शेती व्यतिरिक्त अनेक शेतकऱ्यांसाठी दुग्धव्यवसाय हे उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन आहे. बहुतेक शेतकरी यासाठी जनावरे खरेदी करतात. त्यांची निगा राखतात. अनेक गावांमध्ये गाय, म्हैस आणि बैल यांच्या खरेदी-विक्रीसाठी आठवडा बाजार भरवला जातो. यातून दर आठवड्याला मोठी आर्थिक उलाढाल होत असते. याच अनुशंघाने आयआयटी दिल्ली (IIT Delhi) मधील दोन विद्यार्थिनींनी हा जनावरांचा खरेदी-विक्रीचा व्यापार सुरळीत व्हावा यासाठी अॅप तयार केले आहे.
अॅपच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कमाई
सध्याच्या घडीला गावातील यात्रेच्या दरम्यान जनावरांची खरेदी-विक्री केली जाते. पण आयआयटी दिल्लीच्या दोन विद्यार्थिनींनी यासाठी एक अॅप तयार केले आहे. जिथे जनावरांची खरेदी-विक्री करता येते. या अॅपच्या माध्यमातून त्यांनी कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. उद्योग सर्वेक्षण संस्था Startup Pedia च्या अहवालानुसार, AniMall App ने मागील वर्षात 7.4 कोटी रुपयांची कमाई केली. तर काही महिन्यातच कंपनीने 565 कोटी रुपयांची कमाई केली. त्याचवेळी, एनिमलला नेक्सस व्हेंचर्स, बीननेक्स्ट यासारख्या मोठ्या गुंतवणूकदारांकडून 170 कोटी रुपयांची गुंतवणूक देखील मिळाली आहे.
बिझनेस आयडिया उतरली सत्यात
आयआयटी दिल्ली येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनी नीतू यादव आणि कीर्ती जांगरा वसतिगृहाच्या एकाच खोलीत एकत्र राहत होत्या. यामुळे त्यांची घनिष्ट मैत्री झाली होती. त्यांनी यावेळी स्वतःचा व्यवसाय उभारायचे ठरवले. अशा परिस्थितीत पशुसंवर्धन व दुग्धव्यवसायात शेतकऱ्यांना अधिक सुलभता उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, नोव्हेंबर 2019 मध्ये, दोन सहकाऱ्यांसोबत मिळून या व्यवसायाच्या पायाभरणीला सुरुवात केली. अनुराग बिसोय, कीर्ती जांगरा, लिव्हीन व्ही बाबू व नीतू वाय यांनी या अॅपची निर्मिती केली.
लहानशा रूममधून केली कंपनीची सुरुवात
नीतू व कीर्ती या दोघींनी मिळून बंगळुरू येथे एका छोट्याशा रूममधून कंपनीची सुरुवात केली. प्रारंभीला व्यवसाय संथ गतीने चालला होता. पण हळुहळू जनावरे खरेदी करणाऱ्यांची ऑर्डर वाढू लागली. AniMall हे अॅप खरेदी-विक्री सोबतच पशु संवर्धनासाठी सेवा देखील प्रदान करते. गेल्या वर्षात कंपनीची 90% कमाई गुरे खरेदी-विक्रीतून तर उर्वरित 10% उत्पन्न वैद्यकीय सेवेतून झाली.
www.indiatimes.com