Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SBI Fraud Alert: ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहा, एसबीआयच्या 'या' 10 गोष्टी फॉलो करा

SBI Fraud Alert: ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहा, एसबीआयच्या 'या' 10 गोष्टी फॉलो करा

SBI Fraud Alert: डिजिटल बँकिंगचा अलिकडील काळात वापर वाढला आहे. यासोबतच बँकिंग फसवणुकीच्या घटनांमध्येही प्रचंड वाढ झाली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या फसवणुकीच्या घटना रोजच समोर येत आहेत. याबाबत आता एसबीआयनं ग्राहकांना सावध केलं आहे.

फसवणुकीचे (Fraud) प्रकार वाढल्याचं सातत्यानं दिसून येत आहे. अलिकडेच काही गुन्हेगारांनी बँक अधिकारी बनून नागपुरातल्या एका व्यक्तीची सुमारे 10 लाख रुपयांची फसवणूक (Cheating) केली. अशी प्रकरणं वारंवार घडताना दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर एसबीआयनं (State Bank of India) आपल्या ग्राहकांना याबाबत सावध केलं आहे. फसवणुकीला बळी पडू नये, यासाठी काही उपाय सांगितले आहेत. एबीपीनं याचा आढावा घेतला आहे.

कशी झाली फसवणूक?

एसबीआयनं ग्राहकांना सावध केलं आहे. कारण सातत्यानं अशा घटना वाढल्या आहेत. त्यात एक घटना अलिकडेच घडली आहे. काही जणांनी बँक अधिकारी असल्याचं भासवून एका व्यक्तीला फोन केला. त्यांनी ग्राहकाला सांगितलं, की तो बँकिंगसंबंधीत होणाऱ्या फसवणुकीपासून संरक्षण करण्याचं काम करतो. बोलण्यात गुंतवून गुन्हेगारांनी पीडित व्यक्तीकडून डेबिट कार्ड आणि बँक खात्याचे डिटेल्स घेतले. त्यानंतर त्या गुन्हेगारांनी पीडित व्यक्तीच्या बँक खात्यातून 9.66 लाख रुपये काढून घेतले.

गुन्हेगारांकडून विविध शक्कल

अशा प्रकारे फसवणूक होण्याची ही काही पहिलीच घटना नाही. सामान्य लोकांना हेरून हे गुंड वेगवेगळ्या शक्कल लढवून त्यांचं बँक अकाउंट रिकामं करतात. कधी ते ग्राहकांना कशाचं ना कशाचं आमिष दाखवतात तर कधी त्यांच्या भीतीचा गैरफायदा उठवतात. आमिषांना बळी पडून अनेकांनी आपला ओटीपी शेअर केल्याच्याही अनेक केसेस समोर आल्याचं दिसतं. तर काही केसेसमध्ये लोकांनी स्वतःहून त्यांच्या बँकिंग डिटेल्सची माहिती दिली.

एसबीआयनं कसं केलं सावध?

देशातली सर्वात मोठी सार्वजनिक बँक एसबीआयनं ग्राहकांना सावध केलं आहे. यासोबतच एसबीआयनं बँकिंग फसवणुकीपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी काही उपायदेखील सांगितले आहेत. या ऑनलाइन फसवणुकीच्या जाळ्यापासून स्वतःला कसं सुरक्षित ठेवायचं, या 10 मुद्द्यांमधून समजून घेऊ...

  1. बँकेच्या वेबसाइटला थेट भेट द्या. इतर कोणत्याही वेबसाइट किंवा ई-मेलमधली लिंकवरून क्लिक करू नका.
  2. फ्रॉड किंवा क्लोन वेबसाइटची पडताळणी करण्यासाठी, डोमेन नेम आणि यूआरएल नीट पाहा.
  3. पासवर्ड किंवा पिन विचारणाऱ्या कोणत्याही ई-मेलला उत्तरं देऊ नका. यासंबंधी थेट बँकेला कळवा.
  4. बँक किंवा पोलीस तुम्हाला कधीही बँकिंग किंवा कार्डचे डिटेल्स विचारत नाहीत.
  5. सायबर कॅफे किंवा शेअर केलेल्या पीसीवरून तुमच्या अकाउंटचं लॉग इन करू नका.
  6. तुमचा पीसी आणि लॅपटॉप अपडेट ठेवा. यामुळे व्हायरस अटॅकची शक्यता कमी होईल.
  7. तुमच्या ऑपरेटिंग सिस्टमवर फाइल आणि प्रिंटिंग शेअर डिसेबल करा.
  8. तुम्ही पीसी वापरत नसाल त्यावेळी लॉग ऑफ करा.
  9. बँकिंगचे लॉगिन डिटेल्स ब्राउझरमध्ये सेव्ह करू नका.
  10. तुमचं बँकिंग खातं आणि ट्रान्झॅक्शन्स सतत चेक करत राहा.