तुम्हाला देखील वेगवेगळ्या क्रिएटिव्ह डिझाईन बनवण्याची आवड असेल, तर तुम्ही नोकरी ऐवजी घरबसल्या स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. मात्र त्यासाठी तुम्हाला ग्राफिक डिझाईनचा डिप्लोमा कोर्स (Graphic Design Diploma Course) करावा लागेल. या कोर्सच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या डिजिटली पोस्टर, बॅनर, निमंत्रण पत्रिका, व्हिजिटिंग कार्ड, लीफलेट, बुकलेट इ. गोष्टींचे डिजिटल डिझाईन बनवू शकता. ज्याच्या बदल्यात क्लायंट तुम्हाला पैसे देईल.
हल्ली लग्न समारंभात, बारशात किंवा वाढदिवसाला देखील बॅनर, पोस्टर किंवा शुभेच्छा देणारे सोशल मीडिया क्रिएटिव्ह बनवून घेतले जाते. वेगवेगळ्या कंपन्या आपल्या उत्पादनांची जाहिरात सोशल मीडियावर सतत करत असतात. त्यासाठी ते डिझाईन बाहेरून बनवून घेतात. सध्या सर्वच व्यवसाय डिजिटली विकसित होत असल्याने तुम्हाला सतत काम मिळू शकते आणि तुम्ही बक्कळ कमाई करू शकता. मात्र हा व्यवसाय करताना किती गुंतवणूक करावी लागेल? त्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
डिझाईन बनवण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक
सध्या डिजिटल मार्केटिंग क्षेत्र अतिशय वेगाने विकसित होत आहे. प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या व्यवसायाला डिजिटली विकसित करत आहे. तुम्हाला हा व्यवसाय करण्यासाठी ठराविक सॉफ्टवेअर शिकणे गरजेचे आहे. ज्यामध्ये कोरल ड्रॉ (Coral Draw), फोटोशॉप (Photoshop), इलेस्ट्रेटर (illustrator) आणि व्हिडीओ बनवण्यासाठी प्रीमियर प्रो सीसी (Premiere Pro CC) सॉफ्टवेअरचा समावेश करण्यात आला आहे. आजकाल ही सॉफ्टवेअर एकाच कोर्समध्ये शिकवली जातात. ज्याचा बेसिक आणि मास्टर असा प्रोग्राम कोर्स तयार केला जातो. याचा कालावधी 6 महिन्यापासून ते 2 वर्षापर्यंत असतो. बेसिक क्लास करून देखील तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. बेसिक कोर्स करण्यासाठी तुम्हाला किमान 40 हजार रुपये खर्च येईल.
गुंतवणूक किती करावी लागेल?
हा व्यवसाय तुम्ही घरबसल्या सुरू करू शकता. त्यासाठी तुम्हाला सुरुवातीच्या टप्प्यात कोणतेही ऑफिस किंवा जागा घेण्याची गरज नाही. तुम्हाला एक कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप खरेदी करावा लागेल. ज्याच्यावर तुम्ही काम करू शकता. हा पीसी किंवा लॅपटॉप जवळपास 50,000 पासून ते 1 लाख रुपयांच्या दरम्यान खरेदी करता येतो. याशिवाय कोरल ड्रॉ, फोटोशॉप, इलेस्ट्रेटर, प्रीमियर प्रो सीसी यांचे पेड सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल. हे सबस्क्रिप्शन तुम्ही मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर खरेदी करू शकता. त्यानुसार त्याचे चार्जेस ठरतील.
टेम्पलेट तयार करा
काही निवडक गोष्टींसाठी वेगवेगळ्या डिझाईनची टेम्पलेट तयार करून ठेवा. त्यामधील मजकूर बदलला की नवीन क्रिएटिव्ह तयार होते. असे टेम्पलेट लग्न, बारसे, जावळ, साखरपुडा अशा समारंभासाठी उपयोगी पडतात. क्लायंट बऱ्याच वेळा पूर्वी केलेल्या कामाचा दाखला मागतात किंवा त्यांना डिझाईन पाहायची असते. अशा वेळी टेम्पलेट असतील तर फायदा होतो. क्लायंटने डिझाईन फायनल केली, तर लगेचच मजकूर बदलून कमी वेळात काम पूर्ण करता येते. शिवाय तुमचे अतिरिक्त कष्टही वाचतात.
सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहा
डिजिटली व्यवसाय उभारताना तुम्हाला तुमचे सोशल मीडिया अकाउंट तयार करायला हवे. ज्यावर तुम्ही केलेले काम पोस्ट करणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या क्रिएटिव्ह पोस्ट आणि व्हिडीओ तुम्ही फेसबुक, इंस्टाग्रामवर शेअर करू शकता. जिथून तुम्हाला काम मिळण्यासाठी मदत होईल आणि तुमचे काम लोकांपर्यंत पोहचेल.
माफक दर
तुमच्याकडे ज्या डिझाईनचे टेम्पलेट तयार आहेत, त्याचा दर हा सुरुवातीच्या टप्प्यात कमीत कमी ठेवा. इतर स्पर्धकांच्या तुलनेत तुमचा दर कमी असेल, तर ग्राहक तुमच्याकडे खेचले जातील. हे दर वेगवेगळ्या क्रिएटिव्हनुसार वेगवेगळे ठेवा. साधारणपणे 250 रुपयांपासून ते 5000 रुपयांपर्यंत तुम्ही डिझाईन चार्ज करू शकता.
प्रिंटिंगसाठी इतर वेंडर्ससोबत टायप करा
तुम्ही डिजिटली जरी व्यवसाय करणार असला, तरीही प्रिंटिंग प्रेस असणाऱ्या इतर वेंडर्स सोबत टायप करणे गरजेचे आहे.आजही व्हिजिटिंग कार्डची प्रिंट काढली जाते. लग्नपत्रिका छापल्या जातात आणि बॅनर प्रिंट केले जातात. त्यामुळे प्रिंटिंग करणारे वेंडर्स तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. जर तुमच्याकडे ही सुविधा नसेल, तर ग्राहक तुम्हाला काम देताना खूपदा विचार करतील. ग्राहक तुटू नये यासाठी इतर वेंडर्स सोबत टायप असणे गरजेचे आहे. यामुळे तुमचा व्यवसाय देखील वाढेल.