Business Idea: कोरोना काळात अनेकांना नोकरी गमवावी लागली होती. त्यावेळी अनेकांनी उदरनिर्वाहासाठी छोट्या-मोठ्या व्यवसायाची सुरूवात केली होती. त्यात सर्वाधिक व्यवसाय हे घरगुती खाद्यपदार्थ बनवून विकण्याचे आहेत. यात प्रामुख्याने केक, आईस्क्रीम, पेप्सी, पापड, चिप्स असे खाद्यपदार्थ आहेत. अनेक महिलांनी कोरोनामुळे आलेले संकट दूर करण्यासाठी हे उद्योग सुरू केले होते. पण अजूनही त्यांचा व्यवसाय व्यवस्थित सुरू आहे. म्हणजेच घरगुती स्तरावर सुरू केलेल्या काही व्यवसायांना लोकांकडून पसंती मिळत असल्याचे दिसून येते. यात असाच एक व्यवसाय आहे; तो म्हणजे बटाटा चिप्स तयार करून विकणे. या व्यवसायातूनही भरघोस नफा मिळवता येऊ शकतो.
बटाट्याचे चिप्स तयार करण्यासाठी तशी खूप सामग्री लागत नाही. यासाठी मोठ्या आकाराचे बटाटे, वेफर्स तळण्यासाठी किंवा स्टोअर करण्यासाठी मोठी भांडी आणि तेल, मीठ आणि मिरची पावडर अशाप्रकारचा कच्चा माल लागतो. तुम्हाला जर घरच्या घरी छोट्या स्वरूपात हा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर तुम्ही कमी खर्चात करू शकता. त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी बटाट्याचे चिप्स करून ते वाळवून ठेवावे लागतील. त्यानंतर तुम्हाला हवे तसे पॅकिंग करून तुम्ही विकू शकता. यासाठी 10 हजार रुपयांच्या आत खर्च येऊ शकतो.
Table of contents [Show]
व्यावसायिक पातळीवर किती खर्च येऊ शकतो?
बाजारात सर्वसाधारण बटाट्याचा भाव 1,200 रुपये प्रति क्विंटल आहे. चिप्स बनवण्यासाठी आवश्यक तेलाची किंमत 120 ते 150 रुपये प्रति लिटर आहे. मिठाची किंमत 18 रुपये प्रति किलो आणि तिखटाची किंमत 180 रुपये किलो आहे. चिप्स बनवण्याच्या मशीनचा वापर करून हा व्यवसाय अधिक वेगाने करता येईल. यासाठी बटाटा कापण्याचे यंत्र वापरले जाते. जर तुम्हाला हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर स्थापित करायचा असेल, तर तुम्हाला मोठ्या मशीनची गरज भासू शकते, जरी हा व्यवसाय लहान मशीन किंवा हँड स्लायसरच्या मदतीने देखील सुरू केला जाऊ शकतो. चिप्स बनवण्यासाठी सर्वात लहान मशीनची किंमत 35,000 रुपये आहे.
घरगुती चिप्स बनवण्याचा व्यवसाय खर्च आणि नोंदणी
या व्यवसायाची एकूण किंमत 80,000 ते 1,00,000 पर्यंत जाऊ शकते. यंत्र बसवायचे नसेल तर हा खर्च खूप कमी होतो, पण कमी उत्पादनामुळे नफाही कमी होतो. जर व्यवसाय लहान आकाराचा असेल, तर तुम्ही जास्तीत जास्त 10,000 रुपयांपासून हा व्यवसाय सुरू करू शकता. खाद्यपदार्थ असल्याने व्यवसायाची नोंदणी अनिवार्य आहे. तुम्ही तुमचा व्यवसाय भारत सरकारच्या MSME अंतर्गत नोंदणी करू शकता. याशिवाय तुम्हाला व्यापार परवाना घेणे आवश्यक आहे. यानंतर, तुम्हाला तुमच्या व्यावसायिक घटकाच्या नावाने बँक खाते आणि पॅन कार्ड घेणे आवश्यक आहे. सरकारच्या अन्न विभागात चिप्सची चाचणी करून तुम्हाला FSSAI चा परवाना देखील मिळवावा लागेल.
नफा किती मिळू शकतो?
या व्यवसायातून चांगला नफा मिळू शकतो. नफा तुमच्या चिप्सच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो. तुम्ही मशीन वापरल्यास तुम्हाला मासिक 30,000 ते 40,000 चा नफा मिळू शकतो. ग्रामीण भागातील दुकानदारांना माल पुरवून देखील तुम्ही यात चांगला नफा मिळवू शकता. तुमच्या प्रॉडक्टची गुणवत्ता चांगली असेल आणि लोकांना ते आवडले तर नफा कमी होणारच नाही. पण, नफा पूर्णतः तुमच्या प्रॉडक्टवर अवलंबून आहे.
मार्केटिंग कसं कराल?
सध्या मार्केटिंगसाठी सर्वाधिक वापरले जाणारे प्लॅटफॉर्म म्हणजे सोशल मीडिया. त्यावर तुम्ही तुमच्या प्रॉडक्टची मार्केटिंग करू शकता. रील्स, पोस्टच्या माध्यमातून तुम्ही ग्राहकांपर्यंत मॅसेज पोहचवून ग्राहक वाढवण्यात मदत घेऊ शकता. घरगुती वस्तूंना जास्तीत जास्त मागणी सद्यस्थितीमध्ये दिसून येत आहे. त्याचबरोबर काही दिवस तुम्ही स्वतः प्रॉडक्ट बाहेर गावी नेऊन विक्री करू शकता, लोकांना तुमचे प्रॉडक्ट आवडल्यास तुम्ही पार्सलने सुद्धा पाठवू शकता.