Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Online Scam: दिल्लीतील 200 कोटींचा वर्क फ्रॉम होम घोटाळा काय आहे?

work from home scam

Image Source : www.bestlifeonline.com

Online Scam: दिल्लीतील तंत्रज्ञानात हुशार असलेल्या व्यक्तींच्या टोळीने वर्क फ्रॉम होमची नोकरी देण्याचे आमिष दाखवत तब्बल 30 हजार व्यक्तींना फसवले. त्यांनी तब्बल 200 कोटींचा घोटाळा केला आहे, एका महिलेने त्यांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केल्यामुळे हा घोटाळा उघडकीस आला आहे.

Online Scam: 'वर्क फ्रॉम होम, रिमोट जॉब - फक्त दिवसाचे सहा तास काम करा आणि 25 हजार कमवा' अशा आशयाच्या अनेक जाहिराती फेसबूक, इन्स्टाग्रॅम, वेबसाईट किंवा अॅपमधील इनसाईड पोस्टरवर पाहायला मिळतात. बऱ्याचदा, सुशिक्षित बेरोजगार अशा आमिषाला भुलतात. वर्क फ्रॉम होमच्या फसव्या जाहिरातींद्वारे, दिल्लीमधील टोळीने 200 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे उघडकीस आले आहे, याद्वारे 30 हजार तरुणांची फसवणूक झाली असल्याचेही समोर आले आहे.

वर्क फ्रॉम होम घोटाळा काय आहे? (What is a work from home scam?)

26 सप्टेंबर 2022 रोजी एका महिलेने वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसात दाखल केली होती. त्या महिलेने इन्स्टाग्रॅमवर वर्क फ्रॉम होमची जाहिरात पाहिली होती, त्यात दिवसाला 15 हजार रुपये कमवा, असे लिहिलेले होते. त्या महिलेने नोकरीसाठी जाहिरातीत दिलेल्या संकेतस्थळावर नोंदणी केली. तेथे तिला सेल्स  विभागात ज्युनिअर सेल्स एक्झिक्युटीव्ह म्हणून काम देण्यात आले, तिला ऑनलाईन स्टोअरचा सेल वाढवण्याचे काम होते. मात्र तिला एक काम करण्यासाठी एक अट देण्यात आली होती, ऑनलाईन स्टोअरवरती ज्या प्रोडक्ट्सवर घसघशीत डिस्काऊंट आहे त्यातील विशिष्ट प्रोडक्ट विकत घेणे बंधनकारक करण्यात आले होते. चार वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शनद्वारे, तिने वस्तू खरेदी केल्या, मात्र तिच्या लगेचच लक्षात आले की ई-वॉलेटमधील सर्व पैसे वजा झाले आहेत आणि बँक खात्यातून 1 लाख 20 हजार रुपयेही वजा झाले आहेत, फसवणू झाली असल्याचे लक्षात आल्यावर महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली. याच तक्रारीवरुन पुढे पोलिस, दिल्ली टोळीपर्यंत पोहोचले.

दिल्लीतील सायबर पोलीस आयुक्त, यशपाल सिंह यांच्या नेतृत्त्वाखाली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात केली. तपासात लक्षात आले की हा भामट्यांचा फोन नंबर परदेशी आहे, तर टेलिग्रॅम, इन्स्टाग्रॅम आयडी बिजिंग अर्थात चीनमधील आहे. बँकेद्वारे व्यवहाराची चौकशी केल्यावर समजले की महिलेने बनावट कंपनीत पैसे भरले आहेत. तसेच त्या संकेतस्थळाच्या ट्रॅन्झॅक्शन अकाऊंटला रोजचे तब्बल पाच ते दहा कोटी जमा होत असल्याचे आढळले. या तक्रारीनंतर या वर्क फ्रॉम होम घोटाळ्यातील एक एक सत्य बाहेर येऊ लागले.

पोलिसांनी गुन्ह्यातील संशयित अभिषेक गर्ग, सतीश यादव आणि संदीप महाला यांना अटक केली. त्यानंतर टोळीचे धागेदोरे थेट मुंबई, हरियाणा, पंजाब, हैद्राबादमध्ये आढळून आले. अभिषेक हा मुख्य सूत्रधारानंतरचा महत्त्वाचा माणूस असून तो सर्व तांत्रिक बाबी सांभाळत होता. मुख्य सूत्रधार जॉर्जिया येथील होता. तर, सतीश यादव हा दिल्ली विद्यापीठातील पदवीधर, जो मोबाईल शॉप्समध्ये मोबाईल रिपेअरींचे काम करत होता. संदीप महाला हा पेटीएम कंपनीचा उपव्यवस्थापक होता. या सर्व तंत्रज्ञानात प्रगत असलेल्या व्यक्ती, एकत्र येऊन वर्क फ्रॉम होम घोटाळा केला.

दिल्लीतील या टोळीने ई-कॉमर्स संकेतस्थळे, सोशल मिडिया आणि ॲपवरुन वर्क फ्रॉम होमच्या विविध जाहिराती प्रसिद्ध केल्या. या फसव्या जाहिरातींच्या जाळ्यात अनेक सुशिक्षित मात्र बेरोजगार असलेले तरुण अडकले. या टोळीने त्यांना काम देण्यापूर्व त्यांच्याकडून विविध मार्गाने पैसे बळकावले. कोणाकडून रजिस्ट्रेशन फी म्हणून, कोणाकडून एजंट फी म्हणून, तर कोणाला प्रोडक्ट खरेदी करायला लावून पैसे घेतले. या भामट्यांनी तब्बल 30 हजार तरुणांना फसवले होते, त्यांच्याकडून साधारण 200 कोटी रुपये बळकावले असल्याचे त्यांनी पोलीस जबाब कबूल केले आहे. या भामट्यांनी संपर्क साधण्यासाठी वापरलेले अकाऊंट्स चीनमधील आहेत, तर आर्थिक व्यवहार दुबईतून केला, मुख्य सूत्रधार जॉर्जियात आहे. हा वर्क फ्रॉम होम 200 कोटींचा घोटाळा आंतरराष्ट्रीय आहे. सध्या ते तिघे अजून अटकेत आहेत, मात्र या टोळीत आणखीही काही भामटे असू शकतात असा पोलिसांना संशय आहे.

काय काळजी घ्यावी? (What needs to be taken care of?)

वर्क फ्रॉम होमच्या संधी शोधत असल्यास आपण सावध राहावे. वर्क फ्रॉम होमच्या सोशल मिडियावरील किंवा इतर वेबसाईट, अॅपवरील जाहिरातींपासून दूर राहिले पाहिजे. नोकरी शोधण्याच्या अधिकृत वेबसाईट्सचा आधार घेऊन त्यावरुन वर्क फ्रॉम होमच्या संधी शोधाव्यात. जरी सोशल मिडियावरील जाहिरात चांगली वाटली, तरी संबंधित कंपनीची गुगलवर, आजूबाजूच्या व्यक्तींमध्ये चौकशी करावी. तसेच नोकरी सुरू करण्यापूर्वी कोणत्याही स्वरुपात त्या कंपनीशी आर्थिक व्यवहार करू नये. बँक खात्याची माहिती, ओटीपी, ई-वॉलेट किंवा युपीआयबाबतचा तपशील शेअर करू नये, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी सांगितले आहे.