Pandharpur Wari 2023: आषाढी एकादशीनिमित्त संपूर्ण देशभरातून भाविक, वारकरी मोठ्या संख्येने पंढरपुरात दाखल होतात. यावर्षी 29 जून रोजी आषाढी एकादशी आहे. यादरम्यान विठ्ठलाला मोठ्या प्रमाणात तुळशीची माळा अर्पण केली जातात. विठ्ठलाला प्रिय असलेल्या तुळशीवर पंढरपुरातील अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. इतक्या मोठ्या प्रमाणात या तुळशी पंढरपुरात कोठून येतात? त्याची शेती कुठे केली जाते? यामधून किती जणांना रोजगार मिळतो? वारीच्या काळात यातून किती रुपयांची उलाढाल होते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊया.
Table of contents [Show]
तुळशीचे धार्मिक महत्त्व
तुळशीमध्ये श्री विष्णूची स्पंदनं आकर्षित करण्याची शक्ती असते. विठ्ठल हे श्री हरी विष्णुचेच मनमोहक रुप आहे. त्यामुळे विठ्ठलाच्या मूर्तीला तुळस वाहिल्याने ती जागृत व्हायला मदत होते, आणि भक्ताला याचा लाभ होतो. तसेच तुळस ही लक्ष्मीचे प्रतिक आहे. त्यामुळे देखील विठ्ठलाला अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे. या सगळ्या धार्मिक बाबी विचारात घेता, विठ्ठलाचरणी तुळशीचे महत्त्व किती हे आपल्या लक्षात येते.
तुळशीचे पीक कुठे घेतले जाते?
पंढरपूरला लागूनच असलेल्या आजुबाजूच्या परिसरातून तुळशीचे पीक घेतले जाते. तुळशीच्या मंजुळा जमिनीत टाकल्यानंतर किंवा तुळशीची अगदी लहान रोपे लावल्यानंतर, साधारण दोन ते अडीच महिन्यात तुळशीचे पिक हाताशी येते. त्यानंतर तुळशीच्या हिरव्यागार छोट्या-छोट्या फांद्या आणि मंजुळाच्या साहाय्याने तुळशीचा हार तयार केला जातो. तर तुळशीच्या जाड खोडापासून वारकरी गळ्यात घालतात अशा माळा तयार केल्या जातात. वारकरी गाळ्यात घालत असलेली तुळशीच्या माळेची किंमत 30 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत असते.
आठवडी बाजारात तुळशीच्या जुड्यांची बोली
पंढरपुरात काशी कापडी समाजाचे 300 ते 400 कुटुंबं आहेत. ते या तुळशीच्या पिकांचे उत्पादन घेतात. तर माळी समाजातील 100 ते 150 कुटुंबे, या तुळशीच्या डहाळ्यांचा आणि मंजुळांचा हार तयार करुन विकतात. पंढरपुरात वारीच्या निमित्ताने विशेषत: आषाढी एकादशीला या कुटुंबांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो. तसेच वर्षभर देखील या कुटुंबांचे हार तयार करण्याचे काम सुरू असते. प्रत्येक आठवड्याला पंढरपूर येथे भरणाऱ्या आठवडी बाजारात तुळशीच्या जुड्यांची बोली लावली जाते. हार गुंफून विकणारे किरकोळ विक्रेता या बाजारामधून तुळशीच्या जुड्या विकत घेतात. त्यामुळे या व्यवसायात देखील शेतकरी, माळा गुंफणारा वर्ग आणि विक्रेता अशी साखळी दिसून येते.
तुळशीचा ठोक भाव काय?
आठवडी बाजारात विकल्या जाणाऱ्या तुळशीच्या जुडीचे दर हे तुळशीच्या क्वॉलिटीनुसार (प्रकार आणि दर्जा) ठरवले जातात. अतिशय बारीक गुणवत्तेची तुळशीची जुडी ही 40 रुपये किलोने विकली जाते. तर चांगल्या गुणवत्तेची भरीव अशी तुळशीची जुडी ही 70 ते 80 रुपयाला विकली जाते.
वर्षभरात 25 ते 30 लाखांची उलाढाल
माळा गुंफणारे किंवा माळा विकणारा वर्ग आठवडी बाजारातून माल घेतात. एकतर माळा गुंफणारा वर्ग केवळ माळा गुंफून विक्रेत्याला विकण्यास देतो. तर काही ठिकाणी विक्रेताच आपल्या घरी माळा गुफूंन भाविकांना विकतो. साधारणपणे लहान आणि मध्यम आकाराचा तुळशीचा हार 10 ते 20 रुपयाला विकला जातो. तसेच चांगला मोठा असा विशिष्ट स्वरुपात तयार केलेला तुळशीचा हार 80 ते 100 रुपयाला विकला जातो. पंढरपूर येथे हार विक्रेते हातात टोपले घेऊन हे हार विकत असतात. पंढरपूरमध्ये होणाऱ्या चार वारी आणि वर्षभरातील किरकोळ व्यवसायातून वर्षाला 25 ते 30 लाखांची उलाढाल या तुळशीमधून होत असते.