Nagpur Tajabad Dargah Organization Scam: उमरेड रोडवर असलेल्या प्रसिद्ध ताजाबाद दर्ग्याचे व्यवस्थापन बाबा ताजुद्दीन ट्रस्टद्वारे चालवले जाते. बाबा ताजुद्दीन ट्रस्टवर 1 जानेवारी 2011 ते 31 डिसेंबर 2016 या दरम्यान शेख हुसेन अब्दुल जब्बार हे अध्यक्ष म्हणून तर इक्बाल बेलजी हे सचिव म्हणून कार्यरत होते. या काळात ट्रस्टला भक्त आणि इतर स्त्रोतांकडून मिळालेल्या कोट्यवधी रुपयांपैकी हुसेन यांनी 1 कोटी 48 लाख 379 रुपये आणि वेलजी यांनी 11 लाख 52 हजार 207 रुपये वैयक्तिक बँक खात्यात वळते केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. घोटाळा करणाऱ्या दोघांनीही आपल्या खात्यात रक्कम जमा करण्यापूर्वी ट्रस्टची कार्यकारी समिती किंवा धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे या घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.
अनेकदा धार्मिक स्थळी किंवा धार्मिक स्थळाशी संबंधित ट्रस्टचे घोटाळे तेव्हाच होतात, जेव्हा दानकर्त्याने दिलेल्या रकमेचा हिशोब लेखी स्वरुपात नसतो किंवा त्या दानाची लेखी स्वरुपात नोंद ठेवली जात नाही. त्याचप्रमाणे दानकर्त्याला त्याने दिलेल्या दानाच्या रकमेची विश्वासार्हता म्हणून पावती दिली जात नाही. तेव्हा कुठल्याही धार्मिक संस्थेला देणगी देण्यापूर्वी खालीलप्रमाणे महत्वाचे मुद्दे तपासा.
Table of contents [Show]
त्या धार्मिक संस्थेचा इतिहास तपासा
तुम्ही एखाद्या धार्मिक संस्थेत देणगी देण्याचा विचार करीत असाल तर, त्या संस्थेचे संपूर्ण नाव, त्या संस्थेबाबत केल्या गेलेल्या तक्रारी, पूर्व घोटाळे, तेथे पदावर असलेल्या व्यक्ती कोण? तिथे दान केलेला पैसा कुठे दिला जातो? इत्यादी गोष्टी तपासून दान करा.
संबंधित धार्मिक संस्थेची वेबसाईट चेक करा
तुम्ही ज्या संस्थेला किंवा ट्रस्टला देणगी देता किंवा आर्थिक मदत करता, तेव्हा ती संस्था देणग्यांचा वापर कसा करतात. त्याचा तपशील लोकांसमोर मांडते का? याची वेळेवेळी माहिती घेत जा. त्याचा तपास करा. संस्था वेबसाईटवर सर्व माहिती टाकते का? वर्षाचा लेखाजोखा वेबसाईटवर प्रसिद्ध केला जातो का? याची माहिती मिळत नसेल तर असा संस्था किंवा ट्रस्टपासून लांब राहा. त्यांना आर्थिक मदत करू नका. उलट अशा संस्था/ट्रस्टची तक्रार करा.
ती संस्था नोंदणीकृत आहे का?
काही राज्यांमध्ये धर्मादाय संस्थांनी राज्य नियामकाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. तेव्हा तुम्ही दान करु इच्छिणाऱ्या संस्थेची नोंदणी राज्य नियामक आयोगाकडे केलेली आहे की नाही, हे तपासा. तसेच ट्रस्टचे अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती धर्मादाय आयुक्त आणि न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार केली जाते. तेव्हा खरोखरं तेथील पदाधिकाऱ्यांची नोंदणी यानुसार केली गेली आहे का? ते एकदा तपासा.
तुम्ही देणगी देण्याचे स्वरुप काय आहे?
जर कुणी तुम्हाला क्यु-आर कोड स्कॅन करुन देणगी देण्यास सांगत असेल, तर तसे करु नका. सगळ्या गोष्टींची खात्री करुनच देणगी द्या. धार्मिक संस्थांमध्ये नेहमी रोख रक्कम देऊन त्याची रीतसर पावती घेणे किंवा चेक द्वारे देणगी देणे हाच सुरक्षित मार्ग आहे. तसेच ऑनलाईन देणगी देण्याच्या भानगडीतही न पडलेलेच बरे.
क्रॉस चेकिंग करा
तुम्ही देणगी दिल्यानंतर ती देणगी योग्य खात्यामध्येच जमा झाली की नाही? हे बँक खाते स्टेटमेंट किंवा क्रेडिट कार्ड स्टेटमेंट द्वारे तुम्ही तपासू शकता. तुम्ही दिलेल्या देणग्यांची नोंद ठेवा. देणगी देण्यास घाई करु नका.