Government Schemes Financing Cancer: कॅन्सर! नाव ऐकुनच अंगावर शहारे येतात. पण अलीकडे सर्रास कर्करोगाचे रूग्ण आजुबाजुला दिसून येतात. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (Indian Council Of Medical Research - ICMR) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर प्रिव्हॅन्शन अॅन्ड रिसर्च (National Institute Cancer Prevention and Research) च्या माहितीनुसार 2022 साली 8 लाखाहून अधिक रूग्णांचा मृत्यू झाला आहे. नक्कीच यामधील अधिकतर रूग्णांचा मृत्यू उपचाराअभावी झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण या गंभीर आजारांचा खर्च सर्वसामान्य व्यक्तिंच्या आवाक्या पलीकडचा असतो. यासाठीच केंद्र सरकारकडून अशा स्वरूपाच्या खर्चिक औषधोपचार असलेल्या आजारांसाठी विविध योजने अंतर्गत आर्थिक सहाय्य केले जाते. जाणून घेऊयात अशा काही योजना.
Table of contents [Show]
आरोग्यमंत्री कर्करोग रूग्ण निधी
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालया कडून राष्ट्रीय आरोग्य निधी अंतर्गत आरोग्यमंत्री कर्करोग रूग्ण निधी (Health Minister’s Cancer Patient Fund - HMCPF) उपलब्ध करुन दिला जातो. हा निधी विशेष: दारिद्रय रेषेखालील रूग्णांना दिला जातो.)
या निधीसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या संकेतस्थळावरील फॉर्म भरावा लागतो. त्या फॉर्मवर उपचार करत असलेल्या डॉक्टरची व सरकारी रूग्णालय, प्रादेशिक कॅन्सर उपचार केंद्रावरील वैद्यकीय अधीक्षकांची सही घ्यावी लागते. या अर्जासह रूग्णाचे मिळकतीचे प्रमाणपत्र (Income Certificate) आणि रेशन कार्ड सादर करावे लागते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या संकेतस्थळावर प्रादेशिक कॅन्सर उपचार केंद्राची यादी उपलब्ध आहे.
आरोग्यमंत्री विवेक अनुदान
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ज्या सरकारी रूग्णालयामध्ये मोफत उपचाराची सुविधा नाही अशा ठिकाणी गरिब रूग्णांना 50 हजार पर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते. यामध्ये ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दीड लाखापर्यंत अथवा त्याहून कमी आहे, त्या कुटूंबातील रूग्णांना एकुण खर्चाच्या 70 टक्क्यांपर्यंतचे सहाय्य सरकारकडून केले जाते.
केंद्र सरकारची आरोग्य सुविधा (CGHS)
केंद्र सरकारचे निवृत्त कर्मचारी व त्यांच्या कुटूंबियांना या योजने अंतर्गत कॅन्सर उपचारासाठी निधी उपलब्ध केला जातो. या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य मिळवताना सरकारी रूग्णालयातूनच उपचार करुन घेण्याचे बंधन सरकारकडून घातलेले नाहीये.
राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा योजना
आयुष्यमान भारत अभियाना अंतर्गत, राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा विमा योजनेमध्ये रूग्णालयातील उपचारासाठी प्रत्येक कुटुंबाला 5 लाखापर्यंतचे विमा कव्हरेज दिले जाते.
प्रधानमंत्री राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी
हा निधी मुलत: नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी राखीव असला तरी हृदय विकारासंबंधित मोठ्या सर्जरी, किडणी प्रत्यारोपण वा कॅन्सर रूग्णांच्या उपचारासाठी ही या निवारण निधीतून आर्थिक सहाय्य दिले जाते.
राज्य सरकारद्वारे दिला जाणारा निधी
कॅन्सरग्रस्त रूग्णांच्या उपचारासाठी राज्य सरकारकडूनही सरकारी रूग्णालयात उपचार घेत असल्यास 1 लाखापर्यंतचे सहाय्य दिले जाते. यासाठी रुग्णांना अर्जासोबत, रेशन कार्ड देखील सरकारी रूग्णालयात सादर करावे लागतात.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी
मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून ही गरिब कुटुंबातील कॅन्सर रुग्णांना उपचारासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. तेव्हा कोणताही गंभीर आजार असल्यास घाबरून जाण्याऐवजी सरकारी योजनांची सविस्तर माहिती घेऊन वेळेवर उपचार करून घेणे आवश्यक आहे.
Source - https://bit.ly/3Gt4tGL