• 26 Mar, 2023 14:01

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Adani vs Hindenburg: अदानी ग्रुपच्या शेअर्सचे भाव वाढण्यामागे काय कारणे आहेत ते जाणून घ्या

Gautam Adani

Image Source : www.adani.com

Adani vs Hindenburg संघर्षात अदानी ग्रुपच्या (Adani Group) शेअर्सची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. हिंडनबर्गने वर्तविलेल्या अंदाजानुसार समूहाच्या शेअर्सच्या भावात मोठी घसरण देखील झाली. मात्र गेल्या काही दिवसात समूहाच्या शेअर्समध्ये वाढ देखील होताना दिसत आहे. काही वेळा अप्पर सर्किटही लागत आहे . याची काय कारण आहेत ते जाणून घेऊया.

Hindenburg अहवाल जाहीर झाल्यानंतर देशभर खळबळ उडाली होती. Adani vs Hindenburg संघर्षात अदानी ग्रुपच्या (Adani Group) शेअर्सची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. हिंडनबर्गने वर्तविलेल्या अंदाजानुसार समूहाच्या शेअर्सच्या भावात मोठी घसरण देखील झाली. मात्र गेल्या काही दिवसात समूहाच्या शेअर्समध्ये वाढ देखील होताना दिसत आहे. काही वेळा अप्पर सर्किटही लागत आहे . याची काय कारण आहेत ते जाणून घेऊया.

हिंडनबर्ग रिसर्चने 24 जानेवारी रोजी अहवाल प्रकाशित केला आणि तेव्हापासून अदानी समूहाच्या शेअर्सवर अनेक दिवस लोअर सर्किट लागलेले दिसून येत होते.  गुंतवणूकदारांचे यामध्ये मोठे नुकसान झालेले बघायला मिळाले होते. एलआयसी, म्युच्युअल फंड स्कीम यांची देखील मोठी गुंतवणूक अदानी समूहाच्या शेअर्समध्ये असल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण होते. आता ही परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे, असे नाही. मात्र, अशा काही घडामोडी घडत आहेत ज्यामुळे समूहाच्या शेअर्सचे भाव वाढताना दिसत आहेत.  हिंडेनबर्गने आपल्या अहवालात अदानी समूहाचे शेअर्स 85 टक्क्यांनी   ओव्हरव्हॅल्युएड असल्याचा दावा केला होता. यानंतर  जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झालेली अदानी समूहातील कंपन्यांची घसरण फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत कायम होती. मात्र, गेल्या 2 आठवड्यात हे चित्र बदलत असल्याचे दिसून येत आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सकारात्मक बदल झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये अदानी ग्रीन एनर्जी, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी टोटल गॅसच्या शेअर्समध्ये अप्पर सर्किट अजूनही सुरू असल्याचे दिसून येत आहे.  

समूहाच्या अनेक कंपन्यांची व्यावसायिक स्थिती चांगली 

अदानी समूहाच्या काही कंपन्यांचा व्यवसाय अदानी पोर्ट्स, अदानी विल्मर आणि अदानी ग्रीन एनर्जीचा हा चांगल्या स्थितीत आहे. या समूहाचा भारतात 25 टक्क्यांहून अधिक  पोर्ट्सचा  व्यवसाय असून  या क्षेत्रात कंपनीचे  वर्चस्व दिसून येते. कंपनीची ही जमेची बाजू ठरल्याचे विश्लेषक सांगतात. शेअर बाजारात गुंतवणूक करताना गुंतवणूकदार हे कित्येकदा दीर्घकालीन विचार करतात. एखादी कंपनीचा शेअर्स आज चांगला परफॉर्म करत नसला तरी तो शेअर्स फंडामेंटली कसा आहे? कंपनीचा एकूण व्यवसाय कसा आहे? कंपनीची निर्माण झालेली प्रतिकूल परिस्थिती ही तात्कालिक आहे का दीर्घकालीन याचा गुंतवणूकदार विचार करत असतात. या गोष्टीचाही अदानी समूहाच्या शेअर्सवर सकारात्मक परिणाम झालेला असल्याचे विश्लेषक सांगतात.  

फिच आणि मुडिजचे अहवाल समूहासाठी चांगले 

Hindenburg च्या अहवालानंतर अदानी ग्रुपचे शेअर्स कोसळू लागले होते. मात्र या स्थितीत  फिच आणि मूडीजच्या अहवालांविषयी अदानी समूहासाठी सकारात्मक बातम्या पुढे आल्या. त्याचाही या समूहाच्या शेअर्समध्ये वाढ होण्यासाठी चांगला परिणाम झाल्याचे विश्लेषक सांगतात.  दरम्यान रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांकडे अदानी समूहाला दिलेल्या कर्जाविषयी डिटेल्स मागितले होते. सेबीनेही माहिती मागवायला सुरुवात केली होती. लोकसभेतही हा प्रश्न उचलण्यात आला होता. देशभरात या विषयावरून वातावरण तापले होते. मात्र कालांतराने परिस्थिती  निवळताना दिसून आली.

गुंतवणूकदारांचा विश्वास मिळवण्यासाठी उचलले पाऊल 

अदानी ग्रुपसमोर मोठे आव्हान उभे राहिल्यानंतर गुंतवणूकदारांचा विश्वास परत मिळवणे गरजेचे बनले होते. एकीकडे शेअर्सच्या किमती घसरत असताना गुंतवणूकदारांचा विश्वास मिळवण्यासाठी अदानी यांनी महत्वाचे पाऊल उचलले. अदानी समूहाने वेळेपूर्वी कर्जाची परतफेड करण्याचा निर्णय घेतला. अदानी यांनी  7 हजार कोटीपेक्षा जास्त कर्ज वेळेपूर्वीच फेडले. त्याअगोदर अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनने एसबीआय  म्युच्युअल फंडाला दीड हजार कोटींच्या कर्जाची परतफेड केली होती.

अन्य काही कारणे 

अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा वाढ होण्यात आणखी काही महत्वाच्या बातम्याही पुढे आल्या. अदानी समुहात  अमेरिकन कंपनीने मोठी गुंतवणूक केली आहे.  अदानी समूहाकडून याविषयी असे सांगण्यात आले की,  GQG इन्व्हेस्टमेंट फर्मने अदानी समूहाच्या चार कंपन्यांमधील भागभांडवल खरेदी केले आहे.  GQG पार्टनर्सनी अदानी पोर्ट्स, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी अदानी ट्रान्समिशन आणि अदानी एंटरप्रायझेस या चार अदानी समूहातील 15 हजार कोटींपेक्षा जास्त किमतीचे शेअर्स खरेदी केले.

Adani vs Hindenburg संघर्षानंतर अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये महिनाभर मोठी पडझड बघायला मिळाली. मात्र, एकीकडे हे सुरू असताना या सर्व घडामोडीमुळे समूहाच्या काही कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ देखील होताना दिसत आहे. आता येणाऱ्या काही दिवसात काय घडते, अदानी ग्रुपचे शेअर्स कोणत्या दिशेने पुढे जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.