Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Cyber Fraud: व्हिडिओ कॉल रेकॉर्डींगद्वारे आयटी इंजिनिअरला 1 कोटी 14 लाख रुपयांना लुटले

Cyber Crime

व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करून नंतर ब्लॅकमेल करण्याची प्रकरणे वाढत आहेत. बंगळुरुतील एका आयटी इंजिनिअरला 1 कोटी 14 लाख रुपयांना लुटण्यात आले. बदनामीच्या भीतीने अनेकजण पैसेही पाठवतात. नक्की हा काय प्रकार आहे ते वाचा.

Cyber Fraud: सायबर फसवणुकीचा दरदिवशी नवा प्रकार समोर येत आहे. त्यातील एक म्हणजे व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग. तुमच्या नकळत अश्लील व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करून तुम्हाला ब्लॅकमेल केले जाऊ शकते. बंगळुरुत एका आयटी इंजिनिअरला 1 कोटी 14 लाख रुपयांना अशाच पद्धतीने लुटण्यात आले. या प्रकरणी आता सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरू आहे. 

काय आहे प्रकरण?

बंगळुरुमधील के. आर पुरम येथील एक आयटी इंजिनिअर ब्रिटनमध्ये कामाला आहे. तो नुकताच एका प्रशिक्षणसाठी बंगळुरुमध्ये आला होता. दरम्यान, विवाहासाठी मॅट्रिमोनियल साइटवर नोंदणी केली होती. या पोर्टलवरुन त्याची एका महिलेसोबत त्याची ओळख झाली. काही दिवसांनी फोनवर बोलणे सुरू झाले. 

महिलेने या इंजिनिअरचा विश्वास संपादन केल्यानंतर घरगुती कारण सांगून पैसे मागण्यास सुरुवात केली. तसेच दोघांचा अश्लील व्हिडिओ कॉल नकळत रेकॉर्ड केला. नंतर हा व्हिडिओ दाखवून इंजिनिअरला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

नातेवाईक आणि सोशल मीडियावरुन व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी या महिलेने दिली. व्हिडिओ व्हायरल न करण्याच्या बदल्यात पैशांची मागणी केली. आयटी इंजिनिअरने महिलेला 1 कोटी 14 लाख रुपये चार बँक खात्यात ट्रान्सफर केले. मात्र, तरीही महिलेने पैशांची मागणी सुरू ठेवल्याने  पिडीत व्यक्तीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली.  

सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल

पोलिसांनी सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच ज्या खात्यावर पैसे पाठवले ती चार खाती गोठवण्यात आली आहेत. त्यातील 30 लाख रुपये खर्च करण्यात आली होते. तर 84 लाख रुपये खात्यात होते. पैसे हस्तांतरित करताना महिलेचे खरे नावही या व्यक्तीला समजले. त्या आधारे पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. 

सायबर फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी काय कराल?

व्हॉट्सअॅप, फेसबुक किंवा इतर सोशल मीडियावरुन आलेले अनोळखी कॉल उचलू नका.

कोणत्याही अज्ञात व्यक्तीच्या मेसेजला रिप्लाय करू नका. तसेच पाठवलेल्या लिंकवर क्लिक करू नका. 

तुमची वैयक्तिक संवेदनशील माहिती शेअर करू नका. 

अधिकृत संकेतस्थळ नसेल तर कोणताही माहिती देऊ नका. 

अनोळखी व्यक्तीचा कॉल कट करून लगेच क्रमांक ब्लॉक करा. 

वारंवार फोन, मेसेज आल्यास सायबर पोलिसांना माहिती द्या. कोणतीही माहिती लपवून ठेवू नका किंवा पैसे हस्तांतरित करू नका.

अनोळखी व्यक्तीसोबत व्हिडिओ कॉल अजिबात करू नका.