात 42 हजारांपेक्षा जास्त वाढ होईल, ज्यामध्ये वेगवगेळ्या भत्त्याचा समावेश होतो. तसेच, फिटमेंट फॅक्टर तिप्पट झाल्यास कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन आणखी वाढणार आहे.