भारतातील सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडणारी वाहतूक व्यवस्था म्हणजे इंडियन रेल्वे. जगातील सर्वात मोठे रेल्वेचे जाळे भारतात आहे. रोज सरासरी 2 कोटी 30 लाख भारतीय रेल्वेने प्रवास करत असतात. इतकी मोठी प्रवासी संख्या असलेल्या इंडियन रेल्वेच्या प्रवाशांचो सोय व्हावी म्हणून भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंग ॲप इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) सुरु केले आहे. या ॲपद्वारे प्रवाशांना घरबसल्या त्यांची तिकिटे काढता येतात आणि रद्द देखील करता येतात.
या ॲपमुळे प्रवाशांच्या वेळेची बचत तर झालीच, सोबतच तिकिटांच्या काळ्या बाजाराला लगाम लागला. मात्र आता एक नवीनच समस्या भारतीय रेल्वेसमोर उभी ठाकली आहे.
IRCTC च्या अधिकृत ॲपद्वारे रेल्वेचे ऑनलाइन तिकीट काढण्याची पद्धत सामान्य नागरिकांमध्ये प्रचलित झाली असतानाच काही बनावट ॲपचे सध्या पेव फुटले आहे. तिकीट बुक करण्यासाठी दिलेल्या माहितीचा गैरवापर करून सायबर चोर ग्राहकांचे शोषण करत आहे.
या बनावट ॲपच्या माध्यमातून प्रवाशांची आर्थिक फसवणूक होत असल्याच्या तक्रारी भारतीय रेल्वेला प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची गंभीर दखल घेत इंडियन रेल्वेने त्यांच्या प्रवाशांना काही खास सूचना दिल्या आहेत.
IRCTC चा सल्ला
भारतीय रेल्वेचे तिकीट बुकिंग ॲप इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने प्रवाशांसाठी फसवणुकीचा इशारा जारी केला आहे. तिकीट बुक करताना IRCTC च्या केवळ अधिकृत ॲपचाच वापर करावा असे सांगण्यात आले आहे. तसेच प्रवाशांनी फक्त Google Play Store किंवा Apple App Store वरूनच IRCTC चे अधिकृत’ Rail Connect’ हे मोबाईल ॲप वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त कुठलेही ॲप वापरू नये आणि त्यावर आर्थिक व्यवहार करू नये असे सांगण्यात आले आहे.
Alert: It has been reported that a malicious and fake mobile app campaign is in circulation where some fraudsters are sending phishing links at a mass level and insisting users download fake ‘IRCTC Rail Connect’ mobile app to trick common citizens into fraudulent activities.…
— IRCTC (@IRCTCofficial) August 4, 2023
काय आहे धोका?
रेल्वे प्रवासासाठी ऑनलाइन तिकीट बुक करताना प्रवाशाला स्वतःची विस्तृत माहिती द्यावी लागते. यात वय, राहण्याचा पत्ता, इमेल तसेच ऑनलाइन पेमेंट करताना बँकेचे डीटेल्स वैगेरे माहिती द्यावी लागते. ही माहिती खरे तर संवेदनशील अशी आहे. ही माहिती सरकारी ॲपवर सुरक्षित असली तरी सायबर ठग मात्र याचा गैरफायदा घेतना दिसत आहेत.
बनावट ॲपच्या माध्यमातून ग्राहकांकडून पैसे उकळले जात आहेत परंतु त्याचसोबत ग्राहकांनी दिलेला बँकांचा तपशील वापरून सायबर चोर ग्राहकांचे बँक खाते देखील रिकामे करू शकतात. त्यामुळे अशा कुठल्याही बनावट ॲपवर आपली संवेदनशील माहिती देऊ नये असे भारतीय रेल्वेने म्हटले आहे.
तसेच तुमच्या मोबाईलवर कुठलेही ॲप डाऊनलोड करण्यासाठी कुठला मेसेज आला असेल आणि त्यात जर कुठली लिंक असेल तर ती उघडू नये आणि तुमच्या मोबाईलमध्ये इतर कुठलेही ॲप डाऊनलोड करू नये असा सल्ला देखील देण्यात आला आहे.