एज्युटेक क्षेत्रात अल्पावधीत यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या स्टार्टअप कंपनी बायजुला(BYJU) लागलेले ग्रहण काही केल्या सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. आता कंपनीला कर्ज देणाऱ्या देणेकऱ्यांनी बायजुवर तब्बल 4400 कोटी रुपये अमेरिकन स्थित एका तीन वर्ष जुन्या हेज फंडामध्ये लपवल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे बायजुच्या अडचणीत वाढ झाली आहे. मियामी डेड काऊंटी कोर्टात देणेकऱ्यांनी बायजूवर हे आरोप केले आहेत.
देणेकऱ्यांचे गंभीर आरोप-
बायजूला कर्ज देणाऱ्यांनी केलेल्या आरोपानुसार बायजूची उपकंपनी अल्फा इंकने 2022 मध्ये कॅम्पशाफ्ट कॅपिटल फंडामध्ये (Camshaft Capital Fund) 53.3 कोटी डॉलरची गुंतवणूक केली आहे. विलियम सी मॉर्टन या 23 वर्षीय व्यक्तीने ही फर्म सुरू केली होती. विशेष म्हणजे या फर्मसाठीचे त्याने कोणतेही प्रशिक्षण घेतले नाही, अशा केवळ तीन वर्ष जुन्या फर्ममध्ये बायजूने तब्बल 533 मिलियन डॉलर रुपये लपवले असल्याचा आरोप कर्जदारांनी केला आहे. तसेच कर्जदारांच्या थकबाकीची रक्कम द्यावी लागू नये म्हणून बायजूने मोठ्या प्रमाणात रक्कम हेज फंडामध्ये लपवल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात देणेकऱ्यांनी मियामी डेड काऊंटी कोर्टात आरोपाची कागदपत्रे दाखल केली आहेत.
फसवणुकचा हेतू असल्याचा आरोप-
बायजूने कर्जदारांची फसवणूक करण्यासाठी आणि कर्जाची परतफेड करण्यास उशीर करण्याच्या हेतूनेच फंडामध्ये पैसे वळवले आहेत, असा युक्तीवाद मियामी-डेड कर्जदारांच्या वतीन काउंटी कोर्टात करण्यात आला आहे. दरम्यान, बायजू त्यांच्या परदेशातील व्यवसायांच्या विक्रीतून कर्जदारांची संपूर्ण कर्जाची परतफेड करण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती समोर येत आहे. यासाठी तो आपल्या कर्जदारांच्या संपर्कात असल्याचेही म्हटले जात आहे. बायजूने 2021 मध्ये 1.2 अब्ज डॉलरचे कर्ज घेतले होते.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            