निसान मोटर कंपनीने आपला रशियामधील उद्योग 1 युरो ($0.97) मध्ये रशियन सरकारची मालकी असलेल्या संस्थेकडे सुपूर्द करणार असल्याचे जाहीर केले. यामुळे निसान मोटर कंपनीला सुमारे 687 दशलक्ष डॉलरचा तोटा सहन करावा लागणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, निसान कंपनीच्या कार्यकारी समितीने ही कंपनी रशियाच्या सेंट्रल रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑटोमोबाईल आणि इंजिन इन्स्टिट्यूट म्हणजेच NAMI ला विक्री करण्यास मान्यता दिली. दरम्यान, मे महिन्यात रेनॉल्ट कंपनीने आपला बहुतांश हिस्सा एका रशियन कंपनीला विकला होता.
निसान मोटर कंपनीने आपल्या भागीदारीचे शेअर्स रशियामधील सरकारी मालकीची कंपनी NAMI कडे हस्तांतरित केले आहेत. या हस्तांतरणाचा करार करताना निसान कंपनी सहा वर्षांच्या कालावधीत ही कंपनी पुन्हा खरेदी करू शकते. तो अधिकार कंपनीला असेल, असे रशियाच्या उद्योग आणि व्यापार मंत्रालयाकडून सांगण्यात आल्याचे कळते.
निसानने कंपनीची विक्री करताना ती डॉलरमध्ये न विकता, आपल्या देशाच्या येन या चलनात तिची जाणीवपूर्वक विक्री केल्याचे सांगितले जाते. या निर्णयामुळे निसान कंपनीला 100 अब्ज येन (680 मिलिअन डॉलर्स)चा फटका बसणार असल्याचे सांगितले जाते. हा निर्णय घेताना निसानचे अध्यक्ष आणि सीईओ माकोटो उचिदा यांनी एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले की, आम्ही सध्या रशियाच्या मार्केटमध्ये काम सुरू ठेवू शकत नाही. तसेच आम्हाला आमच्या लोकांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही हा सर्वोत्तम पर्याय शोधला आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यादरम्यान सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरातून रशियावर वेगवेगळ्याप्रकारे दबाव टाकण्याचा सुरू होता. तसेच यावर अनेक देशांनी रशियाच्या भूमिकेवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या नाराजी व्यक्त केली होती. तसेच या दोन देशांमधील युद्धामुळे अनेक देशांच्या आयात-निर्यातीवर परिणाम झाला. याचाच भाग म्हणून जपानमधील निसान कंपनीने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. रशियाने सर्व प्रमुख देशांचा सल्ला नाकारून युक्रेनमध्ये सैनिकांना पाठवल्यामुळे रशियाविरोधात सर्वांचाच नाराजीचा सूर होता.
रेनॉल्टनंतर निसानने गाशा गुंडाळला...
रशियाने युक्रेनमध्ये हजारो सैनिकांना पाठवून जगभरातील देशांची नाराजी ओढावून घेतली होती. याचाच भाग म्हणून निसान कंपनीने रशिया सोडण्याचा घेतलेला निर्णय हा मोठा निर्णय मानला जातो. यापूर्वी मे महिन्यात रेनॉल्ट कंपनीने आपला बहुतांश हिस्सा एका रशियन कंपनीला विकला होता.
दरम्यान, टोयोटा मोटर कंपनीनेही गेल्या महिन्यात रशियामधून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला होता. ही कंपनीसुद्धा रशियामधील आपला व्यवसाय बंद करण्याची योजना आखत आहे. इतर देशातील अनेक कंपन्यांनी रशियातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यामुळे जपानी मोटार कंपन्या तातडीने रशिया सोडण्याचा विचार करत आहेत.