Adani stock crash: शेअर बाजाराची सुरुवात आत डळमळीत झाली. सेन्सेक्समध्ये 526 अंकांची घसरण पाहायला मिळाली. तर निफ्टीचा निर्देशांक 157 अंकांनी खाली येऊन 17,668 अंकावर स्थिरावला आहे. अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर्स मागील काही दिवसांपासून वाढत असताना आज अचानक पुन्हा कोसळले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे 40 हजार कोटींचे काही तासात नुकसान झाले आहे.
सकाळच्या सत्रात अदानी टॉप लूझर (Top looser in share Market)
अदानी समूहातील दहाही कंपन्यांचे शेअर्स कोसळले आहेत. अदानी समूहातील शेअर्सची विक्री करण्याचा सपाटा गुंतवणूकदारांनी लावला आहे. अदानी एंटरप्राइजेसचा शेअर 8.33% खाली आला आहे. अदानी शेअर्स सकाळच्या सत्रात टॉप लूझर ठरत आहेत. काही शेअर्स 7 टक्क्यांनी कोसळले आहेत. अदानी ट्रान्समिशन, अदानी टोटल गॅस, अदानी विल्मर, अदानी ग्रीन हे 5% नी खाली आले आहेत.
अदानी समूहाचे बाजारमूल्य कोसळले (Adani loses Market Value)
25 जानेवारीला हिंडनबर्ग अहवाल प्रकाशित झाल्यापासून अदानी समूहाचे एकूण बाजारमूल्य 11.5 लाख कोटी ते 7.69 लाख कोटींनी रोडावले आहे. एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत अदानी समुहाच्या स्टॉक्सचे मूल्य 60% पेक्षा जास्त कमी झाले आहे.
अमरेकास्थित हिंडनबर्ग शॉर्ट सेलिंग फर्मने अदानी समुहावर शेअर्सच्या किंमतीत फेरफार आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर अदानी समुहाचे शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली होती. या आरोपांची सेबीनेही चौकशी सुरू केली आहे. तसेच क्रेडिट रेटिंग फर्म कंपन्यांनी अदानी समूहाने घेतलेल्या कर्ज आणि सेक्युरिटिजला कशी रेटिंग दिली आहे, याची चौकशी सुरू केली आहे.
हिंडेनबर्ग रिपोर्ट पुढे आल्यानंतर कंपनीने गुंतवणूकदारांना शांत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. कर्जाची परतफेड करण्याबरोबरच पैशांची बचत करण्यावर भर देण्यात येत आहे. अदानी ट्रान्समिशन या कंपनीने कर्जाचे नव्याने व्यवस्थापन करण्याचे जाहीर केले आहे. तर अदानी पोर्ट्सने 1 हजार कोटींचे कर्ज फेडण्यासाठी हालचाल सुरू केली आहे. हिंडेनबर्ग समूहाने केलेले सर्व आरोप अदानी समूहाने फेटाळून लावले आहेत. मात्र, गुंतवणूकदारांना हे आरोप खोटे असल्याचे पटवून देण्यात कंपनी अयशस्वी ठरली आहे.