मुंबई ते नवी मुंबई ते प्रवास आता सोपा आणि वेगवान होणार आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून, लवकरच हा मार्ग सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे. या प्रकल्पामुळे प्रवाशांचे अनेक तास वाचणार आहेत. याशिवाय, मुंबई ते नवी मुंबई दरम्यान प्रवास करताना येणारी ट्रॅफिक समस्या देखील कमी होईल.
शिवडी ते न्हावा शेवाला जोडणारा हा सागरीसेतू कोट्यावधी रुपये खर्च उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या निमित्ताने हजारो लोकांना रोजगार उपलब्ध झाला. समुद्री पूल सर्वसामान्यांसाठी खुला झाल्यानंतर मुंबई आणि महानगर क्षेत्राच्या (MMR) अर्थव्यवस्था वाढीसाठी देखील याचा फायदा होईल.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प काय आहे व याचा नक्की कायदा होईल, हे या लेखातून जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प काय आहे?
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचा उद्देश हा मुंबईतील शिवडी व मुख्य भुमीवरील न्हावाशेवाला जोडणे हा आहे. या सागरी पुलामुळे मुंबई ते नवी मुंबई हे अंतर अवघ्या 20 ते 25 मिनिटात पार करता येईल. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पुलाची एकूण लांबी 21.8 किमी आहे. यापैकी 16.50 किमी समुद्री पूल व 5.5 किमी जमिनीवरील पुलाची लांबी आहे.
हा पूल 6 पदरी (3+3) असे. याशिवाय, दोन्ही बाजूला आपतकालीन मार्ग देखील असेल. या मार्गावर 4 ठिकाणी बाहेर पडण्यासाठी (Interchange) देखील रस्ते असतील. पुलावर शिवडी, शिवाजी नगर, जसाई आणि राष्ट्रीय महामार्ग – 4 येथे इंटरचेंज रोड असेल.
या पुलाला 'अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी नाव्हा शेवा अटल सेतू' असे नाव देण्याचा निर्णय देखील सरकारद्वारे घेण्यात आला आहे.
प्रकल्पाचा खर्च
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पासाठी एकूण 17843 कोटी रुपये खर्च येण्याचा अंदाज आहे. या प्रकल्पासाठी जवळपास 15 हजार कोटी रुपये कर्ज Japan International Cooperation Agency (JICA) द्वारे देण्यात आले आहे. म्हणजेच प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या जवळपास 85 टक्के निधी हा जायकाद्वारे उपलब्ध करण्यात आला आहे.
प्रकल्पासाठी एमएमआरडीएकडून AECOM Asia Company Ltd., PADECO Co. Ltd., Dar AI-Handasah Consultants आणि TY Lin International ची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. चार टप्प्यात हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे.
या पुलावर एकूण 1212 विजेच खांब उभारण्यात येणार आहे. पुलावर समान रोषणाई राहील व खांबांना गंज लागणार नाही याची देखील काळजी घेण्यात आली आहे. याशिवाय, या मार्गावर जवळपास 130 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचा काय फायदा होणार?
मुंबई ते नवी मुंबईला जोडणारा हा मार्ग प्रवाशांचा वेळ तर वाचवेलच सोबतच यामुळे इंधनात देखील बचत होईल. मुंबई ते नवी मुंबई अंतर हे अवघ्या 25 मिनिटात पार करता येईल. हे अंतर कमी झाल्यामुळे वर्षाला 1 कोटी लीटर इंधनाची बचत होण्याची शक्यता आहे.
या पुलावरून दररोज 70 हजार वाहने प्रवास करतील. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पुलामुळे प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी बंदर, मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आणि मुंबई-गोवा हायवेशी वेगवान दळवळण शक्य होईल. वाहतुकीची समस्या देखील यामुळे सुटेल. मुंबई-नवी मुंबईवरून पनवेल, अलिबाग, पुणे आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास या मार्गामुळे सोपा होणार आहे. विशेष म्हणजे या पुलावर क्रॅश बॅरियर्स लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एवढेच नाही तर यामुळे मुंबई व महानगर क्षेत्राचा अधिक विकास होण्यास मदत होईल. प्रामुख्याने नवी मुंबई व रायगड भागाचा विकास होण्याची शक्यता आहे. या भागातील प्रकल्पांमध्ये गुंतवणूक देखील वाढेल. यामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. या प्रकल्पाच्या माध्यमातून जवळपास 14 हजारांपेक्षा अधिक जणांना रोजगार मिळाला आहे.
पुलावर ओपन रोड टोलिंग
या समुद्री पुलावर ओपन रोड टोलिंगची सुविधा असेल. म्हणजेच, वाहनांना टोल भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आपोआप टोल देता येईल. ओपन रोड टोलिंगची सुविधा असणारा हा भारतातील पहिलाच पुल असेल.
रिपोर्टनुसार, या मार्गावरून प्रवास करण्यासाठी 500 रुपयांपर्यंत टोल आकारला जाण्याची शक्यता आहे. तसेच, सरकार टोलमध्ये 40-50 टक्क्यांपर्यंत सूट देखील देऊ शकते. टोलद्वारे जमा झालेल्या रक्कमेचा वापर पुलाच्या देखभाल व इतर कामासाठी वापरला जाईल.