ऑनलाईन फसवणूक करण्याचे रोज नवनवीन क्लुप्त्या सायबर चोर शोधताना दिसतायेत. कधी बँकेचे अधिकारी म्हणून, कधी पासपोर्ट ऑफिसचे अधिकारी म्हणून तर कधी विद्युत विभागाचे अधिकारी म्हणून सामान्य नागरिकांना चुना लावताना सायबर चोर दिसतात. आता तर थेट देशातील दिग्गज कुरिअर कंपन्यांच्या नावाखाली सामान्य नागरिकांची फसवणूक होत असल्याचे काही प्रकरणे समोर आली आहेत. चला तर जाणून घेऊया नेमके काय आहे हे प्रकरण.
आता आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीने देशातील बड्या कुरिअर कंपन्यांच्या नावाखाली लोकांची फसवणूक सुरू केली आहे. झिरोधाचे सहसंस्थापक नितीन कामथ (Nitin Kamath) यांनी या नव्या फसवणुकीच्या प्रकाराची माहिती त्यांच्या सोशल मिडीया खात्यांवरून दिली आहे. कुरियर कंपन्यांचे नावे सामान्य नागरिकांना कॉल केले जात असून त्यांना खोट्या गुन्ह्यांची भीती दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळले जात आहेत.
हे सायबर चोर फेडएक्स (FedEx), ब्लू डार्ट (Blue Dart) इत्यादी नामांकित कुरिअर कंपन्यांची ब्रँड व्हॅल्यू वापरून ग्राहकांना फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. झिरोधाचे सहसंस्थापक नितीन कामथ यांनी आपल्या एका सहकाऱ्यासोबत झालेल्या फसवणुकीबाबत ट्विटमध्ये माहिती दिली आहे. कामथ यांनी लिहिले की, "सध्या FedEx, Blue Dart आणि इतर कुरिअर कंपन्यांच्या नावाने मोठा घोटाळा होत आहे, तुम्हाला याची माहिती असणे आवश्यक आहे. एका व्यक्तीने माझ्या सहकाऱ्याला फोन करून सांगितले की, तो FedEx मधून बोलतो आहे. तसेच त्याचे एक पार्सल FedEx कसे आले असून पोलिसांनी त्यात ड्रग्ज असल्याकारणाने जप्त केले आहे."
There's a new scam in the name of FedEx, Blue Dart, and other courier companies that you need to be aware of ?
— Nithin Kamath (@Nithin0dha) June 23, 2023
A colleague got a call from a person claiming to be from FedEx saying that a parcel had been confiscated by the police because drugs were found in it. 1/4
नितीन कामथ यांनी पुढे असे लिहिले आहे की, त्यांच्या सहकाऱ्याने कुठल्याही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून कोणत्याही वस्तू मागवल्या नव्हत्या. तरीही त्याला घाबरवण्याचा प्रयत्न केला गेला. एका व्यक्तीने तो पोलीस असल्याचे सांगत व्हिडिओ कॉल केला आणि त्याचे बनावट ओळखपत्र देखील सहकाऱ्याला दाखवले आणि माझ्या सहकाऱ्याचे आधार कार्ड देखील दाखवले. त्यामुळे घाबरलेल्या माझ्या सहकाऱ्याची अवस्था बघून त्या ठगांनी पार्सल परत देण्यासाठी आणि ड्रग्ज बाळगल्याच्या आरोपातून सुटका करून घेण्यासाठी पैशांची मागणी केली. तसेच पैसे पाठवण्यासाठी बँक तपशील देखील शेअर केले. घाबरलेल्या माझ्या सहकाऱ्याने त्यांना पैसे ट्रान्सफर देखील केले.
अशाप्रकारे कुणाचीही फसवणूक होऊ नये म्हणून नितीन कामथ यांनी ही माहिती सार्वजनिकरीत्या जाहीर केली आहे.
स्कॅमरकडे आधारकार्ड आले कुठून?
या संपूर्ण प्रकरणात एक मुख्य प्रश्न निर्माण होतो की स्कॅमरकडे आधार कार्ड आले कुठून? गेल्या काही वर्षात आधार कार्डसंबंधी फसवणुकीच्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसते आहे. सध्या रहिवासी पुरावा म्हणून आपण सगळे आधार कार्डचा सर्रास वापर करत असतो. मात्र जिथे आवश्यक आहे अशाच ठिकाणी आधार कार्ड जमा करावेत. तसेच आधार कार्ड देताना ते कुठल्या कामासाठी दिले जात आहे ते देखील त्यावर नमूद केले पाहिजे. कुणाही अनोळखी दुकानदाराला, व्यक्तीला आधार कार्ड देणे टाळा.
कशी टाळाल फसवणूक?
सामान्य नागरिकांना कायद्याचे भय असते. आपल्या नावे कुठलाही गुन्हा दाखल होऊ नये असे त्यांना वाटते. त्यांच्या याच साधेपणाचा फायदा हे स्कॅमर घेताना दिसत आहेत. त्यामुळे तुम्हांला जर अशाप्रकारे कुणाचा कॉल किंवा मेसेज आला तर त्यांना थेट पोलीस स्टेशनमध्ये येण्यासाठी सांगा किंवा वकिलांमार्फत आम्ही तुमच्याशी बोलू आणि त्यासाठी नोटीस पाठवा असे सांगा. तुम्ही जर काहीच चुकीचे केले नसेल तर स्कॅमर देखील तुमचा हा पवित्रा बघून घाबरतील. कोणत्याही अनोळखी व्यक्तींशी आर्थिक व्यवहार करू नका. अशाप्रकारे तुमची फसवणूक करण्याचा प्रयत्न होत असेल तर थेट पोलीस स्टेशन गाठा.