राजधानी दिल्ली परिसरातील नोयडा येथे ऑटो एक्स्पो २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. या ऑटो एक्स्पोमध्ये वाहन निर्मिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचे नमुने सादर करत आहेत. जनरेटर आणि इंजिन निर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी कमिन्सने ऑटो एक्स्पोमध्ये आत्याधुनिक इंजिनची मॉडेल्स सादर केली आहेत. जी हायड्रोजनवर देखील चालू शकता. सोबतच कमीत कमी ते झिरो कार्बन एमिशन करणारे इंजिन कंपनीने सादर केले आहे. या इंजिन्समुळे भविष्यात गाड्यांमधील प्रदूषण कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. मोठ्या ट्रकदेखील हायड्रोजन इंधनावर धावतील, असा दावा कंपनीने केला आहे.
जीवाश्म इंधानामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. त्यामुळे सरकारने इलेक्ट्रिक गाड्यांना प्रोत्साहन देण्यास सुरू केले आहे. या क्षेत्रातील कंपन्यांना निर्मितीसाठी अनुदानही देण्यात येत आहे. टोयोटा सारख्या कंपन्यांनी हायड्रोजन फ्यूअलवर चालणाऱ्या गाड्यांची चाचणी सुरू केली आहे. कमिन्सच्या टेक्नॉलॉजीने भविष्यात गाड्यांमधून होणारे प्रदूषण शुन्यापर्यंत खाली येऊ शकते. कंपनीने Hydrogen Internal Combustion Engine (B6.7H) ऑटो एक्स्पोमध्ये सादर केले आहे. या इंजिनमधून झिरो कार्बन एमिशन होते.
कमिन्स कंपनीचा fuel-agnostic प्लॅटफॉर्म तयार झाला असून याद्वारे हायड्रोजन कम्बशन इंजिनची चाचणी घेण्यात येत आहे. या इंजिनचे प्रोटोटाइपही तयार करण्यात आले आहे. या वर्षाच्या शेवटी अत्याधुनिक इंजिनाचे काही युनिट्स तयार करण्यात येतील. मात्र, पुढील वर्षीपासून पूर्ण क्षमतेने इंजिनचे उत्पादन तयार करण्यात येईल, असे कंपनीचे संचालक अश्वथ राम यांनी सांगितले.
शाश्वत विकासासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा शोध आपण घेतला पाहिजे. त्यामुळे आपले भविष्यही सुरक्षित होईल. त्यामुळे आम्ही अल्ट्रा लो ते झिरो कार्बन उत्सर्जन करणारे इंजिन तयार केले आहे. मोठ्या आणि मध्यम आकाराच्या ट्रक हायड्रोजन इंधनावर धावतील, असे राम यांनी म्हटले. आटो एक्सोपमध्ये आघाडीच्या वाहन निर्मिती कंपन्यांनी नवनवीन कार्सची मॉडेल सादर केली. जगभरातली वाहन निर्मिती क्षेत्रातील कंपन्या या मेळाव्यामध्ये सहभागी झाल्या आहेत.