केंद्र सरकारद्वारे पीएम सूर्य घर योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेद्वारे रुफटॉप सोलर पॅनेलच्या माध्यमातून देशातील कोट्यावधी घरांना वीज पुरवण्याचा उद्देश आहे. सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली सूर्य घर योजना काय आहे? याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
Table of contents [Show]
पीएम सूर्य घर योजना काय आहे?
पीएम सूर्य घर योजनाची घोषणा केंद्र सरकारद्वारे करण्यात आली आहे. देशातील 1 कोटींपेक्षा अधिक घरांपर्यंत सोलर पॅनेलच्या माध्यमातून विजेचा पुरवठा व्हावा, हा या योजनेचा उद्देश आहे. तसेच, या योजनेचा लाभ घेणाऱ्यांना 300 यूनिट वीज मोफत दिली जाणार आहे. या योजनेसाठी सरकारने तब्बल 75 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
वीज विकून करता येईल कमाई
या योजनेंतर्गत घरावर सोलर पॅनेल बसविण्यासाठी अर्ज करणाऱ्यांना अनुदान देखील दिले जाणार आहे. योजने अंतर्गत 3kW आणि त्याहून अधिक क्षमतेच्या सोलर पॅनेलसाठी 78 हजार रुपये, 2kW क्षमतेच्या सोलर पॅनेलसाठी 60 हजार रुपये आणि 1kW च्या सोलर पॅनेलसाठी 30 हजार रुपये अनुदान दिले जाईल.
अतिरिक्त खर्चाच्या 40 टक्क्यांपर्यंतची रक्कम अनुदान स्वरुपात मिळेल. याशिवाय, घराच्या छतावर सोलर पॅनेल बसविण्यासाठी 7 टक्के व्याजदराने तारण मुक्त कर्जही मिळेल. सोलर पॅनेलच्या मदतीने महिन्याला 300 वीज यूनिटची निर्मिती होईल व या यूनिट्सचा लाभ मोफत घेता येईल. एवढेच नाही तर निर्माण झालेल्या अतिरिक्त विजेची DISCOMs ला विक्री करून महिन्याला 15 हजार रुपयांचीही कमाई करणे शक्य आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता
- योजनेचा लाभ घेणारी व्यक्ती भारतीय असावी.
- सोलर पॅनेल बसविण्यासाठी स्वतःचे घर असावेय
- वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे.
- तसेच, यापूर्वी सोलर पॅनेल बसवण्यासाठी कोणत्याही सरकारी अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.
कशाप्रकारे करू शकता अर्ज?
- पीएम सूर्य घर योजनेचा लाभ घेण्यासाठी www.pmsuryagarh.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल.
- वेबसाइटवर नोंदणी केल्यानंतर राज्य व वीज वितरण करणाऱ्या कंपनीची निवड करा.
- आता तुमचा वीज ग्राहक क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि ईमेल इत्यादी माहिती भरा.
- त्यानंतर पुन्हा ग्राहक क्रमांक व मोबाइल नंबर टाकून लॉग इन करा.
- आता सोलर पॅनेलसाठी आवश्यक असलेली माहिती भरून फॉर्म सबमिट करा.
- परवानगी मिळाल्यानंतर नोंदणीकृत विक्रेत्याकडून सोलर पॅनेल बसवून घ्या.
- घराच्या छतावर सोलर पॅनेल बसवून झाल्यावर त्याबाबतची माहिती देऊन नेट मीटरसाठी अर्ज करावा लागेल.
- नेट मीटर बसवल्यानंतर व DISCOM द्वारे तपासणी झाल्यावर पोर्टलवरून कमिशनिंग प्रमाणपत्र प्राप्त होईल.
- या सर्व प्रक्रियेनंतर कमिशनिंग प्रमाणपत्र वेबसाइटवर अपलोड करावे लागेल. यासोबत तुम्हाला बँकेची माहिती व कॅन्सल चेक देखील अपलोड करावा लागेल. या सर्व प्रक्रियेनंतर 30 दिवसात अनुदानाची रक्कम बँक खात्यात जमा होईल.