फळांची वाढती मागणी आणि चांगला दर मिळत असल्याने शेतकरी वर्ग आता मोठ्या प्रमाणात फळ बागायतीकडे वळला आहे. त्याचप्रमाणे डाळींब (Pomegranate ) उत्पादनात महाराष्ट्र राज्य हे आघाडीचे राज्य म्हणून ओळखले जात आहे. दरम्यान, अमेरिकेकडून भारतातील डाळींब आयातीवर लावण्यात आलेली बंदी उठवण्यात आली आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय कृषी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण (APEDA) यांच्याकडून चाचणी अंतर्गत डाळिंबाची पहिली खेप अमेरिकेला रवाना करण्यात आली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील डाळींब उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
अमेरिकेने आयात बंदी उठवली-
अमेरिकेने 2018 मध्ये फळ माशीच्या प्रादुर्भावामुळे भारतातील डाळिंबाच्या आयातीवर बंदी घातली होती. त्यानंतर केंद्र सरकारच्या प्रयत्नातून ही बंदी उठवण्यात आली आहे. दरम्यान आता कृषी माल निर्यात धोरण राबवण्याऱ्या अपेडा (APEDA) कडून नुकतेच अमेरिकेला भारतामधून ताज्या डाळिंबाची पहिली निर्यात करण्यात आली आहे. ही खेप चाचणी म्हणून पाठवण्यात आली आहे. या खेपेसाठी अपेडासह अमेरिकेचा प्राणी आणि वनस्पती आरोग्य तपासणी सेवा (US-APHIS), महाराष्ट्र राज्य कृषी विपणन मंडळ (MSAMB) आणि राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्र सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ही डाळिंबाची पहिली खेप अमेरिकेला रवाना करण्यात आली आहे. अपेडाकडून भगवा या डाळिंबाची निर्यात करण्यात आली आहे.
भारतीय डाळिंबास चांगला प्रतिसाद
अमेरिकेच्या नियम आणि अटीनुसार 28 जुलैला 450 पेटी डाळींब निर्यात करण्यात आले आहे. त्यानंतर आता भारतीय डाळिंबाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती APEDA चे अध्यक्ष, श्री अभिषेक देव यांनी दिली आहे. त्यामुळे आता अमेरिकेला डाळिंबाच्या निर्यातीत वाढ झाल्यामुळे किंमत वाढेल आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे.
सोलापूर जिल्ह्यात निर्यातक्षम डाळींब-
भारतामध्ये निर्यातक्षम डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात आहे. विशेषत: भगवा या डाळिंबाच्या वाणास मोठ्या प्रमाणात मागणी आहे. जगभरात डाळींब पिकवण्यामध्ये भारताचा सातवा क्रमांक लागतो. तर भारताच्या एकूण डाळींब उत्पादनापैकी 50% उत्पादन हे एकट्या सोलापूर जिल्ह्यातून घेतले जाते. भारतात डाळिंबाच्या एकूण लागवडीखालील क्षेत्र जवळपास 275500 हेक्टर इतके आहे. यामध्ये भगवा गणेश, आरक्ता या डाळिंबाच्या वाणांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. तर सोलापूर जिल्ह्यातील डाळिंबामध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात क्षमता आहे. त्यामुळे परदेशात याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
मिळणार अधिक दर
डाळिंबाच्या निर्यातीमध्ये आणखी वाढ झाल्यास भविष्यात डाळिंबाला अधिक दर मिळण्याची शक्यता असल्याचे मत अपेडाचे अध्यक्ष देव यांनी व्यक्त केले आहे. तसेच सोलापूर जिल्हा हा भारतामधील एक प्रमुख डाळींब उत्पादक देश आहे. त्यामुळे निर्यात वाढल्यास येथील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळणार आहे.