Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Business Idea: नोकरीसोबत जोडधंदा म्हणून सुरू करता येईल, बिस्किटे बनवण्याचा व्यवसाय; जाणून घ्या सविस्तर माहिती

biscuit Business

Image Source : www.foodsafetyhelpline.com

Business Idea: लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच बिस्किटे प्रचंड आवडतात. म्हणूनच तर आपण पाहुणचार करताना किंवा पाहुण्यांच्या घरी जाताना बिस्किटे घेऊन जातो. याच बिस्किटांचा व्यवसाय कसा उभारायचा आणि त्यातून दरमहा लाखो रुपयांची कमाई कशी करायची, ते जाणून घेऊयात.

तुम्हाला नोकरीसोबत जोडधंदा करायची इच्छा आहे का? जर असेल, तर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्य घरबसल्या बिस्कीट बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकतात. आपल्या दररोजच्या नाष्ट्यामध्ये बिस्कीट हे असतेच. लहानांपासून ते अगदी वयोवृद्ध लोकांना बिस्कीट खायला आवडते. आपण कोणत्याही पाहुण्यांच्या घरी जाताना खाऊ म्हणून बिस्किटंच घेऊन जातो. थोडक्यात काय किरणामालाच्या दुकानापासून ते बेकारीपर्यंत प्रत्येक दुकानात आपल्याला बिस्किटे विक्रीसाठी पाहायला मिळतात. घरबसल्या बिस्कीट बनवण्याचा व्यवसाय सुरू करून तुम्ही स्थानिक दुकानदारांशी नेटवर्क वाढवून हा व्यवसाय मोठा करू शकता आणि त्यातून लाखो रुपयांची कमाई करू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी गुंतवणूक किती करावी लागेल, कोणत्या गोष्टींची गरज आहे, जाणून घेऊयात.

व्यवसायाचे रजिस्ट्रेशन करा

कोणत्याही व्यवसायाचे रजिस्ट्रेशन (Registration) करणे गरजेचे आहे. हे रजिस्ट्रेशन वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये असू शकते. जसे की, प्रोपरायटरशिप, पार्टनरशिप किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. याशिवाय तुम्हाला ट्रेड लायसन्सची आवश्यकता लागू शकते. हे लायसन्स काढण्यासाठी जवळच्या सरकारी विभागातून किंवा महानगरपालिकेच्या कार्यालयातून माहिती मिळू शकते.

बिस्कीट हा एक प्रकारचा खाद्यपदार्थ आहे. कोणत्याही खाद्यपदार्था संदर्भात व्यवसाय सुरू करण्यापूर्वी व्यावसायिकाकडे त्याचे अधिकृत लायसन असणे गरजेचे आहे. हे लायसन ऑनलाईन देखील काढता येते. त्यासाठी FSSAI (Food Safety and Standards Authority of India) या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन सर्व प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. याशिवाय तुम्ही मोठ्या आणि व्यावसायिक स्तरावर हा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर GST रजिस्ट्रेशन करून घेणे गरजेचे आहे.

कोणत्या सामग्रीची आवश्यकता लागते?

बिस्कीट बनवण्याचा व्यवसाय करण्यासाठी कच्चा माल म्हणून मैदा, दूध, साखर, मिल्क पावडर, बटर, वेगवेगळे इसेंस, ग्लुकोज, काजू, बदाम, पिस्ता, जिरे आणि मीठ इत्यादी गोष्टींची आवश्यकता असते. या सर्व गोष्टी नजीकच्या किराणा स्टोअरमधून खरेदी करता येऊ शकतात.

तसेच बिस्कीट तयार करण्यासाठी किमान 3 - 4 प्रकारच्या मशीनची गरज लागते. ही मशीन तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार विकत घेऊ शकता. बिस्किटांचे मिश्रण मिक्स करण्यासाठी  मिक्सर मशीनचा वापर केला जातो. ही मशीन वेगवेगळ्या क्षमतेमध्ये जसे की, 25 ते 100 किलोमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही तुमची उत्पन्न क्षमता निर्धारित करून त्यानुसार मशीनची खरेदी करू शकता. 25 किलो क्षमतेची मशीन 30,000 रुपयांपासून खरेदी करता येते.

त्यानंतर आवश्यकता असते ती बिस्कीट ड्रॉपिंग मशीनची. ही मशीन वेगवेगळ्या आकारातील आणि वजनातील बिस्किटे बनवण्यासाठी मदत करते. या मशीनच्या क्षमतेनुसार बिस्किटांचे उत्पादन निश्चित केले जाऊ शकते. तुम्ही मार्केटमधून 6 किंवा 9 रो ची मशीन खरेदी करू शकता. ज्याची क्षमता 150 किलो ते 250 किलो प्रति तास असते. ज्याची किंमत 2 लाखापासून सुरू होते.

‘कमर्शिअल ओव्हन’ या मशीनचा उपयोग बिस्कीटे भाजण्यासाठी केला जातो. पूर्वी बिस्किटे भट्टीत भाजली जायची. आता भट्टी ऐवजी इलेक्ट्रिक आणि गॅस स्वरुपात या मशीन उपलब्ध झाल्या आहेत. या मशीनची किंमत अंदाजे 75 हजारापर्यंत आहे.

‘वजन काटा’ हा ही तितकाच महत्त्वाचा भाग आहे. बाजारात मिळणाऱ्या व्यावसायिक वजन काट्याची किंमत 1 हजारापासून 10 हजारापर्यंत आहे. त्याचबरोबर बिस्कीट बनवण्याचा व्यवसाय व्यावसायिक स्तरावर करायचा असेल, तर त्यासाठी काही कामगारांची मदत लागू शकते किंवा घरातील सदस्यांची मदत घेऊनही सुरूवात करता येऊ शकते.

पॅकेजिंगचा खर्च किती?

बिस्किटे थंड करून त्यांना हवाबंद पॅक करावे लागेल. जर ती नीट हवाबंद झाली नाहीत, तर बिस्किटे मऊ पडून खराब होऊ शकतात. बिस्किटांचे पॅकिंग मॅन्युअली देखील केले जाऊ शकते. बिस्किटांच्या उत्पादन क्षमतेनुसार पॅकेजिंगसाठी किती लोक लागतील हे निश्चित केले जाते.

बिस्किटे पॅक करण्यासाठी ब्रॅण्डिंगनुसार पॅकेजिंग मटेरिअल वापरावे लागेल. यामुळे उत्पादनाचे ब्रॅण्डिंगही होते आणि ते दिसायला आकर्षक ही असेल. एक पॅकेजिंग बॅग साधारण 1 ते 2 रुपयात ब्रॅण्डिंगच्या नावासह प्रिंट करून मिळेल. मोठ्या क्वांटिटीमध्ये पॅकेजिंग मटेरियल तयार करून घेतले, तर ते स्वस्तात मिळू शकेल.

प्रशिक्षणाचा खर्च किती?

एखाद्याला या व्यावसायातील बारकावे समजून घ्यायचे असतील, तर त्याला बेकरी प्रोडक्ट्सचे प्रशिक्षणही घेता येऊ शकेल. त्या प्रशिक्षणात फक्त बिस्कीट नाही, तर इतर बेकरी प्रोडक्ट कसे तयार करतात हे देखील शिकवले जाते. याची फी साधारणतः 2,500 पासून ते 10,000 रुपयांपर्यंत असते. याचे प्रशिक्षण घेतल्याने तुम्ही तुमच्या कामगारांना देखील मार्गदर्शन करू शकता.

गुंतवणूक किती करावी लागेल?

बिस्कीट बनवण्याचा हा व्यवसाय छोट्या स्तरावर सुरू करण्यासाठी किमान 7 ते 8 लाख रुपये गुंतवावे लागतील. त्यासोबतच 500 ते 1,000 स्केवर फुटाच्या जागेची आवश्यकता असेल. या जागेत कच्चा माल, पक्का माल आणि मशीन्स ठेवता येतील. यासाठी पंतप्रधान मुद्रा (PM Mudra Scheme) योजनेतून कर्ज स्वरूपात आर्थिक मदत मिळू शकते.

बिस्कीट हे लोकांच्या दैनंदिन आहारातील महत्त्वाचा खाद्यपदार्थ बनला आहे. ही संधी लक्षात घेता, जर तुम्ही एका दिवसाला 400 किलोचे उत्पादन करत असाल, तर कच्चा माल आणि इतर गोष्टींचा खर्च पकडून तुम्ही बिस्किटे 100 ते 105 रुपयांमध्ये प्रति किलो दराने तयार करू शकता. तयार केलेल्या बिस्किटांची विक्री ही किमान 120 रुपये प्रति किलो दराने करता येईल. या हिशोबाने तुम्ही दिवसाला 3000 ते 4500 रुपयांची कमाई करू शकता.