येत्या शनिवारी 22 एप्रिल 2023 रोजी अक्षय्य तृतीय आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील सराफा बाजारात लगबग आहे. गेल्याच आठवड्यात सोन्याचा भाव 61000 रुपयांच्या रेकॉर्ड पातळीवर गेला होता. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी सोने खरेदीला विशेष महत्व आहे. त्यामुळे सराफा व्यावसायिकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सोने आणि हिऱ्यांच्या खरेदीवर ऑफर्स जाहीर केल्या आहेत.
अक्षय तृतीयेसाठी केवळ सोने खरेदीवरच नाही तर डायमंड आणि चांदीच्या ज्वेलरीवर देखील घसघशीत सूट देण्यात आली आहे. जॉयलुक्कास, कॅरटलेन, तानिष्क, मलाबार गोल्ड या कंपन्यांनी अक्षय तृतीयेनिमित्त सोने खरेदीवर ऑफर्स दिल्या आहेत. यात सोन्याच्या घडणावळीवर सवलत, कॅशबॅक, गोल्ड कॉईन फ्री देण्यात येणार आहे. बहुतांश ज्वेलर्सने मेकिंग चार्जेसवर 50% पर्यंत सवलत दिली आहे. आज मंगळवारी 18 एप्रिल 2023 रोजी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 60542 रुपये इतका आहे. त्यात 362 रुपयांची वाढ झाली. एक किलो चांदीचा भाव 75336 रुपये असून त्यात 524 रुपयांची वाढ झाली आहे.
मलाबार गोल्ड अॅंड डायमंड्सकडून गोल्ड कॉईन फ्री
मलाबार गोल्ड अॅंड डायमंड्स या आघाडीच्या ज्वेलर्सने अक्षय तृतीयेनिमित्त किमान 30000 रुपयांची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 100 मिलीग्रॅमचा गोल्ड कॉईन मोफत देण्याची घोषणा केली आहे. याशिवाय डायमंड, जेमस्टोन, पोल्की यामधील दागिन्यांच्या खरेदीवर 250 मिलीग्रॅमचा गोल्ड कॉईन फ्री दिला जाईल, असे कंपनीने म्हटले आहे. एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना अक्षय तृत्तीयेला खरेदी केल्यास 5% कॅशबॅक दिला जाणार आहे.येत्या 23 एप्रिल 2023 पर्यंत ही सवलत सुरु राहील, असे मलाबार गोल्ड अॅंड डायमंड्सने म्हटले आहे.
जॉयअल्लुकासचे सोने-चांदी खरेदीवर फ्री व्हॉऊचर्स
दक्षिणेतील आघाडीचा ज्वेलर्स जॉयअलुक्कासने सोने आणि चांदी खरेदीवर कॅश व्हाऊचर्स देण्याची घोषणा केली आहे. सोने आणि सोन्याचे दागिने खरेदी केल्यास ग्राहकांना कंपनीकडून गिफ्ट व्हाउचर्स दिले जाणार आहेत. किमान 50000 रुपयांचे सोने किंवा हिऱ्यांचे दागिने खरेदी केल्यास त्यावर ग्राहकांना 1000 ते 2000 रुपयांचे व्हाउचर्स देण्यात येतील. याशिवाय 10000 रुपयांचे चांदीचे दागिने खरेदी केल्यास ग्राहकांना 500 रुपयांचे व्हाउचर्स दिले जाणार आहेत.
कॅरेटलेनकडून सवलत
अक्षय तृतीयेसाठी कॅरेटलेन या कंपनीने डायमंड ज्वेलरीवर 20% डिस्काउंट जाहीर केला आहे. एसबीआय कार्डधारकांना क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास 5% कॅशबॅक दिला जाणार आहे. ही ऑफर 22 एप्रिल 2023 पर्यंत सुरु राहील, असे कंपनीने म्हटले आहे.
तानिष्कची ऑफर
टाटा ग्रुपचा ज्वेलरी ब्रॅंड असलेल्या तानिष्क ब्रॅंडकडून देखील अक्षय तृतीयेची ऑफर जाहीर करण्यात आली आहे. ग्राहकांनी सोने आणि डायमंडचे दागिने खरेदी केल्यास घडणावळीवर 20% ते 25% सवलत जाहीर केली आहे.23 एप्रिल 2023 पर्यंत ही सवलत लागू असल्याचे कंपनीने म्हटले आहे. तनिष्कने दिलेल्या माहितीनुसार 3 लाखांपर्यंत सोने खरेदी केल्यास 10%, 3 ते 7 लाखांपर्यंत खरेदी केल्यास 15%, 7 ते 15 लाखांपर्यंत 20% आणि 15 लाखांहून अधिक किंमतीची सोने खरेदी केल्यास त्यावरील मेकिंग चार्जेसवर 25% सवलत जाहीर करण्यात आली आहे.
सेनको गोल्डकडून मेकिंग चार्जेसवर 50% सवलत
सेनको गोल्ड अॅंड डायमंडकडून सोने आणि डायमंड ज्वेलरीच्या घडणावळीवर 50% सवलत देण्याची घोषणा सेनकोने केली आहे. त्याशिवाय डायमंड ज्वेलरीवर 12% सूट कंपनीने जाहीर केले आहे.याशिवाय जुने दागिने देऊन नवीन दागिने खरेदी केले तर त्यावर कोणतीही डिडक्शन फि लागू केली जाणार नाही, असे सेनको गोल्डने म्हटले आहे.
मेलोराची प्रिपेड ऑर्डर्सवर सवलत
मेलोरा कंपनीने इतर ज्वेलर्सप्रमाणेच सोन्याच्या दागिन्यांवरील मजुरीवर 50% आणि डायमंड ज्वेलरीवर 25% सवलत देण्याची घोषणा केली आहे.आयसीआयसीआय बँकेच्या डेबिट आणि क्रेडीट कार्डने खरेदी केल्यास त्यावर 10% सवलत दिली जाणार आहे. प्रीपेड ऑर्डर्स करणाऱ्या ग्राहकांना अतिरिक्त 2% सवलत देण्यात येईल, असे कंपनीने म्हटले आहे.