Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Online Fraud Alert: जामताराहून पाठवली AnyDesk ची लिंक आणि काही मिनिटातच बँक खातं झालं रिकामं!

Online Fraud Alert

जामतारा येथील सायबर चोरांनी AnyDesk च्या सहाय्याने मुंबईतील एका वृद्धाचे बँक डीटेल्स मिळवले आणि काही मिनिटातच त्यांच्या खात्यातील 1 लाख 80 हजार रुपये लंपास केले. खात्यातून पैसे काढले गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर चोराला फोन करायचा प्रयत्न केला मात्र फोन क्रमांक स्वीच ऑफ दाखवला जात होता...

ऑनलाईन आर्थिक व्यवहार करताना प्रत्येकाने खूप खबरदारी घेतली पाहिजे हे वारंवार आरबीआय, पोलीस आणि इतर सरकारी यंत्रणातर्फे नागरिकांना सांगण्यात येते. परंतु तंत्रज्ञानाची समज नसलेले नागरिक अजूनही ऑनलाईन आर्थिक फसवणुकीला बळी पडताना दिसतायेत. अशीच एक घटना मुंबईत घडली आहे.

मुंबईतील कांदिवली परिसरात राहणाऱ्या एका 70 वर्षीय वृध्द व्यक्तीने बाहेरगावी जाण्यासाठी व्हिसासाठी अर्ज केला होता. त्यांचा व्हिसा त्यांना कुरियरने पाठवला जाईल असे संबंधित ट्रॅव्हल कंपनीने त्यांना कळवले होते. वेळेवर कुरियर न पोहोचल्यामुळे या व्यक्तीने सदर कुरियर कंपनीचा संपर्क क्रमांक गुगलवर शोधला. मात्र तिथे दिलेल्या क्रमांकावर त्यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यानंतरही त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. परंतु काही तासांनी त्यांना कुरियर कंपनीच्या नावे एका व्यक्तीने फोन केला आणि त्यांचे कुरियर आपल्याकडे असून ते पोहोच करायचे आहे असे सांगितले. कुरियर हवे असेल तर एनीडेस्क (AnyDesk) नावाचे सॉफ्टवेयर तुमच्या कॉम्प्युटरवर डाउनलोड करावे लागेल असे सांगितले.

व्हिसाच्या प्रतीक्षेत असलेल्या या वृध्द गृहस्थाने मागचा पुढचा कसलाही विचार न करता एनीडेस्क (AnyDesk) सॉफ्टवेयर त्यांच्या कॉम्प्युटरवर डाउनलोड केले आणि फोनवर बोलत असलेल्या व्यक्तीने पाठवलेली लिंक ओपन केली. यानंतर त्या व्यक्तीने वृद्धाला 2 रुपये गुगल पे करण्यास सांगितले, त्यानंतर बाकी व्यवहार करून कुरियर पाठवले जाईल असे त्या सायबर चोराने वृद्धाला सांगितले.

वृध्द व्यक्ती गुगल पे वर पैसे पाठवण्यात व्यस्त असतानाच काही मिनिटातच सायबर चोराने एनीडेस्कच्या सहाय्याने त्या वृद्धाचे बँक डीटेल्स मिळवले. पुढील काही मिनिटातच त्यांच्या खात्यातील 1 लाख 80 हजार इतकी रक्कम लंपास केली. खात्यातून पैसे काढले गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर चोराला फोन करायचा प्रयत्न केला मात्र फोन क्रमांक स्वीच ऑफ दाखवला जात होता. आपली फसवणूक झाल्याचे वृद्धाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी थेट कांदिवली पोलीस स्टेशन गाठले आणि सायबर क्राईम विभागाकडे तक्रार नोंदवली.

जामतारा कनेक्शन 

सदर प्रकरणाचा तपास करत असताना ज्या नंबरहून फोन आला व गुगल पे द्वारे 2 रुपये पाठवले गेले त्याचा शोध पोलिसांनी लावला. हा फोन क्रमांक झारखंड राज्यातील जामतारा येथील असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. परंतु सायबर चोरी केल्यानंतर सिमकार्ड बंद केल्याने सायबर चोराशी थेट संपर्क होत नव्हता. मात्र ज्या मोबाईल फोनवरून ही सायबर चोरी केली गेली होती, तो मोबाईल फोन वापरात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले होते. याचा अधिक तपास केल्यानंतर या गुन्हात गुलझार अन्सारी, सरफन अन्सारी आणि सईद अन्सारी या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे तिघेही आरोपी जामतारा येथील असून वृद्धांच्या बँक खात्याहून लंपास केलेली रक्कम त्यांनी दिल्ली आणि कलकत्ता येथील त्यांच्या मित्रांच्या खात्यावर वळती केली होती. याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.

ऑनलाईन फसवणुकीपासून कसे वाचाल?

गुगलवर उपलब्ध असलेले सगळेच नंबर खरे असतील असे नाही. ज्या कंपनीची तुम्हांला संपर्क साधायचा आहे त्या कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊनच संपर्क नंबर घ्या. फोनवर कुणाशी संपर्क साधताना कुठलेही आर्थिक व्यवहार करू नका. कुणी सांगितले म्हणून कोणतेही सॉफ्टवेयर कॉम्प्युटर किंवा मोबाईल फोनमध्ये डाऊनलोड करू नका.त्याद्वारे सायबर चोराला तुमची खासगी माहिती, बँकेचे तपशील आरामात मिळू शकतील आणि तुमचे नुकसान होऊ शकते.