Banking Fraud: देशातील बँक फसवणुकीच्या घटनांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी घट झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) अहवालातून ही बाब समोर आली आहे. आरबीआयच्या या अहवालानुसार, बँकिंग क्षेत्रात 100 कोटी रुपयांहून अधिक फसवणुकीच्या घटनांमध्ये घट झाली आहे. 2021-22 मध्ये अशा प्रकरणांमध्ये अडकलेली रक्कम 41,000 कोटी रुपये होती, जी मागील आर्थिक वर्षात 1.05 लाख कोटी रुपये होती.
2021-22 मध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये घट झाली आहे. 2020-21 मध्ये खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील फसवणुकीची 265 प्रकरणे निदर्शनास आली होती. त्यात घट होऊन 2021-22 मध्ये ही संख्या 118 पर्यंत आली आहे. सार्वजनिक बँकांबद्दल सांगायचे झाले तर, 100 कोटींहून अधिक रकमेच्या घोटाळ्याच्या प्रकरणांची संख्या 167 वरून 80 वर आली आहे. तर खाजगी बँकांमधील प्रकरणे 98 वरून 38 वर आली आहेत. सार्वजनिक बँकांच्या फसवणूक (Bank Fraud) प्रकरणांमध्ये गुंतलेली रक्कम 2020-21 मध्ये 65,900 कोटी रुपयांवरून 28,000 कोटी रुपयांवर आली. तर खासगी क्षेत्रातील बँकांमधील ही रक्कम 39,900 कोटी रुपयांवरून 13,000 कोटी रुपयांवर आली.
SBI मध्ये सर्वात मोठी फसवणूक
या वर्षाच्या सुरुवातीला, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये 22,842 कोटी रुपयांची सर्वात मोठी फसवणूक झाली होती. एबीजी शिपयार्ड (ABG Shipyard) कंपनी आणि त्यांच्या भागीदारांनी ही फसवणूक केली होती. ही फसवणूक नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेसोबत केलेल्या 14,000 कोटी रुपयांच्या फसवणुकीपेक्षा जास्त आहे.
दरम्यान, गेल्या महिन्यात सीबीआयने दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे (DHFL) माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक धीरज वाधवान आणि इतरांविरोधात 34,615 कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.