शेअर मार्केटमध्ये आज सोमवारी 5 डिसेंबर 2022 रोजी बजाज हिंदुस्थान शुगर या शेअरला (Bajaj Hindusthan Sugar Share Hit Upper Circuit) अप्पर सर्किट लागले. आज तो 20% ने वाढला. सलग दोन सत्रात हा शेअर तब्बल 43% वाढला असून अचानक तेजीत आल्याने गुंतवणूकदारांमध्ये तो ‘हॉट स्टॉक’ बनला आहे. कंपनीने कर्जाची संपूर्ण थकबाकी फेडल्याने शेअरमध्ये तेजी दिसून आल्याचे बोलले जाते.
आज सोमवारी बजाज हिंदुस्थानचा शेअर 13.50 रुपयांवर खुला झाला आणि क्षणात त्याला अप्पर सर्किट लागले. तो 20% वाढीसह 16.22 रुपयांपर्यंत गेला. अप्पर सर्किटमुळे हा शेअर खरेदीसाठी इच्छुक असलेल्या गुंतवणूकदारांचा हिरमोड झाला. विशेष म्हणजे सलग दुसऱ्या सत्रात या शेअरसाठी केवळ खरेदीदारच आहेत.अचानक बजाज हिंदुस्थानच्या शेअरसाठी प्रचंड मागणी वाढली असून डेली व्हॉल्यूम देखील वाढला आहे.
यापूर्वी शुक्रवारच्या सत्रात देखील बजाज हिंदुस्थानच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली होती. 2 डिसेंबर 2022 रोजी बजाज हिंदुस्थान शुगरचा शेअर 11.12 रुपयांवर खुला झाला होता. मा त्यानंतर तो झपाट्याने वाढला. इंट्रा डे मध्ये त्याने 13.52 वर झेप घेतली. दिवसअखेर तो 20% तेजीसह अप्पर सर्किटमध्ये स्थिरावला होता. शुक्रवारी एनएसईवर 101.41 लाख शेअर्सचे ट्रेडिंग झाले. कर्ज थकबाकी फेडल्याची माहिती कंपनीने शेअर बाजारांना दिल्यानंतर बजाज हिंदुस्थानच्या शेअरमध्ये प्रचंड वाढ झाली होतीय.कंपनीची आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत आल्यामुळेच शेअरमध्ये तेजी निर्माण झाल्याचे बोलले जाते.
मागील सहा महिन्यांचा विचार केला तर बजाज हिंदुस्थान शुगरचा शेअर 20% नी घसरला होता. वर्षभरात तो 12% घसरला होता.मात्र शुक्रवारच्या सत्रात त्याने 20% झेप घेतली.एकाच दिवसात शेअरमधील ट्रेडिंग व्हॉल्यूम वाढल्याची 18 ऑगस्ट 2022 नंतरची ही पहिलीच वेळ आहे. 52 आठवड्यातील कामगिरीचा आढावा घेतला तर हा शेअर 17 ऑगस्ट 2022 रोजी 8.37 रुपयांच्या नीचांकी पातळीवर होता. 22 एप्रिल 2022 रोजी त्याने 22.58 रुपयांचा वर्षभरातील उच्चांकी स्तर गाठला होता.
शेअर तेजीमागील 'ही' आहेत कारणे
- बजाज हिंदुस्थान शुगर्सने सप्टेंबर 2022 पर्यंतची कर्जाची सर्व थकबाकीची परत फेड केल्याची माहिती शेअर बाजाराला कळवली आहे.
- यात टर्म लोनचा हप्ता (सप्टेंबर 2022), टर्म लोनचे व्याज (नोव्हेंबर 2022) आणि ऑप्शनली कन्व्हर्टीबल डिबेंचर्स कुपनवरील देय रक्कम (आर्थिक वर्ष 2022) कर्जदारांना परत केली असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
- कंपनीला कर्ज दिलेल्या कोणत्याही कर्जदाराची आता थकबाकी नाही.
- कर्ज फेड झाल्याने कंपनीची आर्थिक स्थिती सुधारल्याचे बोलले जाते.
- यामुळे गुंतवणूकदारांनी शेअर खरेदीसाठी गर्दी केली.
प्रचंड तोट्यात आहे बजाज हिंदुस्थान शुगर
बजाज हिंदुस्थान शुगर ही उत्तर भारतातील आघाडीची साखर उत्पादक कंपनी आहे. साखर, अल्कोहोल, इथेनॉल आणि ऊर्जा निर्मितीमध्ये कंपनीचा विस्तार आहे. बजाज हिंदुस्थान शुगरचे 14 साखर कारखाने असून त्यांची गाळप क्षमता 136000 टन प्रती दिन इतकी आहे. याशिवाय 6 मद्य उत्पादनाचे कारखाने असून 14 ऊर्जा निर्मिती प्रकल्प आहे. यातून 449 मेगावॅट ऊर्जेची निर्मिती केली जाते. कंपनीला चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत 162.37 कोटींचा तोटा झाला आहे. त्याशिवाय एकूण विक्री देखील 1.5% ने कमी झाली असून त्यातून 1323.40 कोटींचा महसूल मिळाला. गेल्या वर्षी दुसऱ्या तिमाहीत कंपनीला 113.01 कोटींचा तोटा झाला होता. यंदा तोट्यात आणखी वाढ झाली.
(डिसक्लेमर: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. महामनी शेअर्स खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)