Byju's Aakash IPO: एज्युटेक स्टार्टअप कंपनी असलेल्या बायजू-आकाश कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने 2024च्या मध्यावर आयपीओ आणण्याची घोषणा केली. बायजू-आकाशच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची सोमवारी (दि. 5 मे) याबाबत बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनीकडून आयपीओसाठी मर्चंट बँकेची निवड करण्याची शक्यता आहे. कंपनीने यापूर्वी 2023 मध्येच आयपीओ आणण्याची योजना आखली होती. पण कंपनीने आता पुढील वर्षाच्या मध्यंतरीच्या काळात आयपीओ आणण्याचा निर्णय घेतला आहे.
IPO म्हणजे काय?
शेअर बाजारात नोंदणी नसलेली म्हणजेच असूचीबद्ध कंपनी जेव्हा प्रथमच लोकांसाठी सिक्युरिटीज किंवा शेअरच्या विक्रीद्वारे निधी उभारण्याचा निर्णय घेते तेव्हा प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (Initial Public Offering -IPO) म्हणजेच आयपीओ जाहीर करते. आयपीओच्या माध्यमातून कंपन्या त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करतात. यातून कंपनीला भांडवल मिळते. ज्याचा उपयोग कंपनी वेगवेगळ्या गोष्टींसाठी करते.
मनीकंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने आपल्या एका अहवालात म्हटले आहे की, बायजू-आकाश कंपनी लवकरच आपले टेस्ट प्रिपेरेशन युनिट (Test Preparation unit) आणणार आहे. त्याचबरोबर कंपनी आयपीओ आणण्याची तयारी करत आहे. आयपीओच्या माध्यमातून कंपनी जवळपास 1 अब्ज डॉलर उभे करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.
बायजूने एप्रिल, 2021 मध्ये 7100 कोटी रुपयांमध्ये आकाश कंपनी खरेदी केली होती. बायजूने आकाशची मालकी मिळवल्यानंतर गेल्या 2 वर्षात बायजूच्या महसुलात जवळपास 3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आकाश एज्युकेशन कंपनी 2023-24 मध्ये महसुलाचा 4000 कोटी रुपयांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. यामध्ये कंपनीचे ऑपरेटिंग प्रॉफिट (EBITDA) जवळपास 900 कोटी रुपये असण्याची शक्यता आहे.
आकाश एज्युकेशन कंपनीच्या देशभरात सुमारे 325 शाखा आहेत. या शाखांमधून जवळपास 4 लाखांहून अधिक विद्यार्थी तयारी करत आहेत. त्यात आता ऑनलाईन टेस्ट प्रिपेरेशनची मागणी वाढणार असून, त्याचा बायजू-आकाश कंपनीला नक्कीच फायदा होऊ शकतो. बायजू या आयपीओच्या माध्यमातून आकाशचे इन्फ्रास्ट्रक्चर उभे करणार असून, तसेच मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांसाठी उच्च प्रतिच्या टेस्ट प्रिपेरेशनची योजना राबवणार आहे.