एखादा आजार जडला असेल तर विमा कंपन्यांकडून सहसा त्या व्यक्तीला विमा पॉलिसी दिली जात नाही. मात्र खासगी क्षेत्रातील बजाज अलायन्झने इतर विमा कंपनीच्या तुलनेत एक पाऊल पुढे टाकले आहे. बजाज अलायन्झने मधुमेह असणाऱ्यांना देखील टर्म इन्शुरन्सचे विमा कवच पुरवण्याची घोषणा केली आहे.
बजाज अलायन्झकडून डायबेटिक टर्म प्लॅन (Diabetic Term Plan Sub 8 HbA1C) ही विमा पॉलिसी नुकताच लॉंच करण्यात आली. ज्यांची डायबेटिक लेव्हल 8 पर्यंत आहे अशांना हा टर्म प्लॅन इश्यू केला जाईल, असे कंपनीने म्हटले आहे. याशिवाय वर्षभर रक्तातील साखरेचे प्रमाण मर्यादित ठेवणाऱ्या मधुमेहींना या पॉलिसीचे नुतनीकरण करताना प्रीमियममध्ये 10% सवलत दिली जाणार आहे.
आरोग्य विम्याबाबत विमा कंपन्या सावधगिरी बाळगतात. ज्यांची मेडिकल हिस्ट्री खराब आहे किंवा आजार होऊन गेला असेल अशांना नव्या विमा पॉलिसी इश्यू करताना अटी आणि शर्थीं लागू केल्या जातात. अनेकदा यामध्ये प्रीमियम जास्त असतो. त्याशिवाय वेटिंग पिरिए़ड देखील असतो.
भारतात मधुमेहींची संख्या झपाट्याने वाढत आहे. डायबेटिक झाल्यास व्यक्तीला दररोज औषधे घ्यावी लागतात. दरमहा वैद्यकीय तपासणी करावी लागते. डायबेटिक झालेल्या व्यक्तीची जगण्याची जोखीम देखील वाढते. त्यामुळे मधुमेहींना विमा सुरक्षा देणाऱ्या उत्पादनांची भारतात अजून वानवा आहे.बहुतांश मधुमेही विमा सुरक्षेपासून वंचित आहेत.
बजाज अलायन्झ या खासगी विमा कंपनीने डायबेटिक व्यक्तींसाठी टर्म इन्शुरन्सची घोषणा केली आहे. डायबेटिक टर्म प्लॅन (Diabetic Term Plan Sub 8 HbA1C) हा नॉन पार्टिसिपेटिंग नॉन लिंक्ड प्युअर प्रोटेक्शन कव्हर आहे. जे फक्त डायबेटिकमुळे निर्माण झालेल्या जोखिमेला विमा सुरक्षा पुरवते. मधुमेहाने पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना विमा भरपाई दिली जाते. हा टर्म इन्शुरन्स असल्याने विमाधारकाने विमा कालावधी पूर्ण केल्यास त्यावर कोणताही लाभ दिला जात नाही.
डायबेटिक टर्म प्लॅन (Diabetic Term Plan Sub 8 HbA1C) हा खासकरुन टाईप 2 चा डायबेटिक किंवा डायबेटिकचे निदान न झालेल्या व्यक्तींसाठी विमा पर्याय आहे, असे कंपनीने म्हटले आहे. प्री-डायबेटिक म्हणजे ज्यांचे HbA1C चे प्रमाण 8 पर्यंत असेल तर त्यांना ही विमा पॉलिसी खरेदी करता येईल.
मागील तीन महिन्यातील रक्तातील साखरेचे प्रमाण तपासून त्यानुसार कंपनीकडून टर्म प्लॅन इश्यू केला जातो. डायबेटिक व्यक्तींना आयुष्य जगताना चिंता कमी करण्याचा प्रयत्न म्हणून डायबेटिक टर्म प्लॅन सुरु केला असल्याचे बजाज अलायन्झचे व्यवस्थापकीय संचालक तरुण चुग यांनी सांगितले. जे पॉलिसीधारक वर्षभर रक्तातील साखरेचे प्रमाण मर्यादित ठेवतील त्यांना पॉलिसीचे नुतनीकरण करताना 10% सवलत देण्यात येईल, असे चुग यांनी सांगितले.
भारतात मधुमेहींचे प्रमाण किती?
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतात जवळपास 7 कोटी 70 लाख प्रौढांना मधुमेहाने ग्रासले आहे. मधुमेहाचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. राहणीमान बदलत असल्याने आणखी 2.5 कोटी भारतीयांना पुढील काही वर्षात विविध रोगांचा सामाना करावा लागेल, अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे.