इंधनाचे दर वर्षभरापासून स्थिर असले तरी त्याचा फारसा परिणाम वाहन उद्योगावर झालेला नाही. वाहन उद्योगासाठी जुलै महिना फायदेशीर ठरला असून दुचाकी, तीन चाकीसह प्रवाशी वाहनांच्या विक्रीत सरासरी 10% वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.
वाहन विक्रेत्यांची संघटना फेडरेशन ऑफ ऑटो डिलर्स असोसिएशनने (FADA)जुलै महिन्यात वाहन विक्रीचा तपशील जाहीर केला. त्यानुसार जुलै महिन्यात सर्वच श्रेणीतील 17 लाख 70 हजार वाहनांची विक्री झाली. जुलै 2022 च्या तुलनेत यंदा वाहन विक्री 10% वाढ झाली.
वार्षिक आधारावर वाहन विक्री वाढली असली तर महिन्याच्या तुलनेत ती कमीच आहे. गेल्या महिन्यात देशभरात पावसाने थैमान घातले होते. त्यामुळे जून महिन्याच्या तुलनेत जुलैमध्ये मॉन्सून धो धो बरसला. याचा परिणाम बाजारपेठेवर झाला. जूनच्या तुलेनत जुलैमधील वाहन विक्रीत 5% घसरण झाली.
गेल्या महिन्यात तीन चाकी वाहन विक्रीने रेकॉर्ड केला आहे. तीन चाकी वाहनांच्या विक्रीत 74% वाढ झाली. तीन चाकी वाहनांना बाजारात प्रचंड मागणी असल्याने हे एक चांगले संकेत असल्याचे फेडरेशन ऑफ ऑटो डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष मनीष राज सिंघानिया यांनी सांगितले.
देशभरातून मागील महिनाभरात 94 हजार 148 तीन चाकी वाहनांची विक्री झाली. याशिवाय दुचाकी वाहनांच्या विक्रीत 8% वाढ झाली. प्रवासी वाहन विक्रीत 4% , ट्रॅक्टर्सच्या विक्रीत 21%, व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत 2% वाढ झाली.
ऑटो इंडस्ट्री आता पूर्णपणे कोव्हीड संकटातून सावरली आहे. कोव्हीडनंतर या उद्योगाने झपाट्याने वृद्धी केली. ग्राहकांच्या गरजांनुसार वाहनांची नवी श्रेणी विकसित करण्यात आली. काळानुरुप बदल करत इलेक्ट्रिक वाहनांकडे उत्पादक कंपन्यांनी भर दिल्यानेच एकूण विक्रीत वाढ झाल्याचे दिसून येते.
प्रवासी वाहनांच्या श्रेणीत मारुती सुझुकी अव्वल स्थानी आहे. मारुती सुझुकीने जुलै महिन्यात 1 लाख 6 हजार 689 मोटारींची विक्री केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मारुतीच्या विक्रीत 10% वाढ झाली. दुसऱ्या स्थानी ह्युंदाई असून तिसऱ्या स्थानावर टाटा मोटर्स आहे.
बजाज ऑटोच्या एकूण वाहन विक्रीत 115% वाढ झाली आहे. यात मुख्यत्वे तीन चाकी वाहनांच्या विक्रीने कंपनीला फायदा झाला. जुलै महिन्यात बजाज ऑटोने 31 हजार 453 तीन चाकी वाहनांची विक्री केली.
हिरो मोटो कॉर्पची दमदार कामगिरी
दुचाकी बाजारपेठेत हिरो मोटो कॉर्पचे वर्चस्व कायम आहे. जुलै महिन्यात हिरो मोटो कॉर्पने 3 लाख 61 हजार 291 मोटारसायकलींची विक्री केली. त्याखालोखाल टीव्हीएस मोटर असून कंपनीने 2 लाख 13 हजार 101 दुचाकींची विक्री केली. होंडा मोटारसायकलच्या विक्रीत 9% वाढ झाली.