तंत्रज्ञानाच्या बदलांमुळे आर्थिक व्यवहार अतिशय सुलभ आणि गतिमान झाले आहेत. मोबाईल बँकिंगमुळे डिजिटल पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. WhatsApp Banking हा देखील या सुविधेतील एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म आहे. NPCI (नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) सोबत भागीदारी करून 2020 मध्ये भारतात WhatsApp वर बँकिंग सेवा सुरू करण्यात आली आहे. आता बँक ऑफ महाराष्ट्रने (Bank Of Maharashtra) देखील त्यांच्या ग्राहकासांठी ही सेवा सुरु करून दिली आहे.
व्हॉट्सअॅप बँकिंगचा उपयोग काय?
व्हॉट्सअॅप बँकिंगच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्या मेसेंजरमध्ये बँकेच्या नवीन उत्पादनांच्या सूचना, बँकेकडून थेट संदेश मिळू शकतात. तसेच ग्राहकांना त्यांच्या समस्यांची उत्तरे बँकेला थेट संदेश पाठवून विचारता येणार आहे. तसेच बँक खातेदार संबंधित बँकेतील मुदत ठेवी, पूर्वमंजूर कर्जे, क्रेडिट कार्ड, थकबाकी रक्कम आणि रिवॉर्ड पॉइंट्स इत्यादीबाबत माहिती प्राप्त करू शकणार आहे. याबरोबरच ग्राहकाला पैशांचे हस्तांतरण आणि बिलांचा भरणादेखील करण्याची अनुमती मिळते.
बँक ऑफ महाराष्ट्रचीही व्हॉट्सअॅप बँकिंग सुविधा
बँक ऑफ महाराष्ट्रने देखील आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी अतिरिक्त सेवा वितरण चॅनल म्हणून “WhatsApp बँकिंग” सेवा सुरू केली आहे. बँकेचे बिगर-खातेदार देखील या सेवेचा लाभ घेऊ शकतात. या सुविधेचा वापर करण्यासाठी बँकेच्या खातेदारांना बँक ऑफ महाराष्ट्रचा व्हॉट्सअॅप क्रमांक 70660 36640 सेव्ह करावा लागणार आहे. त्यानतंर बँकेच्या व्हॉट्सअॅप खात्यावर संवाद सुरू करण्यासाठी “HI” असा संदेश पाठवावा. त्यानंतर बॉटच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद सुरू होईल.
Whatsapp बँकिंगच्या मदतीने बँक ऑफ महाराष्ट्र आपल्या ग्राहकांना अनेक सेवा पुरवू शकते, जसे की खात्यातील शिल्लक (बॅलन्स) ची चौकशी, मिनी-स्टेटमेंट, चेक बुक विनंती, चेकच्या सद्यस्थितीची चौकशी, बँकेचे एटीएम आणि शाखा शोधणे, काही सेवा सुरू करणे, किंवा रद्द करणे, या शिवाय बँकेबरोबर संपर्क साधणे इत्यादी सेवांचा यात समावेश आहे.
Whatsapp Banking ची ठळक वैशिष्ट्ये
- बँकिंग सेवा कधीही कुठेही 24X7
- ग्राहकांना मोफत सेवा
- एंड टू एंड एन्क्रिप्शनसह सुरक्षित सेवा
- ग्राहक थेट बँकेकडून अलर्ट, संदेश, सूचना, ऑफर, इत्यादी प्राप्त करू शकतात
- सेवांची निवड करण्याची, किंवा निवड रद्द करण्याची सोपी यंत्रणा
- इमोजी, स्टिकर्स, वीडियो, फोटो, पीडीएफ, इ. सारख्या रिच मीडिया च्या मदतीने संभाषण करण्याची सुविधा
बँक ऑफ महाराष्ट्रने ऑफर केलेल्या सेवा
- तुमच्या खात्यातील शिल्लक जाणून घ्या
- ग्राहक आयडी जाणून घ्या
- मिनी स्टेटमेंट मिळवा
- जवळच्या बँकेच्या एटीएम किंवा शाखेची माहिती मिळवा.
- नवीन चेकबुकची विनंती
- चेकबुकची सद्य स्थिती तपासा
- सेवांची निवड करणे, किंवा निवड रद्द करणे
- बँकेबरोबर संपर्क साधणे
बँकेचे खातेदार नसलेल्या ग्राहकांसाठीच्या सेवा
- बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये खाते उघडू शकतात
- जवळच्या बँकेच्या एटीएम किंवा शाखेची माहिती मिळवू शकतात