बॉलीवूडमधील अष्टपैलू कलाकार म्हणून आयुष्मान खुरानाला (Ayushmann Khurrana) ओळखले जाते. गेल्या काही वर्षांमध्ये त्याने अनेक दर्जेदार चित्रपटात काम केले आहे. ज्याला प्रेक्षकांनी देखील बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद दिला होता. येत्या 25 ऑगस्टला आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडेचा 'ड्रीम गर्ल 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात आयुष्मानने स्त्री व्यक्तिरेखा साकारली आहे. या व्यक्तिरेखेचे नाव पूजा आहे.
नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. हा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे. या चित्रपटातील आयुष्मानच्या लुकमुळे तो चांगला चर्चेत आला आहे. यानिमित्ताने त्याच्या आगामी 'ड्रीम गर्ल 2 (Dream Girl 2)' या चित्रपटातील व्यक्तिरेखा आणि चित्रपटाचे बजेट या बद्दल जाणून घेऊयात.
Source- BalajiMotionPictures
'ड्रीम गर्ल 2' चा ट्रेलर प्रदर्शित
'ड्रीम गर्ल 2' या चित्रपटाचे दिग्दर्शन राज शांदिल्या (Raj Shandilya) यांनी केले आहे. तर या चित्रपटाची निर्मिती एकता कपूर (Ekta Kapoor) आणि शोभा कपूर (Shobha Kapoor) यांनी केली आहे. बालाजी मोशन पिक्चर्स (Balaji Motion Pictures) तर्फे हा चित्रपट प्रोड्यूस करण्यात आला आहे. येत्या 25 ऑगस्टला हा चित्रपट देशभरातील सिनेमागृहात प्रदर्शित केला जाणार आहे. ज्यामध्ये आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana), अनन्या पांडे (Ananya Pandey), परेश रावल (Paresh Rawal), अनु कपूर (Anu Kapoor), राजपाल यादव (Rajpal Yadav) आणि मनोज सिंग (Manoj Singh) यासारख्या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
यापूर्वी आयुष्मानचा ड्रीम गर्ल हा चित्रपट 2019 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा चित्रपट लो बजेट होता.मात्र प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे या चित्रपटाने तब्बल 200 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. त्यामुळे 2023 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या 'ड्रीम गर्ल 2' कडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. हा चित्रपट देखील चांगली कमाई करेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
चित्रपटाचे बजेट जाणून घ्या
आयुष्मान खुरानाचा 'ड्रीम गर्ल 2' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. Check My Budget आणि MTWiki Blog या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार हा चित्रपट एक लो बजेट फिल्म आहे. या चित्रपटाचे संपूर्ण बजेट 50 कोटी रुपयांचे आहे. ज्यामध्ये 40 कोटी रुपये प्रोडक्शन खर्च असून 10 कोटी रुपये जाहिरातीवर खर्च करण्यात येणार आहेत.