उन्हाळ्याची सुट्टी म्हटले की, सर्वांचीच पर्वणी. कारण मुलांसह, पालकांनाही वर्षभराच्या कामकाजातून थोडा विरंगुळा हवाच असतो. पण या विरंगुळ्याचे रितसर नियोजन केले नाही तर उन्हाळ्याची संपूर्ण सुट्टी कशीतरी ढकलत काढावी लागेल. त्यामुळे आताच कामाला लागा. फेब्रुवारी महिन्यातील 15 संपले आहेत. तुमच्याकडे उन्हाळ्यातील सुट्ट्यांचे नियोजन करण्यासाठी फक्त दोन ते अडीच महिने शिल्लक आहेत.
मागील दोन वर्षांत कोरोनामुळे अनेक जणांना उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद घेता आला नव्हता. पण आता लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहे. काही जणांना या उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जायचे आहे. तर काही जणांनी खास फिरण्याचा बेत आखला आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत दक्षिण आणि उत्तर भारतात फिरण्यासाठी जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यातील उत्तर भारतात जाणाऱ्या पर्यंटकांसाठी सध्या तरी मध्य रेल्वेने स्पेशल 52 एक्सप्रेस सोडल्या आहेत. या स्पेशनल ट्रेनचे बुकिंग शुक्रवार दि. 17 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. तर या संधीचा फायदा घेत पर्यटकांनो लगेच तयारीला लागा.
Table of contents [Show]
मध्य रेल्वेच्या 26 उन्हाळी स्पेशल एक्सप्रेस ट्रेन
तुम्ही जर या उन्हाळ्याच्या सुट्टीत बाहेरगावी जाणार असाल किंवा गावी जाणार असाल तर, रेल्वेचे बुकिंग मिळतंय का ते पाहून घ्या. नाहीतर उगाच प्रायव्हेट गाडी किंवा ट्रॅव्हलची तिकिटे काढून जास्तीचा खर्च करावा लागेल. उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जायचे तुमचे पक्के झाले असेल तर लगेच उद्यापासून (दि. 17 फेब्रुवारी) रेल्वेच्या तिकिटांची बुकिंग करायला घ्या. कारण रेल्वेने विशेषत: मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस (Lokmanya Tilak Terminus-LTT) ते कानपूर या दरम्यान स्पेशल 26 साप्ताहिक एक्सप्रेस सोडल्या जाणार आहेत. त्याचबरोबर पुणे ते झाशी यादरम्यान 26 स्पेशल ट्रेन सोडणार आहेत. अशा एकूण 52 उन्हाळी स्पेशल एक्सप्रेस ट्रेन (Special Summer Express Train) मध्ये रेल्वेतर्फे चालवल्या जाणार आहेत.
उन्हाळी स्पेशल एक्सप्रेसचे आरक्षण कधी सुरू होणार?
मध्य रेल्वेने नियोजित केलेल्या 26 उन्हाळी स्पेशल एक्सप्रेस ट्रेनचे बुकिंग शुक्रवार (दि. 17 फेब्रुवारी) पासून सुरू होणार आहे. या सर्व स्पेशल ट्रेनचे बुकिंग www.irctc.co.in या वेबसाईटवरून करता येणार आहे.
उन्हाळी स्पेशल ट्रेन कधीपासून धावणार!
उन्हाळी विशेष एक्सप्रेस ट्रेन या लोकमान्य टिळक टर्मिनसहून 8 एप्रिल ते 1 जुलैपर्यंत या दरम्यान प्रत्येक शनिवारी सायंकाळी 5.15 वाजता सुटतील. ती दुसऱ्या दिवशी दुपारी 3.30 च्या दरम्यान कानपूरला पोहोचेल. पुण्यातून सुटणाऱ्या उन्हाळी स्पेशल एक्सप्रेस 6 एप्रिल ते 29 जूनपर्यंत प्रत्येक गुरूवारी दुपारी 3.15 वाजता सुटेल आणि ती दुसऱ्या दिवशी सकाळी 9.30 वाजता झाशी रेल्वेस्थानकावर पोहोचेल.
या ट्रेन कोणत्या स्थानकांवर थांबतील
उन्हाळी स्पेशल या दोन्ही ट्रेन दौंड, नगर, कोपरगांव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, नर्मदापुरम, भोपाळ, विदिशा, बिना आणि ललितपूर या स्थानकांवर थांबणार आहेत.