तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आणि त्याच्या उद्योग व्यवसायातील वापरामुळं मागील काही वर्षांपासून मनुष्यबळाची गरज कमी झाली आहे. भविष्यामध्ये तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आणखी काही नोकऱ्या जातील अशी शक्यता आहे. विविध क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर वाढला आहे. अॅपल कंपनीने ऑडिओ बुक वाचण्यासाठी (AI Book Narration) मनुष्याच्या आवाजापेक्षा कृत्रिम आवाजांना प्राधान्य देणे सुरू केले आहे. कृत्रिम आवाजात रेकॉर्ड केलेली काही ऑडिओबुक कंपनीने अॅपल ऑडिओ बुक कॅटलॉगमध्ये समाविष्ट केली आहेत.
कृत्रिम आवाजाच्या वापरामुळे भविष्यात व्हाइस ओव्हर देणारे आणि बुक नॅरेटर यांना मिळणारी कामे कमी होऊ शकतात. कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे लहान मुलगा, वृद्ध, महिला किंवा पुरुष कोणाच्याही आवाजाची निर्मिती करता येऊ शकते. त्या आवाजाद्वारेच स्टोरी रीड केली जाईल. जास्तीत जास्त पुस्तके ऑडिओ बुक स्वरुपात बाजारात आणण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे. तसेच ऑडिओबुकची मागणी ग्राहकांकडून वाढत आहे. या क्षेत्रातील संधी पाहता अॅपलने हा निर्णय घेतला असावा.
अॅपलच्या या निर्णयामुळे भविष्यात इतर ऑडिओबुक कंपन्याही कृत्रिम आवाजाचा वापर ऑडिओबुक वाचण्यासाठी करू शकतात. अॅपलच्या बुक सेक्शनमध्ये AI narration या नावाचा वेगळा सेक्शन तयार करण्यात आला आहे. हे फिचस सुरुवातीला फक्त रोमान्स आणि फिक्शन कॅटेगरीतील पुस्तकांसाठी उपलब्ध आहे. यासाठी विविध कृत्रिम आवाजाचे परसोना (Persona)तयार करण्यात आले असून त्यांना मॅडिसन, जॅक्सन हेलेना, मिशेल असे व्यक्तीची नावे देण्यात आली आहे. तुम्हाला जो कृत्रिम आवाज आवडेल त्या आवाजात तुम्ही पुस्तक वाचू शकता.
कृत्रिम आवाजाला मर्यादा असून व्यक्ती ज्या प्रमाणे भावभावना आवाजात आणतो तशा भावना कृत्रिम आवाजाला कधीही आणता येणार नाही. त्यामुळे मानवी आवाजाला भविष्यातही किंमत राहील, असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. तंत्रज्ञानाची प्रगती पाहता भविष्यामध्ये कृत्रिम आवाजातही मानवी सेंटिमेंट आणि भाव आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जसे की, आनंदी आवाज, दुखी व्यक्तीचा आवाज, राग व्यक्त करतानाचा आवाज, या विविध व्हाइस मॉडेल्सवर आयटी कंपन्या काम करत आहेत.