Car Insurance: पावसाळा सुरू झाला की वाहनमालकांचे टेन्शन वाढते. टेन्शन वाढण्याची कारणे भरपूर आहेत. आपल्याकडील पाणी वाहून नेणारी यंत्रणा, रस्त्यावरून गाड्या स्लीप होण्याचे प्रमाण, गाडीवर पडणाऱ्या झाडांच्या फांद्या अशी अनेक कारणे आहेत. ज्यामुळे गाडीमालक पावसाळ्यात नेहमी धास्तावलेले असतात. कारण यामुळे गाडीचे नुकसान तर होतेच. पण त्याचबरोबर गाडीमालकाच्या जीवाला धोकादेखील निर्माण होतो. त्यामुळे इन्शुरन्स इंडस्ट्रीमधील तज्ज्ञांकडून नेहमीच चांगला कार इन्शुरन्स काढून घेण्याबाबत सांगितले जाते.
मार्केटमध्ये कार इन्शुरन्स कंपन्या बऱ्याच आहेत आणि त्याचे प्रोडक्ट देखील भरपूर आहेत. पण आपली गरज ओळखून कार इन्शुरन्स खरेदी करणे यात खरे शहाणपण आहे. कारण पावसाळ्यातील स्थिती पाहता कार इन्शुरन्समध्ये नैसर्गिक आपत्ती, जसे की, मान्सून पाऊस, चक्रीवादळ, पूर, मुसळधार गारा यामुळे होणारे नुकसान कव्हर केले जाऊ शकते. साधारण इन्शुरन्स कंपन्यांच्या नियमानुसार सर्वच कंपन्या गाडीचे इंजिन आणि इतर गोष्टींचे नुकसान भरून देतात. ज्याचा खर्च खूप असतो.
Table of contents [Show]
नुकसान भरून काढण्यासाठी नियमित इन्शुरन्स पुरेसा ठरतो का?
पण तरीही प्रश्न असा निर्माण होतो की, गाडीचे नुकसान भरून काढण्यासाठी इन्शुरन्स पुरेसा पडतो का? तर त्याचे उत्तर नाही असेच मिळते. कारण पावसाच्या पाण्याच्या पुरात जेव्हा गाडी सापडते. तेव्हा गाडीच्या प्रत्येक भागामध्ये पाणी जाते. त्यामुळे इंजिनाचा एखादा भाग किंवा पार्ट खराब झाला किंवा ऑईल लिकेज झाले तर पॉलिसीमध्ये ते क्लेम करण्याची तरतूद नसते. कारण इंजिन खराब होण्यामागे इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल ब्रेकडाऊन कारणीभूत असते. अशावेळी इलेक्ट्रिकल पार्टस् किंवा इंजिनाचे काही नुकसान झाल्यास त्याची भरपाई मिळावी यासाठी अॅड-ऑन कव्हरेज घेण्याचा सल्ला दिला जातो. कारमालक इंजिन प्रोटेक्टर अॅड-ऑन कव्हर आणि इनव्हॉईस सिक्युरिटी कव्हर घेऊ शकतो. ज्यामुळे कारमालकाला त्या नुकसान भरपाईचा दावा करता येतो.
कार इन्शुरन्स घेताना या गोष्टी नक्की तपासा
इन्शुरन्स प्लॅनची तुलना करा
गाडीसाठी इन्शुरन्स खरेदी करताना वेगवेगळ्या कंपन्यांचे प्लॅन तपासून घ्या. त्यात वेगवेगळे अॅड-ऑन उपलब्ध आहेत का? प्रीमिअमची रक्कम, इन्शुरन्स उतरवलेल्या वस्तुचे मूल्य क्लेम बोनस आदी गोष्टी तपासून घ्या.
क्लेम सेटलमेंट रेशो चेक करा
कोणताही इन्शुरन्स खरेदी करताना त्या कंपनीचा क्लेम सेंटरमेंट रेशो तपासणे गरजेचे आहे. तसेच इन्शुरन्स कंपन्यांनाही क्लेम सेटलमेंट रेशो जाहीररीत्या प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. ज्या कंपन्यांचा क्लेम सेटलमेंट रेशो सर्वाधिक आहे. त्या कंपनीला प्राधान्य द्या.
कंपन्यांची कस्टमर सर्व्हिस तपासा
कार इन्शुरन्स खरेदी करताना इन्शुरन्स देणाऱ्या कंपन्यांच्या कस्टमर सर्व्हिसही चेक करायला पाहिजेत. त्या ग्राहकांना पॉलिसी घेतल्यापासून कशाप्रकारचा अनुभव देत आहेत. याची माहिती घेऊनच आणि ज्या कंपन्या 24 तास सेवा उपलब्ध करून देण्यास तयार आहेत. अशा कंपन्यांना प्राधान्य द्या.
क्लेम प्रोसेस
पावसाच्या पाण्यामुळे गाडीचे नुकसान झाले असेल तर, कारमालकाने सर्वप्रथम इन्शुरन्सचा क्लेम करण्यासाठी कंपनीच्या कॉल सेंटरला फोन करून क्लेमबाबत कंपनीला माहिती देऊ शकता किंवा त्याबाबत तुम्ही कंपनीला मेल पाठवून त्याची माहिती देऊ शकता. त्यानंतर इन्शुरन्स कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊन कागदपत्रे सादर करून रितसर क्लेमचा दावा करू शकता.