Bank employees on strike at the end of the month: अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2023 रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मात्र त्याआधीच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कर्मचारी सलग दोन दिवस संपावर जाणार आहेत. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनची (UFBU: United Forum of Bank Unions) बैठक मुंबईत पार पडली, ज्यामध्ये बँक संघटनांनी दोन दिवस संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
या महिन्याच्या अखेरीस सलग चार दिवस बँक शाखांमधील कामकाजावर परिणाम होणार आहे. 28 आणि 29 जानेवारीला शनिवार - रविवार आहे, तर 30 आणि 31 जानेवारीला बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत. अनेक बँकांची युनियनची संघटना असलेल्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (UFBU) गुरुवारी, 12 जानेवारी रोजी हा निर्णय घेतला आहे. युनियनने आपल्या विविध मागण्यांसाठी 30 जानेवारीपासून दोन दिवसांच्या संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे (AIBEA: ALL INDIA BANK EMPLOYEES ASSOCIATION) सरचिटणीस सी.एच. व्यंकटचलम यांनी ही माहिती माध्यमांना दिली.
दोन दिवस संपावर जाण्याचा निर्णय (Decision to go on strike for two days)
अनेकदा पत्रे देऊनही इंडियन बँक्स असोसिएशनकडून (IBA: Indian Bank's Association) आमच्या मागण्यांना कोणताही प्रतिसाद मिळत नाही. आमचे अर्ज, पत्र यांच्याकडे कानाडोळा करत आहे. त्यामुळे आम्ही आंदोलन सुरू करण्याचा आणि 30 आणि 31 जानेवारीला संप पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे व्यंकटचलम म्हणाले.
बँकेचे व्यवहार पाच दिवस असावेत. पेन्शनचे अद्ययावतीकरण व्हावे, बँकेतील इतर प्रलंबित समस्यांवर तोडगा काढावा, नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) रद्द करण्यात यावी, वेतन सुधारणेच्या सनद मागण्यांवर तात्काळ वाटाघाटी सुरू करून निर्णय घेण्यात यावा आणि सर्व संवर्गांमध्ये पुरेशी भरती करण्या यावी अशा आमच्या मागण्या आहेत, त्या पूर्ण व्हाव्यात यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे.
बँक कर्मचारी दोन दिवस संपावर गेल्याने सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. संपाचा दिवस सोमवार आणि मंगळवार असून सोमवारपूर्वी रविवारी बँका बंद राहतील. म्हणजेच एक प्रकारे पाहिले तर सलग चार दिवस बँकांच्या कामकाजावर परिणाम होणार आहे. या काळात एटीएममधील रोकड संपल्याने चेक क्लिअर करताना अडचणी येऊ शकतात. जानेवारीचा शेवटचा आठवडा या कालावधीत पगार आणि पेन्शन जारी होण्यास विलंब होऊ शकतो.