गणेशोत्सव (Ganesh Festival) हा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय उत्सव समजला जातो. दीड ते दहा दिवसांपर्यंत हा उत्सव घरोघरी जेवढ्या भक्तिभावाने साजरा केला जातो, तेवढ्याच उत्साहाने सार्वजनिकरित्याही साजरा केला जातो. आगमन ते विसर्जन एक वेगळाच उत्साह गणेश भक्तांमध्ये पाहायला मिळतो. अनेक सार्वजिनक गणेशोत्सव मंडळे या काळात आकर्षक सजावटीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचेही कार्य करतात. याच उद्देशाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या सांस्कृतिक विभागाकडून यावर्षीही सर्वोत्कृष्ट गणेश उत्सव स्पर्धेचे (Ganesh Festival competition) आयोजन करण्यात आले आहे.
सर्वोत्कृष्ट गणेश उत्सव स्पर्धेचे स्वरुप-
यंदाच्या वर्षी 19 सप्टेंबर 2023 ला गणेशाचे आगमन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून सर्वोत्कृष्ट गणेश उत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी राज्य भरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सहभागी होऊ शकणार आहेत. यासाठी राज्य शासनाकडून तीन पारितोषिके देण्यात येणार आहेत. यामध्ये राज्यस्तरावर पहिल्या क्रमांकासाठी 5 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. तर द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी 2.5 आणि 1 लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे.
41 सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांचा गौरव
तसेच राज्यस्तरीय तीन प्रमुख विजेत्या गणेशोत्सव मंडळा व्यतिरिक्त राज्यभरातून एकूण 41 सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना प्रत्येकी 25 हजार रुपयांचे पारितोषिक आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर या स्पर्धेत अधिकाधिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याच्या सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी केले आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी-
राज्य सरकारच्या या सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राज्यभरातील गणेश मंडळांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी महाराष्ट्र कला अकादमीच्या mahotsav.plda@gmail.com या ई-मेल आयडीवर 5 सप्टेंबर 2023 पर्यंत आपली नोंदणी करायची आहे.
कशी होणार विजेत्यांची निवड?
राज्य शासनाच्या या गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मंडळांनी धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेली असावी तसेच पोलिसांकडून गणेशोत्सवाचा परवाना घेणे गरजेचे आहे. या स्पर्धेतील विजेत्यांची निवड करताना राज्य भरातील जिल्हा समित्यांकडून राज्य निवड समितीकडे उत्कृष्ट गणेशमंडळाची माहिती दिली जाईल. त्यातून राज्यस्तरीय उत्कृष्ट गणेश मंडळाच्या विजेत्यांची निवड केली जाणार आहे.
या गणेशोत्सव स्पर्धेसाठी मंडळांना देण्यात आलेले निकष पूर्ण करावे लागणार असून वेगवेगळ्या निकषांच्या पूर्ततेसाठी एकूण 150 गूण निश्चित करण्यात आले आहेत. या स्पर्धेत पर्यावरणपूरक गणेशोत्सव, सामाजिक प्रबोधन, समाजिक हिताचे उपक्रम, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक विकासा हातभार लावणारे कार्य, महिला सक्षमीकरण, गडकिल्ले संवर्धन, सेंद्रीय शेती विषयक प्रबोधन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव योगदान यासह अनेक निकषांच्या आधारावर मंडळांना गुण दिले जाणार आहेत.