तुम्हाला कुठे फिरायला जायचं असेल, परदेशवारी करायची असेल पण कंपनी तुम्हाला सुट्टी देत नसेल तर अशावेळी काही जण आजारी रजा (Sick leave) टाकतात. मात्र असे लोक अडचणीत येवू शकतात, अशी एक घटना घडलीय. त्यामुळे रजा हवी असेल तर आधी कंपनीकडून मंजूर करूनच सुट्टीवर जावं. घडलेल्या एका घटनेत एक कर्मचारी आजारी रजा घेऊन सुट्टी साजरी करत होता. सुट्टी साजरी झाल्यानंतर तो घरी परतत असताना त्याच्याच एका सहकाऱ्यानं त्याला विमानतळावर पाहिलं आणि कार्यालयात याबाबत कळवलं. संबंधित कर्मचारी (Employee) आजारी नाही. परदेशात फिरण्यासाठी तो खोटं बोलून गेल्याचं त्यानं कंपनीला सांगितलं. हे वृत्त टीव्ही 9नं दिलंय.
Table of contents [Show]
रद्द केली होती रजा
कर्मचाऱ्यासंबंधीची माहिती मिळताच कंपनीनं त्याला तत्काळ कामावरून काढून टाकलं. मात्र हा निर्णय कंपनीलाच महागात पडला. कंपनीला 73 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. आता हे पैसे कर्मचाऱ्याला भरपाई म्हणून कंपनीनं द्यायचे आहेत. चीनची राजधानी बीजिंगमधल्या एका टेक कंपनीशी संबंधित आहे.
एका रिपोर्टनुसार, जुलै 2019मधली ही घटना आहे. रजेसाठी कर्मचाऱ्यानं अर्ज केला. मात्र कामाच्या दबावामुळे आणि मनुष्यबळाच्या कारणास्तव व्यवस्थापकानं त्याची रजा रद्द केली. आपल्याला आपल्या मुलासह चीनच्या दक्षिणेकडच्या हेनान बेटावर जायचं आहे. त्यासाठी आधीच तिकिटे खरेदी केली आहेत, असं कर्मचाऱ्यानं सांगितलं. परंतु तरीही कर्मचाऱ्याला सुट्टी देण्यात आली नाही. विशेष म्हणजे संबंधित कर्मचारी हे नवीन जॉइनर नव्हते तर1998पासून कंपनीत काम करत होते.
विमानतळावर दिसला कर्मचारी
या कर्मचाऱ्यानं नंतर 14 दिवसांच्या आजारी रजेसाठी अर्ज केला. चक्कर येणं आणि सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिस या आजारानं त्रस्त असल्याचं दर्शवणारं वैद्यकीय प्रमाणपत्र त्यांनी दिले. वैद्यकीय प्रमाणपत्रानुसार, एका डॉक्टरांनी बेड रेस्ट आणि मानेचा व्यायाम करण्याचा सल्ला दिला होता. त्यांना चालण्यासही त्रास होत होता. या प्रमाणपत्रानुसार आजारी रजा मंजूर करण्यात आली. मात्र जेव्हा हा कर्मचारी आपल्या मुलासह हैनान विमानतळावर दिसला तेव्हा त्याच्याच कार्यालयातल्या कर्मचाऱ्यानं त्याला पाहिलं आणि कंपनीला कळवलं. कंपनीनंदेखील लगेच कारवाई करत नोकरीवरून काढून टाकलं.
कंपनीला भरपाईचे आदेश
संबंधित कर्मचाऱ्यानं आपला बचाव करताना म्हटलं, की मनोरंजनासाठी नाही तर बरं होण्यासाठी आपण प्रवास करत होतो. त्यानं बीजिंग चाओयांग लवाद आयोगाच्या मदतीनं अर्ज केला. लवादानं कर्मचाऱ्याच्या बाजूनं निर्णय दिला आणि टेक कंपनीला बेकायदेशीरपणे नोकरीवरून काढून टाकल्याबद्दल 73 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले.
कोर्टाचा निर्णय वेगळा
लवादानं निर्णय दिला असला तरी कोर्टानं मात्र वेगळाच निर्णय दिला. कर्मचारी आपल्या कंपनीशी खोटं बोलला. जर कर्मचारी आजारी असेल तर अशावेळी प्रवासाचं काहीच प्रयोजन नव्हतं. त्यामुळे कर्मचाऱ्यासंबंधी कंपनीनं घेतलेला निर्णय योग्य होता. नुकसानभरपाई देण्याचीही गरज नव्हती, असं निरीक्षण बीजिंगच्या थर्ड इंटरमीजिएट पीपल्स कोर्टानं नोंदवलं. कारण जू मौमौ (Xu Moumou) नावाच्या व्यक्तीनं बीजिंगमधल्या थर्ड इंटरमीजिएट पीपल्स कोर्टात कंपनीच्या कारवाईला विरोध केला होता. मात्र एप्रिल 2023च्या मध्यात ती फेटाळण्यात आली आणि जूनं 6,20,000 युआनची (सुमारे 73 लाख रुपये) नुकसानभरपाईही गमावली, जी त्याला आधी देण्यात आली होती.