Bakri Eid 2022 : कोरोनाच्या साथीनंतर यावर्षी लोकांमध्ये सण आणि उत्सव साजरा करण्याची जणू काही पैजच लागली आहे. उद्या (दि. 10 जुलै) साजऱ्या होणाऱ्या बकरी-ईद निमित्त देवनारच्या पशुवधगृहात मोठी लगबग सुरू आहे. देशभरातील बकरा व्यापारी मुंबईच्या या बाजारात लाखो रूपयांचे बकरे विक्रीसाठी आणतात. यावर्षी मुंबईत 7 लाख रूपये किमतीच्या बकऱ्याची आणि पुण्यात 7 फूट लांबीच्या बकऱ्याची सोशल मिडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
बकरी ईदनिमित्त देवनार पशुवधगृहात देशभरातून सुमारे 1 लाख बोकडांची आवक आली आहे. देवनारच्या या बाजारात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांतील व्यापारी वेगवेगळ्या जातीचे बोकड विक्रीसाठी घेऊन येतात. या बोकडांची किंमत अगदी 5 हजार रूपयापासून लाखो रूपये असते. बोकडाची उंची, वजन, त्याची विशिष्ट जात आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे काही बोकडांच्या अंगावर चंद्राची कोर किंवा उर्दू लिपीमधील काही अक्षरे उमटली असल्यास त्या बोकडांनी सर्वाधिक मागणी असते. त्याची किंमत लिलावानुसार ठरते. त्यासाठी लाखो रूपयांची बोली लावली जाते. 1 महिना ते 15 दिवसांच्या कालवधीत या बाजारात कोट्यवधी रूपयांची उलाढाल होते.
मुंबईत 7 लाखांचा तर पुण्यात 7 फुटांचा बोकड
गुजरात राज्यामधून बोकड विक्रीसाठी मुंबईतील देवनार बाजारात आलेल्या शराफतअली गोरी हा व्यापाऱ्याने त्याच्या बोकडाची किंमत 7 लाख रूपये लावली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार या बकऱ्याच्या अंगावर उर्दू लिपीतील अल्लाह शब्द जन्मत: उमटले आहेत. म्हणून त्याची 7 लाख रुपये किंमत लावली आहे. तर राजस्थानमधील कालपी येथून एका व्यापाऱ्याने रॅम्बो नावाचा बकरा पुण्यातील लक्ष्मी बाजारात विक्रीसाठी आणला आहे. या रॅम्बोची उंची 7 फूट असल्याचे सांगितले जात असून त्याची किंमत 60 हजार रुपये एवढी लावली आहे.
बोकडांसाठी बोरकोड नोंदणी
गेल्या काही वर्षांचा अनुभव लक्षात घेऊन महापालिकेने बोकडांची चोरी होऊ नये आणि पालिकेचाही महसुल बुडू नये. यासाठी विक्रीसाठी आणल्या गेलेल्या बोकडांची बोरकोडने नोंदणी केली जात आहे. यामुळे प्रत्येक बोकडाच्या विक्रीचा हिशोब पालिकेकडे राहणार आहे. देवनाश पशुवधगृहाकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारपर्यंत देवनार बाजारात 86,363 बोकडांची आवक झाली होती आणि त्यातील 36,605 बोकडांची विक्री झाली होती.