आशियातील विकसित देशांपैकी एक असलेल्या जपानमध्ये महागाईचा भडका उडाला आहे. मात्र महागाई रोखण्याबाबत व्याजदर वाढवण्याऐवजी तेथील केंद्रीय बँक असलेल्या बँक ऑफ जपानने सावध भूमिका घेतली. आज शुक्रवारी 28 जुलै 2023 रोजी बँक ऑफ जपानने व्याजदर 0.1% वर कायम ठेवला. 10 वर्ष मुदतीच्या सरकारी रोख्यांसाठी बँकेचा व्याजदर 0% कायम आहे.
बँक ऑफ जपानची दोन दिवसीय पतधोरण बैठक आज संपली. बँकेने शॉर्ट टर्म इंटरेस्ट रेट 0.1% कायम ठेवला आहे. सरकारी रोख्यांचा 10 वर्ष कालावधीचा व्याजदर 0% स्थिर आहे. जपानी चलन येनमधील तेजीने रोख्यांचा परतावा (बॉंड यिल्ड) 4.6% पर्यंत वाढला होता. मागील 9 वर्षांतील हा उच्चांकी परतावा होता.
महागाई रोखण्यासाठी मागील वर्षभरात भारतासह जगभरातील सेंट्रल बँकांनी व्याजदर वाढवले होते. रिझर्व्ह बँकेने व्याजदरात वाढ केल्याने सर्वच प्रकारची कर्जे महागली होती. अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह, युरोपीयन सेंट्रल बँक यांनीही मुख्य व्याजदर वाढवले होते.
जपानच्या केंद्रीय बँकेने मात्र आता व्याजदर वाढीला विराम दिला आहे. जपानी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी बँकेकडून आतापर्यंत भक्कम आर्थिक पॅकेज देण्यात आले आहे. त्यामुळे दरवाढीचा पर्याय तूर्त जैसे थेच ठेवण्याचे धोरण बँकेने स्वीकारल्याचे गव्हर्नर काझुओ यूडा यांनी सांगितले.
महागाईचे उद्दिष्ट 2% ठेवण्यात आल्याचे उदा यांनी सांगितल. ते म्हणाले की बँकेने आता पतधोरण पूर्वपदावर आणण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. जोखीम कमी करण्यासाठी बँकेने ही भूमिका घेतल्याचे यूडा यांनी सांगितले.
दरम्यान बँक ऑफ जपानने व्याजदर जैसे थेच ठेवल्याचे पडसाद जगभरात उमटतील. विशेषत: मनी मार्केट, शेअर मार्केटवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.आजतागायत येनचे मूल्य इतर चलनांच्या तुलनेत स्वस्त असल्याने त्यातून विविध मालमत्तांमध्ये आणि भांडवली बाजारांमध्ये जपानमधून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात येत होती.