Expensive Housing Cities: एखाद्या शहरात आपले घर असावे, असे प्रत्येकाला वाटते. परंतु,जर तुम्ही मोठ्या शहरांमध्ये घर घेण्याचे स्वप्न बघत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या शेवटच्या तिमाहीत, 50 पैकी 43 मोठ्या शहरांमध्ये मालमत्ता खरेदी करणे प्रचंड महाग झाले आहे. नॅशनल हाऊसिंग बँकेने (NHB) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील अनेक शहरांमध्ये मालमत्तेच्या किमतीत 11 टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवण्यात आली आहे. जाणून घेऊया कोणत्या शहरांच्या मालमत्तेमध्ये वाढ झाली आहे आणि कोणत्या शहरांच्या मालमत्तेत घट झालेली आहे ते.
कोणत्या शहरात किती टक्के वाढ
देशात अशी अनेक मेट्रो शहरे आहेत, जिथे मालमत्तेच्या किमतीत मोठी वाढ नोंदवली गेली आहे. यामध्ये कोलकाता शहर पहिल्या क्रमांकावर आहे. येथील मालमत्तेच्या किमतीत 11 टक्क्यांची जोरदार वाढ नोंदवण्यात आली आहे. तर अहमदाबादमध्ये 10.8 टक्के, बंगळुरूमध्ये 9.4 टक्के, पुणे येथे 8.2 टक्के, हैदराबादमध्ये 7.9 टक्के, चेन्नईत 6.8 टक्के, मुंबईमध्ये 3.1 टक्के आणि दिल्लीत 1.7 टक्क्यांनी मालमत्तांच्या किमती वाढल्या आहेत.
या शहरांमध्ये झाली घट
ज्या शहरांच्या मालमत्तेत घट झाली आहे, त्यात नवी मुंबई, कोची, फरिदाबाद, कोईम्बतूर, रायपूर, फरिदाबाद, दिल्ली, न्यू टाऊन कोलकाता, विधाननगर या शहरांचा समावेश आहे.
रायपूरमध्ये मालमत्तेच्या कमाल किमती 6.7 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. दुसरीकडे गृहकर्ज कंपन्यांच्या आकडेवारीनुसार, चौथ्या तिमाहीत वार्षिक आधारावर, मागील वर्षाच्या तुलनेत घरांच्या किमतीत 5.3 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.
रेपो दर कायम ठेवल्याचा परिणाम
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीने आर्थिक वर्ष 2024 च्या दुसऱ्या बैठकीदरम्यानही रेपो दरात बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेपो दर 6.5 टक्क्यांवर स्थिर राहील. अशा परिस्थितीत,घर खरेदीदारांसाठी ही एक दिलासा देणारी बातमी आहे. कारण त्यांच्यावर ईएमआयचा बोजा वाढणार नाही आणि यामुळे मालमत्ता खरेदीदारांमध्ये उत्साह कायम असल्याचा दिसून येत आहे.