गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय चित्रपटांमध्ये वेगवेगळे आशय पाहायला मिळत आहेत. बॉलिवूडमध्ये फार कमी कलाकार आहेत, जे वेगळ्या आशयासोबत चित्रपटांमध्ये काम करतात. या कलाकारांपैकी एक म्हणजे आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana). गेल्या 4 ते 5 वर्षात आयुष्मान खुरानाने अनेक वेगवेगळ्या आशयाचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणले होते. हे चित्रपट बिग बजेट प्रोजेक्ट नसून कमी बजेटमध्ये तयार करण्यात आले होते. या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करून बॉक्स ऑफिसवर कोट्यावधींची कमाई केली आहे.
या चित्रपटांमध्ये विकी डोनर,बाला, बधाई, शुभ मंगल सावधान आणि ड्रीम गर्ल यासारख्या चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे. लवकरच आयुष्मानचा 'ड्रीम गर्ल टू' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट 25 ऑगस्ट 2023 रोजी प्रदर्शित होणार असून नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये चर्चा होताना पाहायला मिळत आहे. यानिमित्ताने आयुष्मानच्या आत्तापर्यंतच्या वेगवेगळ्या आशयाच्या चित्रपटांच्या बजेट आणि कमाई बद्दल जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
शुभमंगल सावधान (Shubmangal Saavdhan)
आयुष्मान खुरानाचा शुभमंगल सावधान हा चित्रपट 2017 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाचे दोन भाग आत्तापर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. यातील पहिल्या भागाचे दिग्दर्शन आर. एस. प्रसन्न यांनी केले आहे. याचे बजेट 25 कोटी रुपयांचे असून 64.54 कोटी रुपयांची कमाई या चित्रपटाने केली आहे.
तर 'शुभमंगल ज्यादा सावधान' हा चित्रपट 2020 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन हितेश केवल्या यांनी केले होते. या चित्रपटाचे बजेट 30 कोटी रुपयांचे असून 86 कोटी रुपयांचा गल्ला जमवण्यात या चित्रपटाला यश मिळाले. या चित्रपटात आयुष्मानने गे- व्यक्तीची भूमिका साकारली होती.
विकी डोनर (Vicky Donor)
Shoojit Sircar यांनी दिग्दर्शित केलेला विकी डोनर हा चित्रपट 2012 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाचे बजेट 15 कोटी रुपयांचे होते. या चित्रपटाने 68.32 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. यामध्ये आयुष्मानने स्पर्म डोनरची भूमिका साकारली होती.
बधाई (Badhai)
दिग्दर्शक अमित शर्मा यांचा 2018 साली 'बधाई' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटामध्ये आयुष्मान खुरानाने मुख्य भूमिकेत काम केले होते. या चित्रपटाचे बजेट 29 कोटी रुपयांचे असून 221 कोटी रुपयांचा गल्ला जमवण्यात या चित्रपटाला यश मिळाले. 2018 मधील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये बधाई या चित्रपटाचा समावेश करण्यात आला आहे.
बाला (Bala)
पुरुषांना टक्कल पडणे यासारख्या समस्येला थोडे सामाजिक भान राखून कॉमेडी अँगलने मोठ्या पडद्यावर 2019 साली प्रदर्शित करण्यात आले. बाला या चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केले आहे. या चित्रपटाचे बजेट 40 कोटी रुपयांचे असून या चित्रपटाने 171.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यामध्ये आयुष्मान खुरानाने टक्कल पडलेल्या व्यक्तिची भूमिका साकारली आहे.
ड्रीम गर्ल (Dream Girl)
2019 साली प्रदर्शित झालेला ड्रीम गर्ल हा चित्रपट लोकांच्या आजही लक्षात आहे या चित्रपटाचे दिग्दर्शन राज शांदील्या यांनी केले असून ही एक लो बजेट फिल्म आहे. या चित्रपटाचे बजेट 28 कोटी रुपयांचे होते. तर प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे 200 कोटी रुपयांचा गल्ला जमवण्यात या चित्रपटाला यश मिळाले. लवकरच आयुष्मानचा 'ड्रीम गर्ल 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट देखील चांगली कमाई करेल, असे बोलले जात आहे. LGBTQ या समुदायावर आधारित या चित्रपटाचा आशय आहे.