देशातील स्मार्टफोन्सच्या मागणीत घसरण झाल्याचे दिसून आले आहे. वर्ष 2022 मध्ये परवडणाऱ्या स्मार्टफोन्सच्या मागणीत 5% घसरण झाली. या आकडेवारीतून मंदी भारताच्या उंबरठ्यापर्यंत आल्याचे बोलले जाते.
काउंटरपॉईंट रिसर्च इंडियाच्या (Counterpoint Research India's Report) अहवालानुसार वर्ष 2022 मध्ये परवडणाऱ्या किंमतीतील (Budget Smartphones) 160 दशलक्ष युनिट्सची विक्री झाली. यात गेल्या वर्षाच्या तुलनेत 5% घसरण झाली आहे. मागील तीन वर्षात दुसऱ्यांदा फोन्सच्या मागणीमध्ये घसरण झाल्याचे दिसून आले. या संस्थेच्या अहवालानुसार वर्ष 2017 मध्ये स्मार्टफोन्सच्या विक्रीत 7% वाढ झाली होती. त्या वर्षात 158 दशलक्ष स्मार्टफोन्सची विक्री झाली होती. वर्ष 2018 मध्ये स्मार्टफोन्सच्या विक्रीत 4% घसरण झाली होती. वर्ष 2018 मध्ये 152 दशलक्ष स्मार्टफोन्सची विक्री झाली होती.
वर्ष 2021 मध्ये स्मार्टफोन्स बाजारात प्रचंड तेजी दिसून आली होती. 2021 मध्ये तब्बल 168 दशलक्ष स्मार्टफोन्सची विक्री झाली होती. वर्ष 2020 च्या तुलनेत विक्रीत 11% वाढ झाली होती. मात्र वर्ष 2022 मधील आकड्यांनी कंपन्यांची चिंता वाढवली आहे. वर्ष 2022 मध्ये स्मार्टफोन्स विक्रीत 5% घसरण झाली आहे.
स्मार्टफोन्सची मागणी कमी होण्यामागे मंदी हे मुख्य कारण आहे. त्याशिवाय पुरवठा साखळीतील कारणे, सुटे भाग आणि चिपची चणचण, सेमी कंडक्टर चिप्सच्या किंमतीत झालेली वाढ आणि यामुळे स्मार्टफोन्स उत्पादकांची भाववाढ अशीही कारणे असल्याचे जाणकारांनी सांगितले. याशिवाय जागतिक पातळीवरील मंदीचा प्रभाव, रशिया आणि युक्रेन युद्धाचा परिणाम देखील झाल्याचे बोलले जाते.
परवडणारे स्मार्टफोन्स हे 5000 ते 10000 रुपयांच्या दरम्यान उपलब्ध असतात. यात एंट्री लेव्हल स्मार्टफोन्सची किंमत 5000 रुपयांहून कमी असते. भारतात आजच्या घडीला 600 दशलक्ष स्मार्टफोन युजर्स आहेत. एंट्री लेव्हलमधील स्मार्टफोन्सच्या मागणीत घसरण झाल्याने मंदीचे चटके जाणवू लागल्याचे दिसून येत आहे.