अमरा राजा बॅटरीजच्या (ARBL) शेअर्समध्ये बुधवारी 6 टक्क्यांहून अधिक घसरण झाल्यानंतर गुरूवारी सकाळी बाजार सुरू होताच शेअरमध्ये आणखी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. आज बाजार सुरु झाल्यानंतर अमरा बॅटरीजचे शेअर 4 टक्क्यांनी घसरून 618.60 रुपयांवर व्यवहार करीत आहे. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अमरा राजा बॅटरी ही कंपनी भारतातील आघाडीची औद्योगिक आणि ऑटोमोटिव्ह बॅटरी निर्माण करणारी कंपनी म्हणून ओळखली जाते.
बुधवारीही झाली होती घसरण
बुधवारी शेअर बाजार बंद होईल पर्यंत अमरा राजा बॅटरीजच्या शेअर्समध्ये 6 टक्क्यांहून अधिक घसरण झाली होती. मार्केट बंद झाले तेव्हा ARBLचे शेअर 6.43 टक्क्यांनी घसरून 685 रुपयांवर व्यवहार करीत होते. बुधवारी राष्ट्रीय शेअर बाजारात कंपनीचे 3.046 कोटी इक्विटी शेअर्समध्ये व्यवहार झाले. जे एकूण इक्विटीच्या 17.83 टक्के होते. तर बॉम्ब स्टॉक एक्सचेंजवर जवळपास 24 लाख शेअर्सचे व्यवहार झाले होते.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात गाठला होता उच्चांक
बॅटरी उत्पादक कंपनीचे समभाग आज सलग चौथ्या सत्रात घसरले. 6 जुलै रोजी, ARBL स्टॉकने 709 रुपयांच्या किंमतीसह 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला होता. तर 27 जुलै 2022 रोजी स्टॉकने 52 आठवड्यांचा नीचांक 461 रुपयांवर पोहोचला होता. मार्च संपलेल्या तिमाहीत कंपनीने 2,429.21 कोटी रुपयांचा महसूल नोंदवला आहे जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 2,196.9 कोटींहून 10% वार्षिक वाढला आहे. मार्च तिमाहीचा महसूल डिसेंबर 2022 च्या तिमाहीत 2,637.24 कोटी रुपयांवरून क्रमशः कमी झाला.
कंपनीचा तेलंगणा सरकारसोबत करार
अमरा राजा बॅटरीजने(ARBL) तेलंगणामध्ये लिथियम-आयन बॅटरी बनवणारा गिगा कारखाना सुरू करणार आहे. यासाठीचा करार पूर्ण झाला असून कंपनी 10 वर्षांत 9,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची शक्यता आहे.