Life Insurance Suicidal Death Cover: जीवन विमा, आरोग्य विमा पॉलिसीचे महत्त्व आम्ही तुम्हाला महामनीच्या विविध लेखांतून सांगतच असतो. या पॉलिसींमधील बारकावे सांगण्याचाही आमचा प्रयत्न असतो. या लेखात आपण जीवन विमा संबंधित शंकांचे निरसण करू. घरातील कमावत्या व्यक्तीसाठी जीवन विमा अत्यंत गरजेचा आहे. जर कुटुंबातील कमावत्या व्यक्तीची पॉलिसी असेल आणि त्याचा अचानक मृत्यू झाला तर जी सम अश्युअर्ड (विम्याची रक्कम) वारसदाराला (नॉमिनी) मिळते. त्यामुळे कुटुंब आर्थिक अडचणीत येण्यापासून वाचते. मात्र, पॉलिसीधारकाने आत्महत्या केली तर जीवन विम्याची रक्कम नॉमिनीला मिळते का? असा प्रश्न पडू शकतो. बरेच जण पॉलिसी काढताना याबाबत सविस्तर माहिती एजंट किंवा विमा कंपनीला विचारत नाहीत.
जीवन विमा पॉलिसीतील अटी आणि नियम (Rules in Life Insurance policy)
आत्महत्या ही अत्यंत क्लेशदायक आणि संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करणारी घटना आहे. कमावत्या व्यक्तीने जर आत्महत्या केली तर कुटुंबाची कशी वाताहत होते हे तुम्ही पाहिले असेल. (Life Insurance Suicidal Deaths Cover) नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या आकडेवारीनुसार 2019 साली भारतात 1 लाख 39 हजार व्यक्तींनी आत्महत्या केली. आत्महत्या केल्यानंतरही विम्याची रक्कम मिळते का? प्रश्नाचे उत्तर इतके सरळ सोपे नाही. या तरतूदीचा पॉलिसीधारकाकडून अनेक वेळा गैरफायदा घेतल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे कंपनीकडून आत्महत्या बाबत विविध अटी पॉलिसीमध्ये ठेवण्यात येतात.
आत्महत्या किती वर्ष कव्हर होत नाही? (Suicide exclusion period in Life Insurance)
लाइफ इन्शुरन्स हा विमा कंपनी आणि पॉलिसीधारकामधील एक करार आहे. त्यानुसार व्यक्तीला ठराविक वर्ष प्रिमियम भरून जीविताचे संरक्षण मिळते. म्हणजेच पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदाराला करारातील तरतूदीनुसार विम्याची रक्कम मिळते. अनेक जीवन विमा कंपन्या पॉलिसी काढल्यानंतरची पहिली एक किंवा दोन वर्ष आत्महत्येपासून संरक्षण देत नाहीत. काही विमा कंपन्या आत्महत्येपासून पॉलिसी काळ संपेपर्यंत संरक्षण देत नाही. म्हणजेच पॉलिसी टर्ममध्ये कधीही आत्महत्या केली तरी वारसदारांना विम्याची रक्कम मिळत नाही. पॉलिसीचा भरलेला प्रिमियम मात्र माघारी मिळू शकतो.
उदाहरणार्थ. एखाद्या विमा कंपनीने सुरुवातीचे दोन वर्ष आत्महत्येपासूनचे संरक्षण वगळले असेल आणि या काळातच पॉलिसीधारकाने आत्महत्या केली तर कंपनी दावा पास करणार नाही. मात्र, खातेधारकाने भरलेले प्रिमियम माघारी करू शकते. प्रत्येक पॉलिसीनुसार यात बदल होऊ शकतो. तुम्ही जीवन विमा काढताना याबाबत माहिती विमा प्रतिनिधीला विचारायला हवी. जीवन विमा पॉलिसी काढल्यानंतर फसवणूक करून विम्याचे पैसे मिळवण्याचा प्रयत्न देखील होतो. गैरफायदा घेतला जाऊ नये यासाठी विमा कंपन्यांनी अनेक नियम व अटी घातलेल्या असतात. मात्र, जर एक्सक्लूजन पिरियड नंतर आत्महत्या केली असेल तर विम्याची रक्कम कंपनीला द्यावी लागते. तसेच, औषधांच्या अतीसेवनामुळे किंवा कार अपघातात मृत्यू झाल्यास विम्याची रक्कम मिळू शकते.
मृत्यू कोणत्या परिस्थितीत झाला? (Life Insurance death circumstances)
आत्महत्या कोणत्या परिस्थितीत झाली त्यावरुनही दावा मंजूर होईल की फेटाळला जाईल हे ठरते. जर मद्य किंवा अंमली पदार्थांच्या प्रभावाखाली असताना व्यक्तीने आत्महत्या केली तर कंपनी दावा नाकारू शकते. तसेच गुन्हेगारी, बेकायदेशीर कृत्य करताना मृत्यू झाल्यासही कंपनी विम्याचा दावा नाकारू शकते. जोखमीचे/साहसी खेळ प्रकार जसे की, स्कुबा ड्रायव्हिंग, ट्रेकिंग, स्कायडायव्हिंग करताना मृत्यू झाल्यास विमा कंपनी दावा नाकारू शकते. यासंबंधीत अटी पॉलिसीमध्येही लिहलेल्या असतात. त्या पॉलिसी विकत घेताना बारकाईने वाचायला हव्यात.