इंटरनेटची उपलब्धता सर्वांसाठी आवश्यक आहे. कारण, इंटरनेटमुळे बऱ्याच गोष्टी सहज झाल्या आहेत. तसेच, सर्व ऑनलाईन काम इंटरनेटवर आधारित असल्यामुळे त्याचे महत्व खूप वाढले आहे. देशातील प्रत्येक भागात इंटरनेट सेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने एअरटेलने (Airtel) XStream AirFiber ची सेवा लाॅन्च केली आहे. याचबरोबर Xstream AirFiber डिव्हाईस मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत भारतातच बनवण्यात येणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. यामुळे या सेवेसह भारतीयांना रोजगार उपलब्ध व्हायला मदत होणार आहे. तसेच, सध्या ही सेवा दिल्ली आणि मुंबईमध्येच सुरू करण्यात आली आहे.
इंटरनेट होईल सहज उपलब्ध
एअरटेलने लाॅन्च केलेल्या भारतातील पहिल्या 5G सेवेचा ग्रामीण आणि शहरी भागातील सर्वच युझर्सना याचा लाभ होणार आहे. कारण, ज्या भागात फायबर कनेक्टीव्हीटी पोहचू शकली नाही. तेथे आता हे डिव्हाईस उपयोगी पडणार आहे. त्यामुळे ज्या भागात इंटरनेट पोहचवणे अवघड होते. तिथे आता सहज इंटरनेट उपलब्ध होणार आहे. 5G चांगली कनेक्टीव्हीटी पुरवण्यासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सीचा वापर करते. म्हणजेच हे काम डोंगल्ससारखेच करते, पण याची रेंज आणि स्पीड अधिक असणार आहे.
'हे' आहेत फायदे
या सेवेमुळे तुम्ही 4G पेक्षा 30 पटीने जलद फाईल डाऊनलोड करू शकणार आहात. यासाठी 5G चा स्मार्टफोन असणे आवश्यक ठरणार आहे. तुमचा फोन 5G नसल्यास, तुम्ही सेटींग्जमध्ये जाऊन कनेक्शन किंवा मोबाईल नेटवर्कमधून 5G नेटवर्क निवडू शकता. यासाठी तुम्हाला तुमचा फोन अपडेट करावा लागू शकतो. तसेच, सीम कार्ड 4G असल्यास, तुम्ही ते 5G च्या नेटवर्कसाठी वापरू शकता. यासाठी तुम्हाला नवीन सीम घेण्याची आवश्यकता नाही. फक्त तुमच्या भागात लाईव्ह 5G नेटवर्क असणे गरजेचे आहे.
या सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला डिव्हाईस खरेदी करावे लागणार आहे. त्याची किंमत ₹2,500 रुपये असून 1 महिन्यासाठी ₹799 रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच, टेल्को सध्या 6 महिन्याचे सबस्क्रिप्शन विकत आहे. त्यामुळे ग्राहकाला 6 महिन्यांच्या सेवेचे पैसे देणे आवश्यक आहे.