एअरटेल कंपनीने सर्वात बेसिक रिचार्ज प्लॅन बंद केला आहे. 99 रुपयांचा सर्वात कमी किंमतीचा रिचार्ज बंद करून त्याएवजी कंपनीने 155 रुपयांचा रिचार्ज आणला आहे. ओडिशा आणि हरयाणा विभागातून हा प्लॅन कंपनीने आधीच बंद केला होता. आता आणखी सात विभागातूनही कंपनीने 99 रुपयांचा स्वस्तातला प्लॅन बंद केला आहे.
एअरटेल एंट्री लेवल प्लन( Airtel entry level plan)
एअरटेलने मिनिमम एंट्री लेवल प्लॅन आता 155 रुपयांचा केला आहे. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची असून यात 1 GB इंटरनेट डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 300 SMS ग्राहकांना मिळतील. नव्या प्लॅनसाठी ग्राहकांना आता 57 रुपये जास्त द्यावे लागणार आहे. ग्राहकांना चांगली सुविधा देण्यासाठी आधीचा प्लॅन बंद करुन नवा प्लॅन आणल्याचे कंपनीने म्हटले आहे.
याआधी कंपनीकडून सर्वात कमी प्लॅन 99 रुपयांत दिला जात होता. त्यामध्ये 200 MB डेटा आणि 2.5 पैसे प्रति सेकंद पैसे आकारले जात होते. या प्लॅनची वैधता 28 दिवस होती. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात देशातील काही भागासाठी हा प्लॅन बंद करण्यात आला होता.
ग्राहकांना नव्या प्लॅनमधून अनलिमेटेड कॉलिंग विना अडथळा मिळेल, असे कंपनीने म्हटले आहे. एअरटेल कंपनीची स्पर्धा टेलिकॉम जायंट जिओशी असून एअरटेलने 30 शहरांमध्ये 5G लाँच केले आहे. त्या तुलनेत जिओने देशातली शंभरपेक्षा जास्त शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली आहे. सध्या टेलिकॉम मार्केटमधला सर्वात जास्त शेअर्स जिओ कंपनीकडे आहे.